Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

झुंजार!
दिवसाकाठी एक वेळेला तरी पोट भरेल एवढे धान्य, पावसापासून संरक्षण करणारी घोंगडी, अंधारात काम करताना साप-विंचवापासून रक्षण व्हावे म्हणून विजेरी.. अशा अगदी मूलभूत मागण्यांसाठी आदिवासी सालदारांना मग्रूर मालदारांविरुद्ध संघटीत करण्यापासून सुरू झालेली वाहरू सोनवणे यांची संघर्ष यात्रा आज आदिवासींचा आत्मसन्मान व मानवमुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. ‘गोधड’ मुळे साहित्य क्षेत्रात आपली ठसठशीत मोहोर उमटविणाऱ्या सोनवणे यांना खरे तर स्वानुभवाचे जे तुटक तुटक भाग आपण खरडतो त्याला कधी काळी साहित्यमूल्य प्राप्त होईल, याची जशी सुतराम कल्पना नव्हती तशीच कुठल्याही पक्ष-संघटनेची सुद्धा गंधवार्ता नव्हती. त्यामुळेच श्रमिकांना-आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी स्वत:च्या आयुष्याचीच चळवळ करूनही सोनवणे यांना अभिनिवेश शिवलेला देखील नाही. सातपुडय़ाच्या दुर्गम-अतिदुर्गम भागात अठरा विश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींचे जगणे सुसह्य़ व्हावे, यासाठी सातत्याने केलेल्या संघर्षांत त्यांचा संपर्क अनेक लहान-थोर मंडळींशी आला. त्यांच्या चर्चामधूनच सोनवणे यांना मार्क्‍सवाद, गांधीवाद, लोहियावादाचा परिचय झाला, विविध विचारवंतांचे तत्वज्ञान माहिती झाले, पण त्याच्या कितीतरी अगोदर त्यांनी खऱ्या अर्थाने उपेक्षितांचे अंतरंग जाणून घेतल्यामुळेच की काय याबाबत भल्याभल्यांचा होतो तसा वैचारिक गोंधळ वगैरे त्यांचा कधी उडाला नाही आणि निव्वळ बौद्धीकांचा रतीब घालण्यापेक्षा रानोमाळ भटकून प्रत्यक्षातील कामाद्वारे प्रश्न सोडविण्यावर त्यांनी भर दिला. चळवळीतील योगदान आणि साहित्य निर्मिती याबाबत त्यांना व्यक्तिगत मानसन्मान भरपूर मिळाले असले तरी आजदेखील मळलेल्या, फाटक्या गोधडीत गुदमरणाऱ्या आदिवासींचा आत्मसन्मान सोनवणे यांना त्याहून कितीतरी अधिक वाटतो, हे विशेष.
शहादा परिसरात प्राथमिक शिक्षण झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना लगतच्या मध्य प्रदेशातील खेतीया तसेच सेंधवा या ठिकाणी जावे लागले. १२ वी पर्यंत तेथे त्यांनी शिक्षण घेतले. १२ वीच्या परीक्षेपूर्वी काही दिवस सुटी असल्याने ते घरी आले होते. पण, भूगोलाच्या प्रात्यक्षिक परीक्षेबाबतचे पत्र त्यांना उशीरा मिळाले व परीक्षा हुकली. परिणामी, आता वर्षभर त्यांना घरीच राहावे लागणार होते. मग, त्यांनी आपल्या भाऊबंदांप्रमाणे, मित्रांप्रमाणे शेतीच्या, रोजगार हमीच्या कामावर जायचे ठरविले. पण, त्यांना अशा कामांची सवय नसल्याने ते मागे राहत. मग त्यांची मित्रमंडळी त्यांची चेष्टाही करीत आणि मदतीचा हात पुढे करून कामही हलके करीत. त्या सुमारास विविध योजनांद्वारे आदिवासींना जमीनी वगैरे मिळत होत्या. आपल्या गावातील मंडळींसाठी त्याबाबत काही करता येईल का, तसेच कुठे नोकरी मिळेल का, याचा शोध घेण्यासाठी ते पायीच २० किलोमीटरवरील सुलवाडेकडे निघाले असता रस्त्यात त्यांना त्यांचा एक मामा भेटला. विचारपूस झाल्यावर मामाने त्यांना आदिवासींसाठी त्या भागात काम करणाऱ्या अंबरसिंग महाराज यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते अंबरसिंगांकडे गेले. सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून आदिवासींमध्ये जनजागृतीचे काम करणाऱ्या अंबरसिंगांशी झालेल्या चर्चेतून त्यांना आपल्या बांधवांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या अनेक कहाण्या समजल्या व त्यांनी आपल्यालाही तुमच्याप्रमाणे काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. अंबरसिंगांनी इथे काही सुविधा नाहीत, दोन-दोन दिवस उपाशी रहावे लागते, धनिकांचा मार खावा लागतो, जेलमध्ये जावे लागते असे सांगून पुन्हा एकदा शांतपणे विचार करण्याचा सल्ला सोनवणे यांना दिला. आपल्याला हे सगळे मान्य असल्याचे सोनवणे यांनी तडफदारपणे सांगितले व तेथूनच त्यांच्या संघर्षमय प्रवासाला सुरूवात झाली..
