Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

१८ सरकारी टँकरचालकांना पोलीस कोठडी
टँकर इंधन गैरव्यवहार
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील टँकर इंधन गैरव्यवहार प्रकरणात कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या १८ सरकारी वाहनचालकांना आज न्यायालयाने दि. १२पर्यंत पोलीस कोठडी दिली. १ कोटी १५ लाख २ हजार १७० रुपयांच्या या घोटाळ्यात एकूण २६ आरोपी आहेत.

विषबाधाप्रकरणी दोघे कुल्फीविक्रेते अटकेत
मिरजगाव, ४ मार्च/वार्ताहर

गावातील सुमारे ७०० मुलांना कुल्फीतून विषबाधा झाल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी आज संध्याकाळी गुन्हा नोंदवून कुल्फी विकणाऱ्या दोघा भावांना अटक केली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गावात येऊन या प्रकरणी माहिती घेतली. दरम्यान, विषबाधा झालेल्या सर्व मुलांची प्रकृती आता ठणठणीत असून, मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत उपचार केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातून सर्व मुलांना घरी जाऊ देण्यात आले.

‘बाह्य़वळण रस्त्याचे काम पुन्हा रेंगाळले’
शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी
बाह्य़वळण रस्त्याचे काम पुन्हा रेंगाळले असून, ते गतिमान करून हा रस्ता त्वरित सुरू करावा, तसेच जुने बसस्थानक व प्रेमदान चौकात रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग किंवा त्यासारखी व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांच्याकडे करण्यात आली.
आमदार अनिल राठोड, तसेच माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे, अनिल शिंदे, जसपाल पंजाबी, नितीन जगताप, दिलीप सातपुते आदींच्या शिष्टमंडळाने डॉ. अन्बलगन यांची भेट घेऊन ही मागणी केली.

नगरचा किल्ला बोलू लागला..
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी

नगरच्या भुईकोट किल्ल्याचे बुरुज आणि भिंती बोलू लागल्या.. बहामनी राजवटीतून स्वतंत्र झालेली निजामशाही.. संस्थापक अहमदशाहने कल्पकतेने वसवलेली आपली राजधानी.. सुलताना चांदबिबीने मोगलांशी दिलेली शर्थीची झुंज.. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य.. औरंगजेबाची दख्खन मोहीम आणि नगरला झालेला मृत्यू.. इंग्रजांचं नगरवर आक्रमण.. स्वातंत्र्य चळवळीत ‘चले जाव’ आंदोलनात नेहरूंसह १२ नेत्यांना झालेला बंदिवास.. स्वातंत्र्य मिळाले तो मंगल क्षण..

स्थलांतरित व मृत मतदारांची स्वतंत्र यादी
लोकसभा निवडणूक
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी
मतदारयादीच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतर स्थलांतरित व मृत मतदारांची स्वतंत्र यादी करण्यात आली आहे. ज्या गावात किंवा मतदान केंद्रात ही संख्या लक्षणीय असेल, ते गाव किंवा मतदान केंद्र संवेदनशील घोषित करून तेथील संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.

बंधाऱ्यांचे ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ बनणार कळीचा मुद्दा
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी

निधी उपलब्ध नसताना आगामी वर्षांत बंधाऱ्यांच्या कामांचे बुकिंग करून सदस्यांना बांधून ठेवण्यासाठी जि. प. जलव्यवस्थापन समितीने तब्बल ४ कोटी ७० लाख खर्चाच्या २५ साठवण बंधाऱ्यांना मान्यता दिली. सध्याच्या पदाधिकाऱ्यांची मुदत सप्टेंबपर्यंत असताना पुढील वर्षांच्या बंधाऱ्यांचे केलेले बुकिंग कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. या बंधाऱ्यांसाठी नजीकच्या काळात निधी उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे. महिन्यापूर्वी झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या इतिवृत्तातून या बंधाऱ्यांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवर नुकताच प्रकाश पडला.

