Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

महंतांच्या उमेदवारीने बसपाचे धक्कातंत्र!
प्रतिनिधी / नाशिक

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून प्रबळ दावेदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि

 

शिवसेना हे दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवाराच्या शोधमोहीमेत गुंतले असताना उत्तरप्रदेशातील ‘सोशल इंजिनिअरिंग पॅटर्न’च्या धर्तीवर मायावतींच्या बहुजन समाज पार्टीने आपल्या उमेदवाराची थेट घोषणाच करून धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. विशेष म्हणजे, ज्या नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रहाचा ऐतिहासिक लढा झाला, त्याच काळाराम मंदिराच्या पुजारी घराण्यातील महंत सुधीरदास यांना बसपाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील गुंतागुंत अधिकच वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
नाशिक मतदारसंघातून त्यांच्याच पक्षाचे आचार्य महामंडालेश्वर महंत श्री सुधीरदास महाराज यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची बातमी सर्वप्रथम ‘लोकसत्ता’मध्येच झळकली होती. त्यानुसार आता निवडणुकीची धामधूम सुरू होताच पुजारी यांची उमेदवारी घोषीत करून बसपाने राजकीय पटलावर मोठे तरंग उमटविले आहेत. महंत सुधीरदास यांनी गेल्या काही दिवसांपासून योजनाबद्धरित्या राजकीय डावपेचांची आखणी सुरू केली होती. उत्तर प्रदेशात मायावतींचा सोशल इंजिनिअरिंग फॉम्र्युला यशस्वी होताच त्यांनी बसपामध्ये प्रवेश करून आपले इरादे स्पष्ट केले होते. तत्पूर्वी, सुमारे तीन वर्षांपूर्वी पुजारी यांनी दलीत व आदिवासी समाजातील १०० गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून आपल्या पूर्वजांकरवी झालेल्या चुकीचे परिमार्जन करण्याचा आपला हेतू त्यामागे असल्याचे स्पष्ट केले होते.
नाशिक येथे झालेल्या गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी पुजारी हे अत्यंत सक्रीय होते. त्या माध्यमातून त्यांनी आपली महंताई देखील करवून घेतली होती. त्यानंतर ते उज्जन येथे झालेल्या कुंभमेळ्यामध्ये ते महंत म्हणून वावरले. तेव्हापासून ते वैयक्तीक पातळीवर देखील सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग करीत असल्याचे विविध उदाहरणांवरून दिसून आले आहे. काळाराम मंदीर प्रवेशाला ७९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नुकत्याच येथील काळाराम मंदीर परिसरात झालेल्या सत्याग्रही अभिवादन सोहळ्यातही ते अग्रस्थानी होते. याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी देखील दर्शनासाठी खुल्या करून देण्यात आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर, महंत सुधीरदास यांची जाहीर झालेली उमेदवारी लक्षवेधी ठरली आहे.
बसपा महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशच्या धर्तीवर सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग या लोकसभा निवडणुकीत करणार, हे उघड होते. त्यानुसार बसपाने राज्यातील आपल्या उमेदवारांच्या जाहीर केलेल्या पहिल्याच यादीमध्ये महंत सुधीरदास यांचे नांव असल्यामुळे परिसरात त्याबाबत कुतुहलमिश्रीत आश्चर्य व्यक्त होत आहे. सुधीरदास यांच्या उमेदवारीने या मतदारसंघातील राजकीय समीकरणांची काही प्रमाणात का होईना, उलथापालथ होणार असल्याने शिवसेना व राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांना कितीही म्हटले तरी आपल्या सध्याच्या गणितांची फेरमांडणी करावी लागणार आहे. आतापर्यंत सुधीरदास यांच्याबरोबरीनेच एका माजी महापौराचे नावही बसपातर्फे नाशिकमधून चर्चेत होते, तथापि आता सुधीरदास यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणतीही कसर बाकी ठेवायचीच नाही अशा निर्धाराने बसपातर्फेअडाखे बांधले जात आहेत. अधिकाधिक मते घेऊ शकतील अशा उमेदवारांना निवडणुकीच्या आखाडय़ात उतरवून आपला मतदानाचा टक्का वाढविण्याचे या पक्षाचे प्रयत्न आहेत. नाशिक मतदार संघातून श्री काळाराम मंदिराचे पुजारी अनंत श्री विभूषित जनस्थान पीठाधीश्वर १००८ आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज यांनाच थेट तिकीट देऊन पक्षाने आपला हाच इरादा दाखवून दिला आहे. पुणे आणि नाशिक येथून जाणीवपूर्वक ब्राह्मण उमेदवार थेट निवडणूक रिंगणात उतरविण्याचा तसेच त्यांच्या पाठिशी पक्षाची ताकद पूर्णताकदीनिशी उभी करण्याचे संकेतही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिल्याचे सांगण्यात येते.