Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राजीनाम्याचा मुद्दा आणि काँग्रेसजन
भाऊसाहेब :
नाशकात अन् दिंडोरीत कांग्रेसची काय हालचाल रे भावराव..
भाऊराव : निवडणुकीचा मोसम असूनसुद्धा या दोन्ही मतदारसंघात सध्या काँग्रेसच्या आघाडीवर तशी सामसूमच आहे दादा.
भाऊसाहेब : अन् मग तरी कांग्रेस कमिटीतल्या बैठकीत एकामेकाच्या इरोधात बार का निघाले?
भावडय़ा : आम्ही पोरांनी जोशात येऊन जरा काही केलं की, लगेच उपदेशाचे डोस पाजता, आता बोला ना डॅड..
भाऊराव : हे पहा अंतर्गत गटबाजी हा काँग्रेसचा स्थायीभाव आहे..
भावडय़ा : त्यामुळेच पक्षाला आता कोणताच भाव राहिला नाही, खरयं ना?
भाऊसाहेब : अरं, त्याच्यावालं ऐक की जरा.
भाऊराव : दादा, अजून त्याला तेवढी ‘पॉलिटिकल मॅच्युरिटी’ नाही, त्यासाठी अगोदर गल्लीपासून

 

दिल्लीपासूनची काँग्रेस समजून घ्यावी लागेल. ती एकदा समजली की, काँग्रेसच्या नाशकातल्या जनजागरण विकास यात्रेच्या बैठकीत घडलं त्यात नवीन काही नाही, हे आपोआप ध्यानात येईल.
भावडय़ा : तुमची ती मॅच्युरिटी अन् आमची ती.. जाऊ द्या, तुम्ही काँग्रसवाले असेच गोलगोल बोलणार. म्हणे काँग्रेस समजून घ्या, आहे काय त्यात समजण्यासारखं ? गल्ली पासून दिल्लीपर्यंत सगळीकडे आपल्याच माणसांचे पाय खेचायचे, त्यालाच आम्ही एका शब्दात म्हणतो ना ‘राजकारणातलं पॉलिटिक्स’ काय?
भाऊसाहेब : आरं, तुमी बाप-लेक आपल्या घराची कांग्रेस कमिटी कशापायी करताय? भावराव, जरा नीट सांग बघू कशावरून वांदा झाला त्ये..
भाऊराव : अहो, ते आपले नगरसेवक दिनकर अण्णा आहेत ना..
भावडय़ा : लोक ज्यांना नाशिकचे लालू म्हणतात तेच ना ?
भाऊराव : भावडय़ा, बस्स झालं तुझं, जरा ऐक आता. तर, हे अण्णा जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांना बाहेरची तर सोडाच पण महापालिकेतल्या पक्षाच्या सगळ्या नगरसेवकांचीही मते मिळाली नाहीत, मग त्यांना राग येणारच ना ? विकास यात्रेच्या निमित्ताने झालेल्या बैठकीत त्यांनी मग चढवला आवाज तर बिघडलं कुठे?
भाऊसाहेब : आरं, पन त्यांनी बाकी साऱ्यांचे येकदम राजीनामेच मागितले म्हने..
भाऊराव : हां, जेवढय़ा तेवढीही मते पडली नाहीत, म्हणजेच ती विकली गेली असे त्यांचे म्हणणे आहे आणि नैतिकतेच्या मुद्दयावर त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागितले.
भावडय़ा : नैतिकतेवर राजीनामे अन् ते ही काँग्रसवाल्यांचे !
भाऊसाहेब : आरं, आगीनगाडीचा आक्षिडन झाला तरी नैतिक जबाबदारीमुळं पूर्वी कांग्रेसचे रेल्वेमंत्री राजीनामा द्यायचे भावडय़ा..
भावडय़ा : तो इतिहास झाला, काय डॅड?
भाऊराव : आता परिस्थिती बदलली आहे खरी. शिवाय, नियोजन मंडळ निवडणुकीचा विषय तसा जिव्हाळ्याचा असल्याने..
भाऊसाहेब : आरं, पनं नियोजन मंडळाच्या निवडणुकीचं पक्षानं निगुतीनं नियोजन नको करायला ?
भाऊराव : नियोजनातच थोडी अडचण आहे, म्हणजे असं की..
भावडय़ा : जाऊ दे ना डॅड, कशाला आढेवेढे.. सरळ आमच्या शब्दात सांगा की, राजकारणात लै पॉलिटिक्स झालयं म्हणून !
पॉलिटिशन
rangeelarangari@gmail.com