पाथर्डीत न्यायालयाच्या आवारातून पळणाऱ्या आरोपीस पाठलाग करून पकडले!
पोलिसांचे मात्र कानावर हात
पाथर्डी, ४ मार्च/वार्ताहर
येथील न्यायालयाच्या आवारातून एका आरोपीने पोलिसांना गुंगारा देत धूम ठोकली. पोलीस नाईक शंकर आहेर यांनी पाठलाग करून आरोपीला पुन्हा जेरबंद करताच सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला. पोलिसांनी मात्र या पलायन नाटय़ाबाबत ‘अगा हे घडलेचि नाही,’ अशी भूमिका घेतली! किंबहुना प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

मै हूँ ना
अनुभव तसा नेहमीचाच आणि वाटय़ालाही बहुतांश लोकांना येणारा. आयुष्यात कधीतरी, कोणीतरी आश्वासून कुणाला तरी देत असतो हात मदतीचा आणि धीरोदात्त विश्वासही, म्हणत ‘मै हूँ ना’, आयुष्याच्या वादळात भयग्रस्त होतो जेव्हा केव्हा एखादा जीव. पहिल्या श्वासाबरोबरच सुरू झालेला आणि आमरण त्याची सावलीगत पाठ न सोडणारा अडी-अडचणींचा सिलसिला खंडित होताना दिसतो फक्त आयुष्याच्या अखेरीसच. मुळात जगी सर्व सुखी असा कोणीच नसल्यामुळे या दुनियेतील बहुतांश सामान्यजन कळत नकळत दिसतात वाट पाहताना अचानक आकाशवाणी झाल्यागत कोणी ‘मै हूँ ना’ म्हणण्याची.

पारगावकर रुग्णालयातील औषध दुकानावर छापा
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी

सावेडीतील पारगावकर रुग्णालयात विनापरवाना सुरू असलेल्या औषध दुकानावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने सुमारे सव्वा लाखाची औषधे व इतर साहित्य जप्त केले. मिस्किनमळा रस्त्यावरील या रुग्णालयात विनापरवाना औषध दुकान अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती सहायक आयुक्त गिरीश वखारिया यांना मिळाली होती. रुग्णालयाच्या नावाने विकत घेतलेल्या औषधांची तेथे विक्री केली जात होती. वखारिया यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक रवींद्र थेटे, प्रमोद कातकडे (नाशिक), मनीष सानप, नामदेव ढगे, महादेव दहिफळे, अस्मिता टोपणे यांच्या पथकाने मंगळवारी या दुकानावर छापा टाकला. औषधविक्रेत्याकडे आवश्यक परवाना नसल्याचे या वेळी उघड झाले. अधिकाऱ्यांनी दुकानातील सर्व औषधसाठा, खरेदी-विक्री बिले जप्त केली. त्याची किंमत १ लाख २४ हजार ६६ रुपये आहे. अशाप्रकारे विनापरवाना, तसेच भेसळ करणारी दुकाने आढळल्यास नागरिकांनी अन्न-औषध प्रशासन कार्यालय, सर्जेपुरा चौक येथे संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन वखारिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.

जिल्हा परिषदेचे ‘आयएसओ’पुढील वर्षांसाठीही कायम
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी

ब्रिटीश स्टँडर्ड इन्स्टिटय़ूट या प्रतिष्ठीत संस्थेने जिल्हा परिषदेचे परीक्षण करून पुढील वर्षांसाठीही आयएसओ हे गुणवत्ता मानांकन कायम केले. या व्यवस्थापन सल्लागार संस्थेने सुधारणांविषयी काही सूचनाही केल्या आहेत. जिल्हा परिषदेस गेल्या वर्षी आयएसओ गुणवत्ता मानांकन मिळाले. मानांकन कायम राहण्यासाठी व्यवस्थापन सल्लागार संस्थेच्या वतीने दर वर्षी परीक्षण केले जाते. दोन दिवसांपूर्वी ब्रिटीश स्टँडर्ड इन्स्टिटय़ूट या संस्थेचे प्रतिनिधी प्रदीप शेट्टी व बाबूकुमार यांनी परीक्षण केले. नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव करपे व विभागप्रमुखांची सभा घेऊन मानांकन कायम ठेवल्याचे त्यांनी जाहीर केले. जिल्हा परिषदेत बहुतांशी खातेप्रमुख नवीन बदलून आल्याने त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करावे, बांधकामांची गुणवत्ता तपासण्यासाठी निकषांची नियमावली तयार करावी, संगणकीकरणाच्या कामास वेग द्यावा, लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली न अडकता कर्मचाऱ्यांना प्रशासकीयदृष्टय़ा गतिमान करण्यासाठी प्रशिक्षण दिले जावे आदी सूचना या प्रतिनिधींनी केल्या. जि. प.ला यंदा अखिल भारतीय पातळीवर मिळालेला द्वितीय पुरस्कार, श्रमदान, संपूर्ण स्वच्छता, अंगणवाडय़ातील बालकांसाठी लोकसहभागातून मिळालेला सुमारे सव्वा कोटींचा पूरक आहार आदी मुद्यांचा मानांकन कायम ठेवताना विचार झाला.

