Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

गटशिक्षणाधिकाऱ्याची एकाच आठवडय़ात दोनदा बदली
गंगाखेड, ४ मार्च/वार्ताहर

 

परभणीचे जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांच्या कॉपीविरोधी अभियान जीव ओतून राबविणारे गंगाखेड पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी माधव सलगर यांची एकाच आठवडय़ात दोन ठिकाणी बदली केल्याने जिल्हा शिक्षण विभागास काय साध्य करायचे आहे, असा प्रश्ननागरिकांतून विचारला जात आहे.
माधव सलगर म्हणजे शिक्षण विभागासाठी धडपडणारे विकासाभिमुख अधिकारी. बारावी परीक्षा दरम्यान त्यांची नेमणूक सर्वप्रथम राणी सावरगावला करण्यात आली. मात्र त्यांच्या प्रामाणिकतेचा इंगा जाणवताच त्यांची बदली कोद्री केंद्रावर करण्यात आली. कोद्री केंद्रावरही सलगर ‘अडचण’ ठरत असल्याचे लक्षात येतात त्यांची बदली मंगळवारी तहसील कार्यालयात सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूक कामांसाठी करण्यात आली आहे.
श्री. ठोंबरे यांच्या कॉपीविरोधी अभियानास गंगाखेड तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच जिल्हा शिक्षण विभागाने मात्र सलगर यांच्या जागी वादग्रस्त एस. वाय. गायकवाड यांची नेमणूक करीत चालू संस्थाचालकांच्या उद्देशांना खतपाणी घालण्याचे सत्र सुरू केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अभियानास अडसर ठरणाऱ्या बाबी जिल्हा शिक्षण विभागाकडून होत असल्याबद्दल नाराजीचा सूर पसरला आहे.