Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

नवनीत

जी व न द र्श न
देवपूजा

 

श्रावकाच्या षट्कर्मामध्ये देवपूजेला प्राधान्य दिलेले आहे. देव म्हणजे जगाचा कर्ता किंवा नियंता नव्हे. जे चोवीस र्तीथकर, सिद्धपुरुष, थोर मुनी होऊन गेले, ज्यांनी सुखी जगण्याचा आचारविचार सांगितला, आत्मकल्याण करून जनकल्याणही केले ते! देव काही देत नाही, घेत नाही; केवळ त्याच्यातल्या महान गुणांची पूजा म्हणजे देवपूजा. ‘वंदे तद्गुण लग्धेय’ असं म्हटलं आहे. पूजेचे दोन प्रकार आहेत. ‘भावपूजा’ आणि ‘द्रव्यपूजा’. पूजेत प्रथम अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय व साधू असा क्रम असतो. कुठलीही वस्तू न चढवता केवळ भक्तीने केलेली पूजा भावपूजा. जल, चंदन, अक्षत, पुष्प, नैवेद्य, दीप, धूप, फळ या आठ द्रव्यांनी केलेली द्रव्यपूजा. ही आठ द्रव्य चढवताना त्यांचा प्रतीकात्मक अर्थ सांगितलेला आहे आणि ‘निर्वपामतेस्वाह:’ असं म्हटलेलं असतं.
जल- मी सतत मृगजळामागे धावलो, माझी तहान भागली नाही. आता ज्ञानजल, समताजल पाजवून जन्म, जरा, मृत्यूपासून माझी सुटका करा. मुक्तिपद मिळू द्या. त्यासाठी हे उदक जल सोडतो आहे. चंदन- संसारातील अनेक तापांनी मी त्रस्त झालोय. तो शीतल व्हावा म्हणून चंदन चरणाशी अर्पित आहे. अक्षत- तांदूळ- पुन: पुन्हा जन्म-मरण नको, अक्षयपद, मुक्तिपद प्राप्त व्हावे म्हणून या अखंड अक्षत चढवतो आहे. पुष्प- मदनाच्या हातात फुलांचा बाण असतो तो मदनबाण, कामबाण मला लागू नये; विषयवासनेपासून मी दूर राहावे म्हणून फुलं वाहतो आहे. नैवेद्य- आजपर्यंत हजारो वस्तू खात आलो. तृप्ती झाली नाही. हा क्षुधारोग निवारण व्हावा म्हणून ‘नैवेद्यं निर्वपामतेस्वाह:’ दीप- हजारो दीप पेटवले, पण मनातील राग-द्वेष-मोहाचा अंधार दूर झाला नाही. त्यासाठी हे प्रभू हा दीप ओवाळतो आहे. प्रकाश मिळवू द्या. धूप- अज्ञान, मोह, जन्ममरण, संशय, अडचणी वगैरे आठ कर्मात मी फसलो आहे, त्या अष्ट कर्माचे दहन करण्यासाठी धूप जाळतो आहे. फल- आजपर्यंतच्या सुखोपभोगात रमून त्यालाच अमृतफळ समजलो, आता खरं मोक्षफल प्राप्त करण्यासाठी विविध फळं चढवीत आहे. शेवटी या सर्व वस्तू चढवून अनघ्र्यप्रद प्राप्त करण्यासाठी मी अघ्र्य प्रदान करतो आहे.
लीला शहा

