Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

महापालिका रुग्णालयात सुपर स्पेशालिटी विभाग सुरू
नवी मुंबई/प्रतिनिधी :
मुंबईतील हिंदुजा, लीलावती, हिरानंदानीसारख्या मोठय़ा रुग्णालयांच्या धर्तीवर नवी मुंबईतही एखादे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभे रहावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने तब्बल चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून ‘फोर्टीज’ या प्रसिद्ध उद्योग समूहाच्या माध्यमातून सुमारे १५० खाटांचे अद्ययावत असे रुग्णालय आजपासून नवी मुंबईकरांसाठी खुले करण्यात आले. नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील ५०० खाटांच्या रुग्णालयातील २०० खाटांमध्ये हे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.

पुनर्रचित मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व नाही
संजीव नाईक यांचा दावा

नवी मुंबई/प्रतिनिधी-
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे हा मतदारसंघ पूर्वीप्रमाणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला नाही, असा दावा या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार संजीव नाईक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.

पोलीस संरक्षणातही एनएमएमटी बसेसची तोडफोड; उरण बससेवा ठप्प
उरण/वार्ताहर :
पोलीस संरक्षणाच्या हमीनंतरही एनएमएमटी बसेसची तोडफोड करण्याचे प्रकार थांबले नसल्याचे सोमवारपासून पुन्हा एकदा उरण शहरापर्यंत येणाऱ्या एनएमएमटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे हजारो प्रवाशांवर प्रचंड हाल सहन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

प्रवाशांचा रिक्षाचालकांविरुद्ध शिमगा !
पनवेल/प्रतिनिधी :
मीटर न टाकता मनमानी भाडे आकारणी करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे संकेत आरटीओने दिल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने पनवेलमधील प्रवाशांमध्ये कमालीचे संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

नेटिझन्सची नेटशाही
‘‘अरे, परवा माझ्या शाळेतील माझा जिगरी यार भेटला, गेले तीन-चार वर्षे आमचा काहीच संपर्क नव्हता, तो कुठे आहे हेदेखील माहीत नव्हते.’’ ‘‘काय सांगतोस काय? सही यार. मला पण माझी एक्स गर्लफ्रेंड भेटली, ती म्हणते की, आपण फ्रेंडशीप तरी ठेवूया, काय स्क्रॅप पोस्ट करू हेच कळत नाही. बघू.’’ असे अनेक संवाद तरुणांच्या घोळक्यातून आपल्या कानावर पडत असतात. आता एवढे जुने-जुने मित्र भेटले ते प्रत्यक्ष नव्हे तर ऑर्कूट, फेसबूक, मायस्पेस यांसारख्या ‘सोशल नेटवर्किंग’च्या वेबसाइटच्या माध्यमातून. सध्याचे नेटिझन्स या सर्व साइटच्या इतक्या अधीन आहेत की या साइट्स म्हणजे त्यांचा भेटी-गाठीचा ऑनलाइन नाकाच बनल्या आहेत.

वीज बिल न भरल्याने शासकीय विश्रामगृह अंधारात
उरण/वार्ताहर :
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला आर्थिक कडकीने ग्रासल्याने शासकीय विश्रामगृहाचे विजेचे बिल भरता आले नाही. यामुळे वीज मंडळाने विश्रामगृहाचा वीजपुरवठा मागील चार दिवसांपासून खंडित केला आहे. उरण येथील शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. मात्र अलिबग कार्यालयाकडून खर्चाचा निधी न आल्याने विजेचे बिल भरता आले नसल्याची माहिती कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी दिली. या आधीही विजेची बिले वेळेवर भरता आली नसल्याने अनेकदा शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रकार घडल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रकारामुळे अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

