Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

विविध मागण्यांसाठी जनसुराज्य पक्षाचा मोर्चा
नांदेड, ४ मार्च/वार्ताहर

 

पतसंस्था तसेच छोटय़ा संस्थांमध्ये अपहार झाल्यानंतर कारवाईचा बडगा उगारणारे राज्य सरकार नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोटय़वधी रुपयांचा अपहार करणाऱ्यांना का पाठीशी घालत आहे, असा सवाल जनसुराज्य पक्षाच्या नेत्या व पक्षाच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रीती शिंदे यांनी केला.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पूर्ववत सुरू करम्यात यावी, ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात, गुरु-ता-गद्दी सोहळ्यानिमित्त झालेल्या विकासकामांतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी जनसुराज्य पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाल्यानंतर त्या बोलत होत्या.
श्रीमती शिंदे म्हणाल्या की, विशिष्ट समाजाची, घराण्याचंी राजकारणात मक्तेदारी होत चालली आहे. हे चित्र बदलण्यासाठी सर्वसामान्यांनी राजकारणात आले पाहिजे याच भूमिकेतून आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. आपल्याच जीवावर निवडणूक जिंकणारे नंतर आपल्याच जीवावर उठले तर काय उपयोग, असा सवाल करून त्यांनी राज्यकर्त्यांना धडा शिकवा, असे आवाहन केले.
पक्षाच्या युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष अविनाश भोसीकर, निवृत्त पोलीस अधिकारी मधु शिंदे यांची भाषणे झाली. मोर्चात सुमारे तीन ते चार हजार नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा काढण्याची तयारी आठ दिवसांपासून सुरू होती. आज आचारसंहितेचे कारण पुढे करून पोलिसांनी ऐनवेळी मोर्चाची परवानगी रद्द केली; परंतु मोर्चा काढण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवल्याने पोलिसांनी परवानगी दिली.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मोर्चाचे पूर्ण चित्रिकरण केले आहे.