कु तू ह ल
चंद्रावरील विवरे

चंद्रावर दिसणाऱ्या विवरांचे आकार केवढे आहेत? ही विवरं केव्हा व कशी निर्माण झाली?
चंद्रावरची विवरं संख्येनं, आकारानं आणि खोलीच्या दृष्टीनंही प्रचंड आहेत. चंद्रावरचं सर्वात खोल विवर चक्क १३ कि.मी. एवढय़ा खोलीचं आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवरचं सर्वात उंच असलेलं एव्हरेस्ट शिखर त्यात सहज ‘ठेवता’ येईल! अगदी अलीकडे म्हणजे १५ नोव्हेंबर २००८ या दिवशी आपल्या चांद्रयानानं चंद्रावरच्या मॉरिट्स नावाच्या विवराचा फोटो घेतला आहे. या विवराचा परिघ आहे ११७ कि.मी.! विवरांच्या संख्येविषयी आणि आकाराविषयी वैज्ञानिकांनी बरंच संशोधन केलं आहे. १ कि.मी., ५० कि.मी. आणि १०० कि.मी. व्यासाची बरीच विवरं चंद्रभूमीवर बघायला मिळतात. एक कि.मी. पेक्षा जास्त व्यास असलेली सुमारे पाच लक्ष विवरं चंद्रावर असावीत असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. आधी उल्लेख केलेलं चंद्रावरचं १३ कि.मी. खोली असलेलं विवर २२४० कि.मी. व्यासाचं असून, ते चंद्राच्या आपल्याला न दिसणाऱ्या गोलार्धात आहे. ज्वालामुखीचा उद्रेक आणि अशनींचा आघात ही या विवरांच्या निर्मितीमागची कारणं आहेत. आघातामुळे निर्माण झालेली विवरं अनियमित परिघाची असतात आणि त्यांच्या मध्यभागी उंचवटा असू शकतो. याउलट जर एखादं विवर शंकूसारखे आणि मध्यभागी उंचवटा नसलेलं असं असेल तर ते ज्वालामुखीमुळे निर्माण झालेलं असतं. सध्या चंद्रावर एकही जागृत ज्वालामुखी नाही. चंद्र काही कोटी वर्षांपूर्वीच शांत झाला आहे. त्यामुळे आघातातून निर्माण झालेली विवरं तुलनेनं तरुण आहेत. चंद्रावर वातावरण नाही. त्यामुळे अशनी वातावरणात जळून न जाता पृष्ठभागावर आपटतात. चंद्रावर विवरांची संख्या जास्त असण्याचं हेही एक कारण आहे.
गिरीश पिंपळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
कवयित्री आना गोरेंको

