Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

नेते म्हणाले
राजकीय शक्तीविना विकास अशक्य -पटेल
विदर्भाची राजकीय शक्ती प्रभावीपणे उभारू शकत नाही तोपर्यंत आपण आहे तेथेच राहू. राजकीय इच्छाशक्ती व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास परिवर्तन निश्चित होईल. आपल्याच लोकांकडून सत्कार होत असल्याचा आनंद तर, या प्रक्रियेस विलंब झाल्याचे दुख, अशी संमिश्र भावना आहे.


अवाढव्य ‘गजराज’च्या पहिल्या महिला पायलट व फ्लाईट इंजिनिअर नागपुरात!
पीयूष पाटील, नागपूर, ४ मार्च

महिला आणि वैमानिक हे समीकरण आता फार जुने झाले असले तरीही, भारतीय वायुसेनेच्या सर्वात मोठय़ा मालवाहू विमानाचे वैमानिक व फ्लाईट इंजिनिअर आणि महिला हे समीकरण मात्र नवे आहे पण, भारतीय वायुसेनेच्या इतिहासात नागपुरातील स्क्वाड्रन ४४ मध्ये गेल्या दोन महिन्यांपासून प्रथमच दोन महिला वायुसेनेच्या ‘गजराज’ या मालवाहू विमान चालकाची आणि विमानाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.

राजकीय अभिनिवेश बाजूला सारून विदर्भ विकासासाठी प्रयत्न करू
सत्कार समारंभात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप नेत्यांची ग्वाही

नागपूर, ४ मार्च / प्रतिनिधी

विदर्भाच्या सर्वागीण विकासासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला सारून आणि एकत्र येऊन प्रयत्न करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मिहानच्या शिल्पकारांच्या सत्कार समारंभात दिली.

शहरात खस आणि वूडवूलच्या ताटय़ांची दुकाने थाटली
नागपूर, ४ मार्च / प्रतिनिधी

उन्हाळयाची चाहुल लागताच शहारातील विविध भागात खस आणि वूडवूलच्या ताटय़ा विकणारे दिसून येतात. सकाळच्यावेळी थंडावा जाणवत असला तरी दुपारी ११ नंतर मात्र उकाडायला लागत त्यामुळे घरोघरी अडगळीत ठेवण्यात आलेले कुलर बाहेर काढण्यात आले. कुलरच्या खराब झालेल्या ताटय़ा बदलवून नवीन लावल्या जात असून त्याची विक्री शहरातील विविध भागात होत आहे.साधारणात: होळीनंतर उन्हाळा जाणवायला लागतो त्यामुळे अनेक नागरिक त्याचवेळी कुलर लावत असतात पण गेल्या चार पाच दिवसांपासून दुपारी आणि सायंकाळी उकडायला लागल्यामुळे लोकांनी होळीच्या आधीच कुलर बाहेर काढणे सुरू केले आहे.

दिव्याखालचा अंधार
स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीत लक्षणीय प्रगती करणाऱ्या व या क्षेत्रात राज्यपातळीवर पहिले पारितोषिक पटकावणाऱ्या नागपूर महापालिकेतील विद्युत विभागाचे चित्र मात्र अगदी याउलट आहे. शहरातील गल्लीबोळीत वीजपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या या विभागाच्या सद्यस्थितीचे वर्णन करायचे असेल तर दिव्याखाली अंधार असेच करावे लागेल. सर्वत्र अनागोंदी असेच या विभागाचे सध्याचे कामकाज आहे. तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांपासून तर या विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत सर्व सूत्रे कंत्राटदारांकडे एकवटली आहेत. आहे ते दिवे दुरुस्त करून सुरूकरण्याऐवजी कंत्राटदारांच्या कल्पनेतून निघालेल्या भन्नाट योजना वरिष्ठांच्या गळी उतरवून जास्तीत जास्त मलिदा कसा गोळा करता येईल,

आदिमचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नागपूर, ४ मार्च / प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीत ३० लाख मतदार मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा दाव आदिम संविधान संरक्षण समितीने केला आहे. समितीतर्फे तसे निवेदन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांना दिले आहे. प्रसिद्धीपत्रकात मागासवर्गीयांना संविधानात्मक सवलतीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग यांना जातीचा दाखला आणि वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या जाती, विमुक्त जाती या ८५ टक्के मागासवर्गीयांना विदेशी नागरिक समजून १९५० पूर्वीचा रहिवाशी पुरावा मागून मानसिक त्रास दिला जातो. घटनेत हलबा, माना, धनगर, गोवारी, धोबा, ठाकूर, महादेव कोळी इत्यादी आदिवसींचा समावेश आहे. परंतु कायद्यांची मोडतोड करून आरक्षणापासून वंचित केले जात आहे. भारतीय संविधानानुसार दिलेला सामाजिक दर्जा प्रमाणित करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. परंतु जात वैधता प्रमाणपत्राच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून संविधानाचा अपमान होत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मेडिकल कॉन्सिलच्या कार्यकारी परिषदेवर डॉ. मिश्रा यांची फेरनिवड
नागपूर, ४ मार्च / प्रतिनिधी

दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची मेडिकल कॉन्सिलच्या कार्यकारी परिषदेवर निवड झाली. मेडिकल कॉन्सिलच्या १३ व्या सर्वसाधारण सभेत परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणुका झाल्या होत्या. त्यात मिश्रा यांची फेरनिवड झाली. मिश्रा हे सलग तिसऱ्यांदा परिषदेवर गेले असून ते महाराष्ट्रातील एकमेव सदस्य आहेत. ते मेडिकल कॉन्सिलच्या पदव्युत्तर समितीचेही सदस्य आहेत.

मोटारसायकलींच्या धडकेत एक गंभीर
नागपूर, ४ मार्च / प्रतिनिधी

दोन मोटारसायकलींची धडक होऊन एक मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला. राम नगरातील महापालिका शाळेसमोर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
अश्विन मदनलाल पैगवार (रा. अंबाझरी ले आऊट) हे त्यांच्या हिरो हांेडाने (एमएच ३१/एसी/७५७७)ने रामनगर कापरेरेशन शाळेजवळून जात असताना वेगात आलेल्या एमएच ३१/बीएक्स/५४५१ क्रमांकाच्या हिरो होंडाने त्यांना धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या अश्विन यांना दंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपी हिरो होंडा चालकाविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मजुराचा मुत्यू; दोघांवर गुन्हा
नागपूर, ४ मार्च / प्रतिनिधी

सिमेंटचे खांब अंगावर पडून मजुराच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदारासह दोघांविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भांडेवाडी अंतुजी नगरात १५ डिसेंबर २००८ ला सिमेंटचे खांब अंगावर पडून धनराज रघुराम ठाकरे (रा़ ब्रम्हपुरी) याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तेव्हा आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. कंत्राटदार संजय दामोदर श्रावणकर (रा़ जुना सुभेदार ले आऊट) आणि सुपरवायझर अनिल हिरामण पाटील (रा़ ऑरेंज नगर खरबी रींग रोड) यांनी जीवनरक्षक सामुग्री न पुरविता मजुराकडून काम करून घेत होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे धनराजचा मृत्यू झाला, असे तपासात निष्पन्न झाले. नंदनवन पोलीसांनी त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मिटेवानी व चिचोलीतील पॅसेंजर हॉल्टचा १० मार्चला शुभारंभ
नागपूर, ४ मार्च / प्रतिनिधी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या तुमसर-तिरोडी रोडवरील मिटेवानी गावातील आणि गोबरवाही स्थानकाजवळील चिचोलीतील पॅसेंजर हॉल्टचा शुभारंभ १० मार्चला करण्यात येत आहे. यात्रेकरूंच्या अभावामुळे दोन्ही ठिकाणेचे पॅसेंजर हॉल्ट बंद करण्यात आले होते. त्यानंतर पून्हा या गावातील नागरिकांच्या मागणीवरून ते सुरू करण्यात येत आहेत. या पॅसेंजर हॉल्टला अप दिशेने गाडी क्रं. १ टी.टी. ४.३५ला येऊन ४.३६ला जाईल, गाडी क्रं. ३ टी.टी. ६.०५ ला येऊन ६.०६ला जाईल, गाडी क्रं. ५ टी.टी. १०.०५ला येऊन १०.०६ला जाईल आणि गाडीसंख्या ७ टी.टी. रात्री ४.१०ला येऊन ४.११ला चिचोली पॅसेंजर हॉल्ट येथून जाईल. याचप्रमारे डाऊन दिशेने गाडी क्रं. २ टी.टी. ६.३० ला येऊन ६.३१ला जाईल, गाडी क्रं. ४ टी.टी. ८.४०ला येऊन ८.४१ला जाईल, गाडी क्रं. ६ टी.टी. १२.२० ला येऊन १२.२१ला जाईल आणि गाडी क्रं. ८ टी.टी. रात्री ६.१० ला येऊन ६.११ला चिचोली पॅसेंजर हॉल्ट येथून जाईल.

