Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

प्रादेशिक

महापालिका मुख्यालयासमोर डंपरभर कचरा टाकल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांची कारागृहात रवानगी
समर्थकांकडून बसेसची तोडफोड
ठाणे, ४ मार्च/प्रतिनिधी
मुंबई महापालिका मुख्यालयासमोर डंपरभर कचरा टाकल्याच्या आरोपाखाली विक्रोळी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह १५ जणांना आज अटक केली. हे वृत्त पसरताच संतप्त कार्यकर्त्यांनी सात बसची तोडफोड करीत पुकारलेल्या बंदने काही काळ ठाण्यात वातावरण तंग होते. त्यात जामीन घेण्यास नकार दिल्याने आव्हाड व नगरसेवक मिलींद पाटील यांची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे.

‘औद्योगिक सुरक्षिततेबाबतही क्रांतीची गरज’
ठाणे, ४ मार्च/प्रतिनिधी

जीवन हे अमूल्य असून, त्याची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणूनच औद्योगिक क्रांतीप्रमाणे सुरक्षिततेबाबतही क्रांती होण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रेमण्डचे संचालक आर.के. खंडेलवाल यांनी आज येथे केले. ३९ वा राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने व्होल्टास कंपनीत आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात खंडेलवाल बोलत होते. व्होल्टासचे महाव्यवस्थापक सुधीर भालेराव, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक व्ही.ए. मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

एसटीमध्ये थेट परकीय गुंतवणूक करण्यास कोरियन कंपनी उत्सुक
कैलास कोरडे
मुंबई, ४ मार्च

दक्षिण कोरियातील अनेक खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांपैकी कुम्हो एक्स्प्रेस ही अग्रणी कंपनी एसटीमध्ये थेट परकीय गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. त्यामाध्यमातून राज्यभरात अत्याधुनिक वातानुकूलित बसेस चालविण्याचा कंपनीचा मानस असून, एसटी महामंडळानेही कुम्हो एक्स्प्रसेच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये प्रवासी वाहतूक क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक करण्यास रस दाखविणारी कुम्हो एक्स्प्रेस ही पहिलीच कंपनी आहे.

मीरा रोडमध्ये दरोडेखोरांकडून गोळीबार, गावठी बॉम्बचा स्फोट!
दुकानाच्या मालकासह पाच जखमी; मुंबईतही दोन दरोडे, तीन जबरी चोऱ्या!
मुंबई, ४ मार्च / प्रतिनिधी
मीरा रोड पूर्वेला असलेल्या संजीवन ज्वेलर्समध्ये शिरून पाच-सहा जणांच्या टोळीने पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटून नेले. पळून जाताना दरोडेखोरांनी केलेला गोळीबार आणि गावठी बॉम्बचा स्फोट यांमुळे दुकानाच्या मालकासह पाचजण जखमी झाले. मुंबईतही काल मध्यरात्रीपासून आज दुपापर्यंत दरोडय़ांचे तीन तर जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले. यामध्ये सहा किलो सोने, सहा लाखांची रोकड, मारूती गाडी असा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला.

अर्भक पळविल्याबद्दल भरपाईचा विचार
पालिका आणि पोलिसांना पुन्हा धारेवर धरले
मुंबई, ४ मार्च/प्रतिनिधी
शीव येथील लो. टिळक इस्पितळातून पळविले गेलेले मोहिनी आणि मोहन नेरुरकर यांचे अर्भक शोधण्यात दोन महिने उलटले तरी शोधून काढण्यास अपयश आल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने आज पालिका प्रशासन आणि पोलिसांना पुन्हा एकदा चांगलेच धारेवर धरले.

