Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेस फसव्या घोषणा करीत आहे - दानवे
जालना, ४ मार्च/वार्ताहर

 

केंद्र व राज्यात सत्तेत असलेली काँग्रेस आघाडी सरकारला जनतेशी कुठल्याही प्रकारचे देणेघेणे नाही. निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीसारख्या फसव्या घोषणा करून जनतेची ते फसवणूक करीत आहेत, असा आरोप खासदार रावसाहेब दानवे यांनी केला.
रेवगाव येथे पंतप्रधान ग्रामसडक योजनेत रेवगाव-दुधना काळेगाव ते कारखेडा या व रेवगाव-पोकळ वडगाव्ोया रस्त्यांच्या डांबरीकरणाचे उद्घाटन रविवारी श्री. दानवे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अर्जुन खोतकर होते. या वेळी राजेश राऊत, अनिरुद्ध खोतकर, भास्कर अंबेकर, रामेश्वर भांदरगे आदी उपस्थित होते.
श्री. दानवे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याला डोळ्यापुढे ठेवून सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मराठवाडय़ातील शेतकऱ्यालाया कर्जमाफीचा कसलाही लाभ झाला नाही. सात-बारा कोरा, मोफत वीज व कापसाला तीन हजारांचा भाव या घोषणा करून काँग्रेसने सत्ता हस्तगत केली. पण नंतर त्यांच्या या घोषणा फसव्या असल्याचे सिद्ध झाले. मोफत विजेची घोषणा करायची व शेतकऱ्यांवर वीज चोरीचे गुन्हे दाखल करायचे, असे एक हजारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आमदार खोतकर म्हणाले की, सत्ताधारी मंडळींनी विकास कामात कुठलेच सहकार्य केले नाही, ही खेदाची गोष्ट आहे. आम्ही हा निधी स्वबळावर खेचून आणला आहे. जनार्दन गोल्डे म्हणाले की, या पुढेही विकास कामे गतीने पूर्ण होतील.