Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सत्ता नसली तरी जनतेच्या समस्येसाठी लढत राहणार - रोचकरी
तुळजापूर, ४ फेब्रुवारी/वार्ताहर

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कडाडून टीका करीत सत्ता नसली तरी जनतेच्या समस्यासाठी आवाज उठवीत राहणार असल्याची ग्वाही माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी अपसिंगा येथील सभेत दिली.
श्री. रोचकरी यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. अपसिंगा, कात्री, कामठा या खेडय़ात देवराज मित्रमंडळाच्या सात शाखा स्थापण्यासाठी सभांचे आयोजन केले होते. अपसिंगा येथील सभेत श्री. रोचकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी राजेंद्र बामणे होते.
गेल्या निवडणुकीत थोड्या मताधिक्यामुळे पराभवास सामोरे जाण्याची वेळ आली. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे व ग्रामीण परिरातील जनमताचा कानोसा व जनतेची हाक लक्षात घेऊन निवडणुकीत उतरण्यासाठी तयारी केल्याचेही श्री. रोचकरी यांनी सांगितले. पंचायत समितीच्या सदस्य रूपाली डोंगरे, देवानंद मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब गुंड, जिल्हासंघटक सूर्यकांत पाटूसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. रोचकरी म्हणाले की, तुळजाभवानी साखर कारखान्यावर ८२ कोटी रुपयांचा बोजा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रकल्पाची विल्हेवाट लावली. आमदार निधीतील कामे ठराविक ठेकेदाराकरवी इतरत्र कामे केली जातात. कृष्णा खोरे प्रकल्पात २३ हजार कोटी देण्याची वल्गना करणाऱ्या सरकारने केवळ ६ कोटी रुपयांचा निधी देण्याचा पवित्रा घेतल्याने अजून १३/१४ वर्षे तरी पाणी येण्याची शाश्वती नाही. केवळ थापा मारून दिशाभूल करणाऱ्या धूर्त नेत्यापासून सावध राहा.
शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक, त्यानंतर तुळजापूरचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणात वावरणाऱ्या श्री. रोचकरी यांनी गेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत उतरून तालुक्यात आपले जाळे तयार केले. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या वेळी पहिल्या आठ फेऱ्यांत रोचकरी यांनी घेतलेल्या आघाडीमुळे अनेक राजकीय नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशानंतर तुळजापूर नगरपालिकेतील प्रस्थापित शे. का. प.ला सुरुंग लावण्यात यश मिळवून सत्तातंर घडवून आणले होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत.