Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

थकीत अनुदानासाठी चार कोटींचा निधी मंजूर
अंबजोगाई, ४ मार्च/वार्ताहर

 

राज्य आणि केंद्र सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेत येणाऱ्या विविध अनुदान योजनेतील हजारो लाभधारकांच्या थकीत अनुदानापोटी बीड जिल्ह्य़ाला २९ कोटी रुपयांचे तर अंबाजोगाई तालुक्यासाठी ४.५ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती या योजनेचे तालुकाध्यक्ष किशोर परदेशी आणि सचिव तहसीलदार भागवत देशमुख यांनी दिली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने संजय गांधी निराधार योजना सहाय्यता समिती अंतर्गत श्रावणबाळ सेवा योजना, संजय गांधी निराधार आर्थिक दुर्बलांसाठी योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून अनुदानास प्राप्त असणाऱ्या अनुदान देण्यात येते.
तालुक्यात अशा विविध प्रकारच्या अनुदानाच्या माध्यमातून एकूण जवळपास १६ हजार लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येते. यापैकी श्रावणबाळ सेवा योजनेत ८९१९, इंदिरा गांधी निराधार व भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजनेत १९४, संजय गांधी निराधार आर्थिक दुर्बलांसाठी योजनेत १५००, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेत ८९२० असे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांचे २००६-०७ वर्षांपासूनचे अनुदान सरकारने अद्याप उपलब्ध करून दिले नव्हते.
हे अनुदान त्वरीत उपलब्ध करून द्यावे यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री डॉ. विमल मुंदडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बीड जिल्ह्य़ातील लाभार्थीच्या थकीत अनुदानापोटी २९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
या २९ कोटी रुपयांपैकी तालुक्यातील लाभार्थीसाठी ४ कोटी ४९ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध झाले असल्याची माहिती संजय गांधी निराधार सहाय्यता योजना समितीचे अध्यक्ष किशोर परदेशी आणि सचिव तहसीलदार भागवत देशमुख यांनी दिली आहे. येत्या गुढीपाडव्यापूर्वी सर्व लाभार्थ्यांना ही रक्कम मिळेल, असे प्रयत्न तहसील कार्यालयातील संबंधित विभागाकडून होत आहे.