‘व्यावसायिक आस्थापनांनाही वास्तूशास्त्र फायदेशीर’
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी
केवळ घरासाठीच नव्हे, तर व्यावसायिक व औद्योगिक आस्थापनांनाही वास्तूशास्त्र अत्यंत फायदेशीर ठरते. वास्तूशास्त्राचा वापर केला, तर आश्चर्यकारक चांगले परिणाम मिळतात, असे प्रतिपादन प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तूशास्त्र विशारद सतीश शर्मा (जयपूर) यांनी केले.लघुउद्योजकांच्या ‘अस्मिता’ या संघटनेतर्फे हॉटेल यश पॅलेसमध्ये आयोजित चर्चासत्रात शर्मा बोलत होते. वास्तूशास्त्र विशारद अक्षयकुमार नवलखा, संघटनेचे अध्यक्ष संतोष बोथरा, पेमराज बोथरा, हेमंत नरसाळे, गांधी या वेळी उपस्थित होते.नवलखा म्हणाले की, वास्तूशास्त्र ही आदर्श बांधकाम संकल्पना आहे. या शास्त्राने काढलेला आराखडा, त्यावर केलेली भौतिक व गणितीय प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. वास्तूशास्त्रानुसारच देश-विदेशांतील गगनचुंबी इमारती व औद्योगिक आस्थापनांचे बांधकाम होत आहे.उपस्थितांच्या शंकांचे निरसन नवलखा, शर्मा यांनी केले. हेमंत नरसाळे यांनी आभार मानले.

‘नगरसेवकांसाठी स्वतंत्र कक्ष मनपाच्या नव्या वास्तूत हवा’
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी
महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीत नगरसेवकांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला नाही, तर आयुक्तांच्या दालनात बसून कामकाज करण्याचा इशारा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दिला.
शहराच्या मध्यवर्ती भागापासून लांब बांधलेल्या या इमारतीबाबत नागरिकांमध्ये ‘खायला फुटाणे, टांग्याला आठ आणे’ अशी चर्चा असल्याची टीका करून स्वतसाठी आलिशान दालने बांधणाऱ्या व त्यात बसणाऱ्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांचे हाल दिसत नाहीत का, असा बोचरा प्रश्न बोराटे यांनी केला.नागरिकांची कामे घेऊन मनपा कार्यालयात येणाऱ्या नगरसेवकांची साधी बसण्याची व्यवस्थासुद्धा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी नव्या इमारतीत केलेली नाही. याबद्दल फक्त विरोधीच नाही, तर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांतही संताप असून, ८ दिवसांत नगरसेवकांसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था झाली नाही, तर सर्व नगरसेवक आयुक्तांच्या दालनात बसून कामकाज करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नगर अर्बन बँकेच्या कर्जावरील व्याजदरात कपात
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी
नगर अर्बन बँकेने १ मार्चपासून सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात कपात केली असून, यापुढे रिबेट सवलतीसह ११ ते १३ टक्क्य़ांपर्यंत व्याजदर राहील, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी दिली. बँकेच्या ठेवी ४१० कोटींपुढे गेल्या असून, त्यावरील व्याजदरही आकर्षक आहेत. बाजाराच्या दिवशी शाखा कार्यालय सुरू ठेवणे, सोनेतारण कर्ज व कॅश स्वीकारण्याच्या वेळेत वाढ, १५ लाखांपर्यंतची शैक्षणिक कर्जयोजना आदी सुविधांमुळे ग्राहक समाधानी असून, बँकेच्या व्यवहारात वृद्धी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.लवकरच बँकेच्या पुणे, शिरूर, कोपरगाव येथील शाखा कार्यान्वित होत असून, ‘आरटीजीएस’द्वारे लगेच पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे, असेही गांधी यांनी सांगितले.

