Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘विकासाबाबत दक्षता बाळगावी’
लोकसभेत नाशिकचे प्रतिनिधित्व यशवंतराव चव्हाण, गो. ह. देशपांडे यांच्यासारख्या नामवंतांनी केले आहे. साहजिकच या मतदार संघातून निवडून येणाऱ्या खासदाराकडून नाशिककरांच्या खूप अपेक्षा असतात. सध्या मुंबई, पुणे, नाशिक हा विकासात्मक सुवर्णत्रिकोण तयार होतो आहे. या पाश्र्वभूमीवर

 

दळणवळणाची साधने अपेक्षित आहेत. द्रूतगती रस्त्याचे काम पूर्णत्वास येत आहे, परंतु त्याचबरोबर नाशिककडून मुंबई-नागपूर-पुणे अशा पद्धतीने मुख्य शहरांना लवकर पोहचता यावे म्हणून नियमितपणे विमानसेवा कायमस्वरुपी उपलब्ध कशी होईल, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी खासदाराने दक्षता घ्यावी.
दळणवळणाचा मुद्दा अन्य कारणांसाठीही महत्त्वाचा आहे. दळणवळणाची साधने सक्षम असतील तर अंबड, सातपूर, सिन्नर, गोंदे येथील औद्योगिक वसाहतींमध्ये येण्यास उद्योजक पुढाकार घेतील. त्याबरोबरच उद्योजकांना जमीन, वीाज, पाणी या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर स्थानिकांना मोठा रोजगार मिळेल. सुदैवाने या सगळ्या औद्योगिक वसाहती नाशिक लोकसभा मतदार संघात आहेत. त्यांच्या विकासासाठी खासदाराने पुढाकार घ्यावा.
कृषी दृष्टय़ा देखील नाशिकचा परिसर महत्त्वाचा आहे. येथून मुंबईला भाजीपाला व पाणीही पुरविले जाते. तथापि, चांगला माल पिकवूनही स्थानिक शेतकऱ्यांची हेळसांड होते. येथील द्राक्षे, कांदा, डाळींब थेट परदेशात पाठविण्याची सुविधा दिल्ली दरबारी पाठपुरावा करून उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे नाशिकजवळील ओढा रेल्वे स्टेशनवर जादा बोगी (व्ॉगन) उपलब्ध करून दिल्यास येथील भाजीपाल्याला व शेतीमालाला देशांतर्गत बाजारात चांगली किंमत मिळू शकते. पण दुर्दैवाने नेमके हेच मुद्दे मागे पडतात. पुणे-नाशिक, नाशिक-सुरत रेल्वे मार्गाची अनेक वर्षांची मागणी आहे. ती पूर्ण झाल्यास शेतीबरोबरच व्यापारी व नोकरदारांनाही लाभ होईल. नाशिकमध्ये ‘वाईन’ उद्योग भरारी घेण्याच्या अवस्थेत आहेत. त्यात अधिक संशोधन करून उद्योगास चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याऐवजी खासदाराने एखादा रस्ता, वाचनालयाची इमारत, समाजमंदिराची कामे करणे म्हणजे विकास असा समज करून घेऊ नये.
विकासाबरोबरच वाहतुकीचीही मोठी समस्या आहे. स्वच्छता, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात विविध योजना राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी खासदाराने निवडून आल्यानंतर स्थानिक तज्ज्ञांची समिती नेमून विकास कामांचा नियोजन आराखडा तयार केल्यास मतदार संघाचे ‘नंदनवन’ होण्यास वेळ लागणार नाही. थोडक्यात, पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करून त्यानुसार कार्यरत रहावे, अशी अपेक्षा खासदाराकडून आहे.
प्रकाश मते
अध्यक्ष, दक्षता अभियान, नाशिक