सुरुवातीला त्यांच्यावर आदिवासी तरुणांच्या संघटनाबरोबरच विविध शासकीय योजनांचा अभ्यास करून आदिवासींना त्याचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. पण, मुख्य अडचण होती ती भाषेची. कारण पाडय़ावरची भाषा भिलोरी व शिक्षण हिंदी माध्यमातून झाल्याने तोवर त्यांना मराठी जुजबीच येत होते. पण, जात्याच चांगली बुद्धीमत्ता असल्याने त्यांनी अल्पावधीतच या अडचणीवर मात केली व शासन दरबारी अर्ज-फाटे करण्यात ते पारंगत झाले. दरम्यान, पावसाळ्याला सुरूवात झाली होती. सोनवणे यांचा मुक्काम अंबरसिंगांच्या टेकभिलाटी येथील झोपडीवजा कार्यालयात होता. पावसाची संततधार थांबण्याचं नांव घेत नव्हती. झोपडी चहुबाजुने गळत असल्यामुळे एका कोपऱ्यात सोनवणे रात्रभर बसून होते. दुसरा दिवसही तसाच गेला आणि काळोख पडल्यावर त्यांना रडूच फुटणे बाकी होते. त्या अवस्थेत त्यांना अंबरसिंगांचे शब्द आठवले व त्यांनी मनाला सावरत आपला निग्रह कायम ठेवला. अशा अनेक प्रसंगांतून तावून-सुलाखून निघाल्यामुळे कोणत्याही संघर्षांसाठी ते सज्ज झाले. दरम्यान, त्यांनी आदिवासी भिल्ल सेवा मंडळाच्या कार्याला गती दिली. त्या काळात सातपुडय़ातल्या आदिवासींवर धनिक मंडळींकडून अनन्वीत अत्याचार होत असल्याने सर्वप्रथम आदिवासींना संघटीत करून त्यांना हक्काची जाणीव करून देण्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरविले.
त्यानुसार आदिवासी पाडय़ांवर जाऊन जनजागृतीसाठी बैठका, जेथे धनिकांची दहशत जास्तच आहे तेथे गुप्त बैठका यांचे सत्र सुरू झाले. हळुहळू त्यांनी जाहीर पत्रके वगैरे काढायला सुरूवात केली. विविध कारणांसाठी आदिवसींना आपल्या जमीनी गमवाव्या लागल्या होत्या. या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करून ग्रामस्वराज्य समितीच्या कामाला चालना देण्यात आली. १९७२ मध्ये शहादा-तळोदा भागात भू-मुक्ती मेळाव्याद्वारे या मंडळींनी जवळपास १० हजार एकर जमीन आदिवासींना परत मिळवून दिली. अर्थात, हे सहजासहजी झाले नाही, त्यासाठी सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. अनेकदा तुरुंगाची हवाही खावी लागली. या सगळ्या संघर्षांच्या बातम्या बाहेर पसरायला लागल्यावर अनेक मंडळी त्यांच्या भेटीसाठी येऊ लागली. त्यात लाल निशाण पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, जनसंघ आदि मंडळी त्यांना भेटली खरी, मात्र तोवर त्यांना पक्ष, त्यांच्या वैचारिक भूमिका, तत्वज्ञान, राजकीय मते याबाबत कोणतीही माहिती नव्हती. दरम्यान, केवळ आदिवासी शेतकरीच नव्हे तर एकूणातच सगळा श्रमिक वर्ग पीडित असल्याचे पाहून ग्रामस्वराज्य समितीला समांतर म्हणून श्रमिक संघटनेची स्थापना करण्यात आली. त्यामध्येही सोनवणे यांचा पुढाकार होता. समिती आणि श्रमिक संघटना परस्परांना पूरक म्हणून कार्य करीत होत्या. त्यातून कार्यकर्त्यांना कामाचा हुरूप येत होता. नवनवे कार्यक्रम-उपक्रमांचे आयोजन सुरू झाले. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या उपस्थितीत शहाद्याला सालदार-शेतमजूर एकता परिषद घेण्यात आली. ही परिषद परिसरातील धनिकांच्या उरात धडकी भरविण्याएवढी जंगी झाली. परिणामी, परिषदेच्या व्यासपीठावरून करण्यात आलेल्या सालदारांना दिवसाकाठी एक वेळेला तरी पोट भरेल एवढे धान्य, पावसापासून संरक्षण करणारी घोंगडी, अंधारात काम करताना विजेरी आदी बहुसंख्य मागण्या मालक मंडळींनी मान्य केल्या. या मागण्या अगदीच प्राथमिक स्वरूपाच्या असल्या तरी आदिवासी मजुरांसाठी त्या लाखमोलाच्या होत्या. त्यामुळे आदिवासींमध्ये संघटनेबाबत सहानुभूतीची एक लाट आली.