कोहिनूर मंगल कार्यालयातील मंडपाला शॉर्टसर्किटमुळे आग
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी
सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालयातील मंडपाला आज सायंकाळी अचानक आग लागली. सुदैवाने मंडप जळण्याव्यतिरिक्त इतर कसलीही हानी झाली नाही. स्थानिक नगरसेवक निखिल वारे, तसेच मनसुख वाबळे व काही कार्यकर्त्यांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दूरध्वनी करून गाडी बोलावली. गाडी त्वरित आल्यामुळे लगेच आग शमवण्यात आली. कार्यालयात आज विवाह समारंभ असल्याने लहान मुलांसह बरीच गर्दी होती. बाहेरच्या बाजूस असलेला मंडप शॉर्टसर्किटमुळे अचानक पेटला. सुदैवाने त्यावेळी मंडपात कोणीही नव्हते.शहरातील एकाही मंगल कार्यालयात आग शमवण्याची यंत्रणा नाही. नियमाप्रमाणे किमान हाताने वापरता येणाऱ्या काही टाक्या (ज्यातून पाणी किंवा फेस फवारता येतो) व वाळूने भरलेल्या बादल्या असणे गरजेचे आहे. पण याची कसलीही तपासणी न करता मनपाकडून अशा सार्वजनिक कार्यक्रम होणाऱ्या सभागृहांना सर्रास परवानगी देण्यात येते, याबद्दल नगरसेवक वारे यांनी संताप व्यक्त केला.

६८ विद्यार्थ्यांवर तिरळेपणाची शस्त्रक्रिया
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी
सर्व शिक्षा अभियान, अपंग समावेशित शिक्षण व जिल्हा रुग्णालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालयात तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी ६८ विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. भास्कर खैरे, डॉ. संतोष कुरणवाळ, डॉ. उमेश आमराळे, डॉ. राजेश जोशी, डॉ. समीर सय्यद, डॉ. सदानंद पराळकर, निवासी वैद्यकीय अधिकारी रुद्राजी शेळके यांनी या शस्त्रक्रिया केल्या. या शस्त्रक्रियांचे हे तिसरे वर्ष आहे. जिल्हा रुग्णालयास महाराष्ट्र सरकारचा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार सलग तीन वर्षे मिळाला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर मारहाणीचा ९ जणांवर गुन्हा
कोपरगाव, ४ मार्च/वार्ताहर
विहिरीत आडवा बोअर का घेतो, या कारणावरून घरात घुसून केलेल्या मारहाणीत एकजण गंभीर, तर अन्य सातजण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कान्हेगाव शिवारात २१ फेब्रुवारीला घडल्याप्रकरणी न्यायालयाने या संदर्भात पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश आज दिला. त्यानुसार ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.ठाणे अंमलदार दहिफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कान्हेगाव शिवारात २१ फेब्रुवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास फिर्यादी कैलास सुखदेव काजळे, वडील सुखदेव, आई, पुतण्या, दोन भाऊ, दोन भावजया आदी घरांत असताना अचानक आरडाओरड करीत आरोपी शिवाजी रामचंद्र काजळे, सखाराम रामचंद्र काजळे, दिनकर रामचंद्र काजळे, अनिल शिवाजी काजळे, सुनील शिवाजी काजळे, बापू शिवाजी काजळे, प्रमोद सखाराम काजळे, देवीचंद काजळे, दत्तात्रेय दिनकर काजळे (सर्व कान्हेगाव शिवार) यांनी घरात घुसून कैलास काजळे व इतरांना गज, काठय़ा, कुऱ्हाडी, विटांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. जीवे मारण्याची धमकी दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार आज या ९ आरोपींविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली.

‘स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी आदिक यांना निष्ठा शिकवू नये’
राहाता, ४ मार्च/वार्ताहर
ज्यांनी स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष सोडला. पुन्हा मतलबासाठी काँग्रेस जवळ केली. त्यांना माजी मंत्री गोविंदराव आदिक यांना निष्ठा शिकवण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशी टीका राहाता तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी खासदार बाळासाहेब विखे यांचे नाव न घेता केली.डॉ. गोंदकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाचे उमेदवार पाडण्याचे काम केले. विधानपरिषद निवडणुकीत विनायक देशमुख यांच्या विरोधात कट केला.पक्षविरोधी कारवायांची काँग्रेस पक्षनिरीक्षकांकडे नोंद होती. तरीही आदिक यांना डावलून पक्षाने त्यांना झुकते माप दिले. आदिक यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. त्यांची ताकद लक्षात आल्यानेच काही नेत्यांना पोटशूळ उठला, असा आरोपही गोंदकर यांनी केला आहे.

