Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘जय जवान’मध्ये चार कोटींच्या मळीची बेकायदा विक्री
लातूर, ४ मार्च/वार्ताहर

 

जयजवान सहकारी साखर कारखान्यातील ४ कोटी रुपयांची मळी बेकायदा विक्री केल्याची तक्रार कारखान्याचे संचालक रामकिशन भंडारी, माजी संचालक डी. एन. शेळके, एल. बी. आवाळे यांनी चाकूर पोलीस ठाण्यात व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे.
नळेगावच्या जयजवान जयकिसान साखर कारखान्यात मळी साठवण्यासाठी ३० हजार लिटरची स्टीलची टाकी आहे. टाकी भरल्यानंतर उर्वरित मळी कच्च्या खड्डय़ात साठवली जाते. यासाठी गेल्या २२ वर्षांपासून दोन कच्चे खड्डे तयार करण्यात आले आहेत. कारखान्याचे संचालक रामकिशन भंडारी सोमवारी (दि. २) कारखाना कार्यस्थळावर गेले असता आशुतोष गुप्ता (राजकोट) वाहनातून (क्रमांक ईक्यूसीजी ०४ जेए ५५६६) दोनशे लिटरची ५२ पिंपे मळी भरून जात असताना दिसले.
अधिक चौकशीत त्यांना ही मळी उत्पादन शुल्क न भरता बेकायदा मध्य प्रदेश व छत्तीसगड येथे नेत असल्याचे समजले.कारखान्याच्या कंपाऊंडच्या आत एक स्टील टाकी व दोन कच्चे खड्डे असताना कंपाऊंडच्या बाहेर चार खड्डे करून नाली व पाईपलाईनद्वारे इलेक्ट्रीक मोटार बसवून मळी बाहेर नेण्यात येत आहे, असा आरोप श्री. भंडारी यांनी केला. कारखान्यातील अधिकारी योग्य उत्तरे देत नसल्यामुळे यासंबंधी चाकूर पोलीस ठाण्यात व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेडच्या अधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे.