Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘मंदीतून बाहेर पडायचे असेल तर व्यवस्थापनात पारदर्शकता आणा’
औरंगाबाद, ४ मार्च/प्रतिनिधी

 

मंदीचा विळखा अख्ख्या जगाला पडला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. खरे पाहता मंदीतून बाहेर पडण्यासाठी उद्योजक- व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचारी- कामगारांना विश्वासात घेऊन सर्व गैरसमज दूर करायला हवे. व्यवस्थापनात जर पारदर्शकता आली तर मंदीसारख्या संकटाची झळ त्या उद्योगाला कमी प्रमाणात सोसावी लागेल, असे लाखमोलाचे मार्गदर्शन आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केले.
शहरातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी आध्यात्मिक गुरू श्री श्रींचे आशीर्वाद घेत संवाद साधला. या वेळी उद्योजक मुकुंद भोगले, उल्हास गवळी, एनआयपीएम औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष मकरंद देशपांडे, मनोज गुप्ता, सुनील सुतवणे, मसिआ अध्यक्ष अनुप काबरा, राजेश पाटणी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, राजन हौजवाला, झोएब येवलावाला, अजय शहा, आदेशपालसिंग छाबडा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. जागतिक मंदीत उद्योग-व्यापारावर होत असलेल्या परिणामाविषयी या वेळी चर्चा झाली. मंदीतून बाहेर कसे पडायचे, असा प्रश्न पडलेला असल्याचे सांगत श्री श्री रविशंकर म्हणाले की, व्यवस्थापनात पारदर्शकता आणत कर्मचाऱ्यांशी उद्योजकाने वेळोवेळी चर्चा करावी. श्री श्रींनी एनआयपीएमच्या मनोज गुप्ता यांना उपस्थितांचे प्रतिनिधी म्हणून एक रोपटे दिले.