Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘प्रबोधन साहित्य परिषद सामाजिक जाणिवा बाळगणारी’
उदगीर, ४ मार्च/वार्ताहर

 

स्त्रियांचे लेखन प्रांजळपणाचे असते. स्त्रियांच्या लेखणीचा सन्मान करणारी व मातृत्वाचा सन्मान करणारी उदगीरची प्रबोधन साहित्य परिषद खऱ्या अर्थाने सामाजिक जाणिवा बाळगणारी आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम कवी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी केले.
प्रबोधन साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या साहित्य सोहळ्यात प्रा. तांबोळी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राजकुमार मस्के होते. डॉ. मंदा देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘अंगण नसलेली घरे’ पुस्तकाचे प्रकाशन प्रा. तांबोळी यांच्या हस्ते झाले. त्यांच्याच हस्ते लेखिका ललिता गादगे यांना रसिकाबाई कुलकर्णी स्मृती रसिक प्रबोधन साहित्य पुरस्कार देण्यात आला. ‘प्रबोधन’चे अध्यक्ष धनंजय गुडसूरकर कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रज्ञा प्रतिभेच्या प्रसवाला नियोजन नसते, तर सृष्टी पाहण्याची दृष्टी असेल तरच लेखन होते. ही दृष्टी म्हणजे देणगी असून ती मर्यादित लोकांना मिळते. या देणगीचे सोने करायला हवे, असे सांगून प्रा. तांबोळी म्हणाले की, आता आत्मा हरवत चाललेल्या घराबद्दल चिंता वाटते.
श्रीमती देशपांडे यांचे हे प्रवासवर्णन भारतीय स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिले गेले आहे. ललिता गादगे दर्जेदार लेखिका आहेत, असे गौरवोद्गार प्रा. तांबोळी यांनी काढले.
श्रीमती गादगे म्हणाल्या की, आईच्या स्मरणार्थ दिला गेलेला पुरस्कार हा आयुष्यातील सर्वोच्च ठेवा आहे. उदगीरकरांचे प्रेम पाहून आपण भारावलो आहोत.
या वेळी प्रा. डॉ. दिनकर कुलकर्णी, सुभाष देशपांडे, धनंजय गुडसूरकर यांचीही भाषणे झाली. अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. राजकुमार मस्ते यांनी मायेची ममता व लेखणीच्या सन्मानाचे कौतुक केले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत हालकीकर यांचा श्री. तांबोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ूसत्रसंचालन प्रा. नीलिमा कुलकर्णी यांनी केले. डॉ. प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.