अर्थसंकल्प मंजुरीसाठी बोलावलेल्या विशेष सभेकडे सत्ताधारी गटाची पाठ
उरण/वार्ताहर :
शिवसेनेचे नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर यांनी अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी बोलावलेल्या विशेष सभेकडे सत्ताधारी भाजप-सेना-शेकापच्या सदस्यांनीच पाठ फिरविली आहे. यामुळे गणसंख्येअभावी याविषयीची विशेष सभा रद्द करण्याची पाळी नगराध्यक्षांवर आली. उरण नगर परिषदेत सेना-भाजप-शेकापची सत्ता आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून शिवसेनेचेच नगराध्यक्ष करंगुटकर यांच्याशी सत्ताधारी गटातील सदस्यांशी पटेनासे झाले आहे. यामुळे नगराध्यक्षविरोधी सेनेच्या- तीन, भाजप- तीन व शेकापच्या- एक, तसेच काँग्रेसच्या तीन नगरसेवकांच्या सोबतीने दबाव गट निर्माण केला आहे. सत्ताधारी गटाचे काही सदस्य अनधिकृत बांधकामांमध्ये सहभागी आहेत. त्यांना नगराध्यक्ष साथ देत नसल्याने सत्ताधारी गटांमधील दरी चांगलीच रुंदावली आहे. त्याचा प्रत्यय नगराध्यक्षांनी बोलाविलेल्या मागील काही नपाच्या सभांमध्ये आला होता. दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्षांनी अर्थसंकल्पासंबंधात विशेष सभा बोलाविली होती. मात्र मागील वर्षांतील सुधारित व पुढील वर्षांच्या अंदाजित अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी बोलाविण्यात आलेल्या या सभेकडे नगराध्यक्ष विरोधी गटातील शिवसेना-तीन, भाजप-तीन, काँग्रेस-तीन, शेकाप-एक, राष्ट्रवादी-एक आदी ११ सदस्यांनी पाठ फिरविली. नगराध्यक्षांसह या सभेस सहाच सदस्य उपस्थित राहिल्याने सभेसाठी आवश्यक गणसंख्या पूर्ण झाली नाही. यामुळे विशेष सभा गणसंख्येअभावी रद्द करण्याची पाळी नगराध्यक्षांवर आली. अर्थसंकल्पाला विशेष सभेत मंजुरी न मिळाल्याने अडचणी निर्माण होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. याप्रकरणी अधिक माहिती देताना उरण न.प. मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी अर्थसंकल्प विशेष सभेत मंजूर झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये मंजूर झाला आहे, यामुळे अर्थसंकल्प मंजुरीसाठी जिल्हाधिकारी सभा बोलावू शकतात. अथवा स्थायी समितीची मंजुरी अंतिम ग्राह्य मानून जिल्हाधिकारी मंजुरी देऊ शकतात. कोणता निर्णय घ्यावा, याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच असल्याची माहितीही येलगट्टे यांनी दिली आहे.

एनएमएमटी कर्मचाऱ्यांनी घेतले कौशल्यवृद्धीचे धडे
बेलापूर/वार्ताहर :
एनएमएमटी बस सेवेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रशासनाने चंग बांधला असून, यासाठी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. याकरिता रिटेल ट्रेनिंग प्रा.लि. तर्फे कर्मचाऱ्यांना ‘कौशल्यवृद्धी व व्यक्तिमत्त्व विकास’ विषयक प्रशिक्षण देण्यात आले.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रवासी सेवेच्या दृष्टीने यशस्वी होण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिवहन उपक्रमाच्या विकास प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे, असे मत एनएमएमटीचे व्यवस्थापक जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केले. या प्रशिक्षण वर्गात कर्मचाऱ्यांची उपक्रमावरील निष्ठा वाढावी, वरिष्ठांचा विश्वास कसा संपादन करावा, परस्पर समन्वय, सांघिक भावनेने काम कसे करावे, प्रवाशांची तक्रार कौशल्यतेने कशी हाताळावी आदीबाबत प्रशिक्षक शुभांगी ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. खासगी प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढत असताना सरकारी वाहतूक प्रवाशांना अधिक सोयीस्कर व आपलीशी वाटण्यासाठी प्रशासनाने एकसंधपणे काम करण्याची आवश्यक असल्याचे मत प्रशिक्षण संस्थेचे शशीकुमार यांनी व्यक्त केले. विश्वासार्हता व शिस्तबद्धता यानेच परिवहन उपक्रमाच्या विकासात वाढ होईल, असे ते म्हणाले. एनएमएमटीने १३ व्या वर्षांत पदार्पण केल्याने या वर्षभरात उपक्रमाच्या विकासासाठी या शिबिरासह इतरही उपक्रम राबविण्याचा मानस पापळकर यांनी व्यक्त केला.