जिल्ह्य़ात दोन्ही जागा कवाडे गट लढविणार
श्रीरामपूर, ४ मार्च/प्रतिनिधी

प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लीकन पार्टी लोकसभेच्या शिर्डी व नगर या दोन्ही जागा स्वबळावर लढविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुनील क्षेत्रे यांनी दिली.
सरकारी विश्रामगृहावर पक्षाची जिल्हास्तरीय बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्रदेश संघटक राजेंद्र थोरात होते. प्रा.जयंत गायकवाड, नितीन कसबेकर, शरद गायकवाड उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष संतोष मोकळ यांनी, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार राज्यात सत्तेवर असूनही दलितांवर अत्याचार झाले. त्यामुळे दोन्ही पक्षांना धडा शिकवा. कवाडे यांनी शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी सूचनाही केली. संपत भारुड, बाबासाहेब ब्राम्हणे, राजेंद्र भोसले, अशोक बागुल, मोहन रननवरे उपस्थित होते.

विश्वासात न घेता इमारतीचे काम सुरू केल्याची तक्रार
राहाता, ४ मार्च/वार्ताहर

निमगाव जाळी आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण समिती व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वसात न घेता जि. प.च्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता व ठेकेदाराने केंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम अचानक सुरू केले. जि. प.च्या आरोग्य विभागामार्फत केंद्राच्या इमारत दुरुस्ती व कर्मचारी वसाहतीसाठी १२ लाख मंजूर झाले आहेत. मात्र, कनिष्ठ अभियंता व ठेकेदाराने रुग्ण कल्याण समितीचे सदस्य व स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता तत्काळ इमारत दुरुस्तीच्या ना वाखाली काम हाती घेतले. त्याची कुणकुण लागताच रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांनी केंद्रात धाव घेतली. कुणाच्या परवानगीने काम सुरू केल्याची विचारणा केल्यावर ठेकेदार व कनिष्ठ अभियंत्याची गाळण उडाली. सरपंच छाया खरात, उपसरपंच डॉ. सुरेश जोंधळे यांनी याबाबत कानावर हात ठवले. अभियंता सोनवणे यांची जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांनी बदली करूनही ते बदलीच्या ठिकाणी न जाता आश्वी जि. प. गटातील जिल्हा परिषदेच्या बांधकामाच्या ठिकाणीच कामे करीत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

उघडय़ावर शौचास बसणाऱ्या ३५ जणांवर कारवाई
कोपरगाव, ४ मार्च/वार्ताहर

हागणदारीमुक्त गाव मोहिमेंतर्गत उघडय़ावर प्रातर्विधी करणाऱ्या ३५३जणांविरुद्ध वर्षभरात दंडात्मक कारवाई केल्याचे गटविकास अधिकारी रामचंद्र म्हस्के यांनी दिली.तालुक्यातील ७५ गावांपैकी २५ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. उर्वरित ५०पैकी ४३ गावे नव्याने निर्मलग्रामसाठी सज्ज झाली असून, काल तीन भरारी पथकांनी तालुक्यातील डाऊच खुर्द, सडे, ब्राह्मणगाव या तीन गावांत उघडय़ावर प्रातर्विधी करणाऱ्या ६० जणांचे व्हिडिओचित्रण केले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तालुक्यात वर्षभरात दहेगाव बोलका ११, चासनळी ३४, मंजूर १७, मुर्शतपूर १५, ताटेगाव ५, शिरसगाव-सावळगाव २५, मढी खुर्द ७, मढी बुद्रुक १३, सोनेवाडी ५५, शिंगणापूर ३६, तिळवणी ४, अंचलगाव २६, जेऊर कुंभारी २२, खिर्डी गणेश २३, सडे १३, डाऊच खुर्द ११, ब्राह्मणगाव ३७ अशा १७ गावांतून ३५३ जणांविरुद्ध भरारी पथकाने कारवाई केल्याचे गटविकास अधिकारी म्हस्के यांनी सांगितले.

