Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

विजेअभावी पाचेगाव परिसरातील बंजारा तांडे अंधारात
गेवराई, ४ मार्च/वार्ताहर

 

सततची वीजकपात व अपुरा वीजपुरवठा यामुळे पाचेगाव तसेच परिसरातील नऊ बंजारा तांडे कायमस्वरूपी अंधारात आहेत.
वीस हजार लोकवस्तीच्या गावात केवळ दोनच ठिकाणी सिंगल फेजिंग केल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पाचेगाव महसूल मंडळाचे गाव आहे.
या गावच्या शिवारात दामू नाईक तांडा, चाकू तांडा, बेली तांडा, पवारवाडी, रेखानाईक तांडा, चव्हाणवाडी, जयराम तांडा, वसंतनगर असे नऊ बंजारा तांडे आहेत. या ठिकाणी २० हजार लोकसंख्या असूनही केवळ दोन ठिकाणी सिंगल फेजिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे.
ग्रामीण भागात बारा-बारा तासांहून अधिक वेळ वीजकपात असते. या व्यतिरिक्तही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे या गावांच्या नागरिकांना रात्रंदिवस वीजटंचाईचा सामना करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा होत नसल्याने अंधार असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. वीजटंचाईचा परिणाम जनावरांच्या पिण्याच्या पाण्यावरही होत आहे.
विजेअभावी पिठाच्या गिरण्याही बंद राहत असून घरात धान्य असूनही पीठ नसल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. विद्युत वितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत.
येत्या १५ दिवसांत सिंगल फेजिंग करून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा बंजारा सेवा संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त रहिवाशांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर पाचेगावचे सरपंच प्रकाश राठोड व इतरांच्या सह्य़ा आहेत.