Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीच्या तोंडावर युतीमध्ये वादंग
जालना, ४ मार्च/वार्ताहर

 

लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली असताना समविचारी पक्षात एकोपा वाढण्याऐवजी जालन्यात मात्र शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये वादंग वाढीस लागले आहेत. शिवसेनेच्या सदस्यांच्या मदतीने परतूर तालुका पंचायत समितीचे भा. ज. प.चे सभापती राहुल लोणीकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. आमदार बबनराव लोणीकर यांनी शिवसेनेच्या विरोधात आरोप केले आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर शिवसेनेचे असून उपाध्यक्ष भा. ज. प.चा आहे. कोटय़वधीची कामे नियमबाह्य़पणे केल्याचा आरोप करून आमदार लोणीकर म्हणाले की, जिल्हा परिषदेने मराठवाडा विकास कार्यक्रमात कोटय़वधी रुपयांची अफरातफर झाली. सन २००६ ते २००९ या तीन वर्षांत मोठय़ा प्रमाणात गाव तलाव व पाझर तलाव करण्यात आले आहेत. ही कामे करताना मंजूर निधीपेक्षा जास्त कामे मंजूर करण्यात आली. यासाठी देण्यात आलेली प्रशासकीय मान्यता नियमबाह्य़ आहेत. वाढीव रकमेची देयके देण्यासाठी जिल्हा परिषदेचा राखीव व इतर निधी वर्ग करण्यात आला.
विकास कामांऐवजी केवळ गुत्तेदारांचे व स्वत:चे हित जोपासण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप आमदार लोणीकर यांनी केला आहे. तसेच मराठवाडा विकास कार्यक्रमातील ही कोटय़वधीची कामे अधिकांश कागदावरच झाली असून त्यांची देयकेही उचलण्यात आली आहेत. मुख्याधिकारी शालिग्राम वानखेडे यांनी या संदर्भात चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमदार लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांच्याविरोधात शिवसेनेच्या दोन सदस्यांसहीत इतर सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.