विजया मेहता घेणार किशोरी आमोणकर यांची मुलाखत
मुंबई, ४ मार्च / प्रतिनिधी

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी लिहिलेल्या ‘स्वरार्थरमणी’ या अभ्यासपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवार, ६ मार्च रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात होणार आहे. दादर-माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात रात्री आठ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होणार असून विजया मेहता यावेळी किशोरीताईंची प्रकट मुलाखत घेणार आहेत. तसेच सोमवार, ९ मार्च रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात याच पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम आणि संगीताचे अभ्यासक केशव परांजपे या वेळी किशोरीताईंची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

‘मंगेशी देवस्थान’तर्फे शनिवारी मुंबईत बैठक
मुंबई, ४ मार्च / प्रतिनिधी

गोवा येथील सुप्रसिद्ध मंगेशी देवस्थान मंदिराच्या संकुलाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत शनिवारी, ७ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गोकर्ण पार्तगली जिवोत्तम मठ, द्वारकानाथ भवन, कात्रक रोड, मारूती मंदिराशेजारी, वडाळा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मंगेशी देवस्थानच्या भक्तांनी तसेच महाजनांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिराचे अध्यक्ष प्रशांत नाडकर्णी यांनी केले आहे. देवस्थान संकुलाच्या विस्ताराबाबत सूचना व सल्ले ऐकून घेण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. देवस्थानच्या वतीने मंदिराच्या संकुलासाठी तयार करण्यात आलेला कृती आराखडा यावेळी सादर केला जाईल. अधिक माहितीसाठी सुभाष सराफ यांच्याशी ९८२००६६९७४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बस गाडय़ा
ठाणे, ४ मार्च/प्रतिनिधी

दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर वेळेत पोहचता यावे यासाठी ठाणे परिवहन सेवेने कासारवडवली, कळवा नाका आणि वसंत विहापर्यंत सहा विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिक्षार्थीची सोय होणार आहे. ५ मार्चपासून एस.एस.सी.ची परिक्षा सुरू होत आहे. गाडय़ांमधील गर्दी आणि अनियमितता याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. तसेच कासारवडवलीपर्यंत वाढलेल्या लोकसंख्यांच्या प्रमाणात बस सोडल्या जात नाहीत. त्यामुळे परिक्षार्थी व त्यांच्या पालकांनी विशेष बस सोडण्याची मागणी केली. त्यानुसार कळवा नाका ते ठाणे स्थानक (सकाळी १० वा.), माजिवडा नाका ते वसंत विहार (१० वा.), कासारवडवली ते वसंत विहार (९.४० वा.), वसंत विहार ते कासारवडवली (माजीवडा नाकामार्गे) (सव्वा, पावणे दोन, सव्वा दोन वा.) अशा विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत महत्त्वाच्या नाक्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परिवहन सेवेचे कर्मचारी तैनात ठेवले जाणार आहेत, अशी माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक दीक्षित यांनी दिली.

ठाणे महापालिका शिक्षण मंडळ घोटाळ्यात दोघे निलंबित
ठाणे, ४ मार्च/प्रतिनिधी

ठाणे महापालिका शिक्षण मंडळातील वह्या व दप्तर खरेदी घोटाळा गाजत असतानाच खासगी सुरक्षारक्षक नेमणुकीचा आणखी एक घोटाळा उघडकीस आला असून, शिक्षण मंडळाच्या मुख्य लेखापाल ललिता जाधव आणि वरिष्ठ लिपिक विजय कुंभार या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष संजय मोरे यांच्या कार्यकाळात पालिका शाळांसाठी क्रिस्टल एजन्सीकडून खासगी सुरक्षारक्षक घेण्यात आले होते. प्रत्यक्षात १०० सुरक्षारक्षक नेमण्यात आले, मात्र १५० कर्मचाऱ्यांचे वेतन काढले जात होते. सुमारे तीन ते चार वर्षे हा प्रकार चालला होता. मात्र या सुरक्षारक्षकांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्यानंतर त्यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणली. एवढेच नव्हे तर या कामगारांनी पालिका मुख्यालयासमोर उपोषणही केले,त्याची दखल घेऊन शिक्षणाधिकारी बेलदार यांनी प्राथमिक चौकशीअंती शिक्षण मंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

मुंबईत आज पाणीकपात
मुंबई, ४ मार्च / प्रतिनिधी

पिसे-पांजरापूर येथील वीजपुरवठा तीन तास खंडित झाल्याचा परिणाम म्हणून मुंबईकरांना आज १० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या विविध कामांमुळे आधीच पाणीपुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ श्वेतपत्रिका काढण्याची सत्ताधारी शिवसेना पक्षाची मागणी पालिका प्रशासनाने आचारसंहितेचे कारण पुढे करीत फेटाळून लावली.