पिंपळचा सांधा ते अशोकनगर रस्ताकामाचा प्रारंभ
श्रीरामपूर, ४ मार्च/प्रतिनिधी

अशोक साखर कारखान्याच्या वतीने पिंपळचा सांधा ते अशोकनगर रस्त्याचे उंबरगाव-अशोकनगर रस्त्यापर्यंत मजबुतीकरण, तसेच अशोकनगर रेल्वे चौकी ते मातापूर रस्त्यापर्यंत रस्त्याच्या मजबुतीकरणाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष रावसाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी कारखान्याचे संचालक अच्युतराव बनकर, विराज भोसले, माजी संचालक बाळकृष्ण मुंगसे, हिमंतराव धुमाळ, अण्णासाहेब बनकर उपस्थित होते.

त्रिभुवन यांचे नगरसेवकपद; उद्या भवितव्य ठरणार
श्रीरामपूर, ४ मार्च/प्रतिनिधी

पालिकेच्या प्रभाग चारमधील रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र त्रिभुवन यांच्या नगरसेवकपदाचे भवितव्य शुक्रवारी (दि. ६) ठरणार आहे. त्रिभुवन यांच्या निवडीस आव्हान देणारी याचिका शिवसेना-भाजप युतीचे पराभूत उमेदवार दत्ता आव्हाड यांनी केली होती. त्रिभुवन यांना ३ अपत्ये असल्याने नगरसेवकपदी अपात्र ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या दालनात याचिकेची अंतिम सुनावणी होणार आहे. याचिकेच्या निकालाबाबत उत्सुकता असून, आव्हाड यांच्या वतीने सी. के. शिंदे व एस. डी. काटकर उपस्थित राहणार आहेत.

पाथरवट समाजाचा ३१ रोजी वधू-वर मेळावा
कोपरगाव, ४ मार्च/वार्ताहर

पाथरवट, आगरी व रजपूत समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींचा राज्यस्तरीय परिचय व संवाद मेळावा आणि सामुदायिक विवाह ३१ मार्च रोजी होत आहे. मेळाव्यासाठी पाथरवट, आगरी व रजपूत समाजातील विवाहयोग्य वधू-वरांच्या पालकांनी आपल्या पाल्यांची नावे नोंदवावीत. सामुदायिक विवाहाचे आयोजन याच दिवशी केले जाणार आहे. प्रथम येणाऱ्या पाच जोडप्यांचा वैदिक पद्धतीने विवाह विनामूल्य लावून देण्यात येईल. या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले अर्ज ‘संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय, पंचवटी, नाशिक’ येथे पाठवावेत किंवा कोपरगाव मोबाईल नं. ९७६३८८२६७७, ९८८१३९९५६३, ९४२२३४११४६ आणि नाशिक मोबाईल नं. ९९२२१५९४७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव कुडके, पाथरवट समाजाचे अध्यक्ष रमेश भोपे यांनी केले.

शालिनीबाई नेवासकर यांचे निधन
राहुरी, ४ मार्च/वार्ताहर

येथील शालिनीबाई नेवासकर (वय ७५) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ‘सन टेलर्स’चे संचालक संजय व वृत्तपत्रविक्रेता शशिकांत यांच्या त्या मातुश्री होत.

श्रीराम पुरोहित यांचे निधन
नगर, ४ मार्च/प्रतिनिधी

मठाची वाडी (ता. शेवगाव) येथील माजी पोलीस पाटील श्रीराम लालजी पुरोहित यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुरोहित यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपचे प्रमुख कार्यकर्ते संतोष पुरोहित यांचे ते वडील होत.

पुरस्कारासाठी आवाहन
मुंबई येथील हुंडाविरोधी चळवळीच्या वतीने नगर जिल्ह्य़ात समाजोपयोगी कार्य करणाऱ्या महिलांना कै. राधाबाई कुलकर्णी विधायक कार्यकर्ती पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्य़ात किमान १० वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्तीनी दि. १ मेपर्यंत विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी ‘आशा कुलकर्णी, महासचिव, हुंडाविरोधी चळवळ, ४/५०, विष्णूप्रसाद सोसायटी, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ५७’, (मो. ९८१९३७३५२२) या पत्त्यावर अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.