५ मार्च १९६६ रोजी रशियन कवयित्री आना गोरेंको हिचा मृत्यू झाला. त्यावेळेस रशियन साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवयित्री म्हणून तिचा गौरव करून रशियाच्या कडव्या साम्यवादी राजवटीने तिला न्याय दिला, असेच म्हणावे लागेल. २३ जून १८८९ रोजी एका नौदल अधिकाऱ्याच्या घरात आना गोरेंको हिचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षांपासून त्या कविता करायला लागल्या. रशियातील प्रसिद्ध कवी गुमिल्योव्ह यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. पण काही काळानंतर त्यांनी त्यांच्याशी घटस्फोट घेतला. दरम्यानच्या काळात ‘व्हेचर’, ‘सांजवेळ’, ‘च्यॉर्क’, ‘बेलाया स्ताया’, ‘पोदोरोझनिक’ आणि ‘आनो दोमिनी’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. ‘प्रेम’ हा त्यांच्या कवितांचा मुख्य विषय; धर्म, राष्ट्रप्रेम यावरही त्यांनी कविता लिहिल्या. सन १९२० च्या सुमारास नुकतीच रशियात क्रांती झाली होती. त्यावेळच्या बेबंदशाहीत घटस्फोटित पतीला फाशी दिल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी काव्यलेखन थांबवले. १९४० च्या सुमारास एका नियतकालिकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या. या सुमारास दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना स्फूर्ती मिळण्यासाठी त्यांनी काही भावकविता लिहिल्या. तथापि साम्यवादावर त्यांनी टीका केल्याने दस्तुरखुद्द स्टॅलिनची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली. त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी घालून त्यांचे काव्यसंग्रह जाळण्यात आले आणि त्यांच्या मुलालाही कैदेत टाकण्यात आले. परिणामी परिस्थितीशी काहीशी तडजोड करत त्यांनी साम्यवाद आणि स्टॅलिन यांच्यावर स्तुतिसुमने उधळणारी काही गीते लिहिली. रवींद्रनाथ टागोर, व्हिक्टर हय़ूगोसारख्या कवींच्या कवितांचे त्यांनी अनुवाद केले. निबंध समीक्षात्मक लेखही त्यांनी लिहिले. इटलीतून आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे डॉक्टरेटची पदवी त्यांना मिळाली होती.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
कोशातल्या अळीचं दु:ख
मासे, बेडूक, सुसरी, मगरी, शिंपले, शंख यातले किडे, पाणसाप, कीटक.. सारे पाण्यातले जग. चहूकडे पाणी असणाऱ्या या जगात नाना रंगांचे, नाना तऱ्हांचे जीव मजेत जगायचे. त्यातला एक छोटा जीव मात्र मुळीच मजेत जगत नव्हता. ती होती एका कोशात राहणारी, सुरकुतल्या अंगाची, बटबटीत डोळय़ांची एक अळी. बिचारी होती अगदीच कुरूप! ज्या तळय़ात ती राहायची त्यातील पाणी चकचकीत, निळेशार होते. जांभळट, किरमिजी रंगांची कमळे तळय़ात डुलत होती. तळय़ाकाठच्या गवतात पिवळीधम्म फुले फुलली होती. रंगांची ती उधळण पाहून अळी फार खिन्न झाली. जगात एवढे रंग असताना आपल्या वाटय़ाला हा कळकट रंग आला म्हणून दु:खाने तिला भरून आले. कुणाशी बोलावे, हसावे वाटेना. केवढा अन्याय झालाय आपल्यावर. दुखऱ्या मनाने, मलूल चेहऱ्याने ती अश्रू ढाळत राहायची. सुरुवातीला सगळय़ांना तिचे वाईट वाटायचे. बिचारी दु:खी आहे म्हणून प्रत्येकजण तिची समजूत काढायचा प्रयत्न करायचे. ती छोटेसे तोंड करून म्हणायची, हा घाणेरडा रंग, हे कुरूप जगणं माझ्याच नशिबाला का आलं ठाऊक नाही. किती दुर्दैवी मी! मला किनई काहीऽऽ करावं वाटत नाही. कुणाशी बोलावं वाटत नाही. छोटे छोटे कीटक आनंदात उडय़ा मारत यायचे. थट्टामस्करी करायचे. अळीला म्हणायचे, बाई गं, का अशी उदास. तिच्याभोवती फेर धरायचे. गाणी गायचे. आपले बटबटीत डोळे मिटत अळी म्हणायची, ‘नाही ऐकवत ही आनंदाची गाणी. कसला जन्म दिलाय मला? ना रूप ना रंग’! तिची रडकथा ऐकायला कीटक कशाला थांबतात? तिच्या रडण्याला सगळे जलचर कंटाळले. प्रवाह बदलून जाऊलागले. पाण्यातल्या गोगलगायी, शंखातले-शिंपल्यातले किडे तिला पाहून कवचात शिरायचे. कासव मान कवचात ओढून घ्यायचे. खेकडे तिची टर उडवायचे. पण सतत तक्रार करत, आपल्यावर अन्याय झालाय याचे दु:ख करत राहणे अळीने काही सोडले नाही. रडताना तिच्या अंगावरची लव थरथरायची. हुंदके देऊन ती आपली दु:खात बुडून जायची. बदकं तिची समजूत घालायची. अगं, सगळय़ाच अळय़ांना कोशात राहावं लागतं. त्यात बिघडलं कुठं! वाट पाहा. एके दिवशी तुझं रूप बदलून जाईल.’ आपल्या कोशामधून डोकं काढून अळी तुच्छतेने हसून म्हणायची, ‘माझा नाही बाई असल्या भाकडकथांवर विश्वास!’ एके दिवशी अळी एका वेलीवर चढत होती. हळूहळू मोठय़ा कष्टाने ती शरीर पुढे ढकलत होती. पाणवेलीच्या लवचिक खोडावरून चढत ती अर्धीअधिक पाण्याबाहेर आली. तिच्या भोवतीचा कोश फाटत गेला. तिचे सुरेख पाखरात रूपांतर झाले. सोनेरी चमचमते पंख फडफडवून ते सुकवू लागले. समोरच्या पाण्यात अळीला स्वत:चे प्रतिबिंब दिसले. ती थक्क झाली. किती सुंदर रूप, चमकता रंग, सुंदर पंख. ती मोठय़ांदा स्वत:शीच म्हणाली, ‘कुठाय मी कुरूप अळी! मी तर आहे सुंदर पाखरू!’
आपण प्रश्न, अडचण सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत बसतो आणि प्रश्न सुटण्याऐवजी गुंता वाढत जातो. खूपदा थांबणं आणि वाट पाहणं शहाणपणाचं असतं. त्यामुळे उत्तर सापडणं सोपं जातं.
आजचा संकल्प- मी धीरानं वागण्याचा प्रयत्न करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com