विवाहेच्छुक युवक-युवतींच्या सूचीचे नि:शुल्क वाटप
नागपूर, ४ मार्च / प्रतिनिधी

राजपूत क्षत्रीय ठाकूर वैवाहिक मंडळाने प्रकाशित केलेल्या विवाहेच्छुक युवक-युवतींच्या नावाच्या सुचीचे नि:शुल्क वाटप करण्यात येत आहे. मंडळाच्यावतीने ७ फेब्रुवारीला दुसरा अखिल भारतीय युवक-युवती परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानुसार विवाहेच्छुक युवक-युवतींच्या नावांची पुस्तीका प्रकाशित करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुरूप मंडळातर्फे इच्छुक उमेदवारांच्या नावांची सुची प्रकाशित करण्यात आली असून तिचे नि:शुल्क वाटप करण्यात येत आहे. तरी समाज बांधवांनी चव्हाण भवन, एस.टी. स्टँड, कृष्णा निवासच्या बाजूला, गणेशपेठ नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्रसिंह चौहाण यांनी केले आहे.

घर बचाव अभियानांतर्गत जनजागरण सभा
नागपूर, ४ मार्च / प्रतिनिधी

शहर विकास मंच व उत्तर नागपूर विकास आघाडीच्या घर बचाव अभियाना अंतर्गत नागपूर शहरातील इंदिरा माता नगरात नुकतीच जनजागरण सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी उत्तर नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष अरूण गायकवाड होते. झोपडपट्टीवासियांना त्यांच्या राहत्या घराच्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देण्याची मागणी या सभेत करण्यात आली. बहुमजली इमारतीत फ्लॅट देण्याच्या योजनेस यावेळी विरोध करण्यात आला. या मागणीसाठी लढा उभारण्याचा निर्धारही सभेत करण्यात आला.सभेचे संचालन सहारे यांनी केले. सभेला रामलाल सोमकुंवर, श्रीराज गजभिये, शैलेंद्र वासनिक, प्रदीप कराडे प्रामुख्याने उपस्थित होते.

‘सारथी’तर्फे शुक्रवारी जागतिक मंदीवर चर्चासत्र
नागपूर , ४ मार्च / प्रतिनिधी

सारथी आणि नवी दिल्लीतील ‘फसी’ या दोन संस्थांच्या वतीने शुक्रवारी, ६ मार्चला जागतिक मंदी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईन्ट येथे हे चर्चासत्र होणार असून, सकाळी ९ ते सायंकाली ५ वाजतापर्यंत चर्चासत्र चालणार आहे. या चर्चासत्रात जागतिक मंदीसंदर्भात चर्चा केली जाणार असून, यशवंत भावे, कांचन जैन, अझीझ खान, सुधीर देवरस आणि रोहन नारसे आदी वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योजक या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत, असे सारथी संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शिबिरात ५५६ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी
नागपूर, ४ मार्च /प्रतिनिधी

सिटीजन्स फोरमचे संयोजक एजाज खान यांच्यावतीने किदवई ज्युनियर कॉलेजमध्ये नुकतेच नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ५५६ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यामधील १५ लोकांना मोतीबिंदू असल्याचे दिसून आले तर, १७६ लोकांना चश्मे देण्यात आले. डॉ. सुरेश शीतल प्रसाद यादव यांनी १५ लोकांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया केली. डॉ. आरेफा खानम, डॉ. आरिफ खान व डॉ. एन.एस. खान यांनी सहकार्य केले.

साधनाताई आमटे व कॅ. चाफेकरांना आज स्वांतत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार प्रदान
नागपूर, ४ मार्च/ प्रतिनिधी

स्वांतत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फेदेण्यात येणारा स्वांतत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार उद्या, गुरुवारी साधनाताई आमटे व कॅ. चिं. वि. चाफेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहोळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर उपस्थित राहणार आहे. पाच हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार दिवंगत बाळासाहेब देवरस, मोरोपंत पिंगळे, उषाताई चाटी, मा.गो. वैद्य, नितीन गडकरी आदींना देण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल समितीतर्फे दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात येत आहे. कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष महादेव बाजीराव, कार्याध्यक्ष अशोक ठाकरे व सरचिटणीस मुकुंद पाचखेडे यांनी केले आहे.