आदिवासींचे संघटन मजबूत होत असल्याचे पाहून धनदांडग्यांनीही एकत्र येऊन काही सेना-संघटना स्थापून चळवळ दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातून रक्तरंजीत संघर्षही झाला.
पण, सोनवणे व त्यांचे सहकारी त्यामुळे अजिबात डगमगले नाहीत, उलट त्यांनी आणखी जोमाने काम सुरू केले. त्यातून जेलभरो आंदोलन, कायदेभंग चळवळ, शिबीरे सुरू झाली. आंदोलनाच्या परिणामी हस्तांतरीत जमीनी परत करायच्या मुदतीत भरघोस वाढ करणे सरकारला भाग पडले. त्याजोडीला दारूबंदी वगैरे सामाजिक मुद्देही उचलून धरल्यामुळे संघटनेचा चांगलाच बोलबाला आणि दबदबाही निर्माण झाला.
या सगळ्या संघर्षांच्या प्रक्रियेत मग त्यांना अन्य सामाजिक चळवळींतील नेतेमंडळींची मदत मिळू लागली. कुमार शिराळकर, दिनानाथ मनोहर, माधव रहाळकर, प्रफुल बिडवई, अच्युत गोडबोले आदिंच्या घनिष्ठ संपर्कातून या चळवळीला अधिकाधिक योग्य दिशा देण्याचा प्रयत्न झाला. या मंडळींशी चर्चा-गप्पांमधून मार्क्‍सवाद, गांधीवाद, लोहियावादाबाबतची माहिती सोनवणे यांना झाली. जशी माहिती होत गेली तसे वादविवाद-चर्चा अधिकच रंगू लागल्या. तशातच आणीबाणी जाहीर झाली आणि सोनवणे यांचा कल कम्युनिस्ट विचारसरणीकडे झुकत गेला. पुढे तर त्यांच्यावर या विचाराचा एवढा प्रभाव पडला की, श्रमिक संघटनेचीच पूर्णवेळ कार्यकर्ती असलेल्या हिरकणी बरोबर विवाहानंतर झालेल्या मुलाचे नांव त्यांनी मार्क्‍स, लेनीन आणि माओ यांच्या अद्याक्षरांवरून चक्क ‘मालेमा’ असे ठेवले. दरम्यान, सततची फिरफिर, दौरे यामुळे आणीबाणीच्या काळात सोनवणे आजारी पडले. उपचारासाठी त्यांना प्रथम जळगावला आणि मग मुंबईला नेण्यात आले. तेथे रुग्णालयात फावला वेळ भरपूर मिळत असल्याने त्यांनी आणीबाणीवर काही लेख लिहिले. ते वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले. चळवळीच्या माध्यमातून झालेली अनेक मित्रमंडळी मुंबईत होती. मोहन देशपांडे, अशोक राजवाडे व त्यांचे साहित्यिक मित्र दर आठवडय़ाला एकत्र येत. सोनवणेही तेथे जाऊ लागले व त्यांची साहित्य प्रतिभा फुलत गेली. इतरांच्या कविता ऐकून सोनवणे यांनीसुद्धा आपल्या आयुष्यातील काही अनुभवांचे तुकडे लिहिले व ते या मित्रांना ऐकवले. हीच तुझी कविता असल्याचे सांगत त्यांनी प्रोत्साहन दिले.
त्यांच्या कविताना नियतकालिकांमधून प्रसिद्धी मिळाली, दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठीही त्यांना बोलावणे आले. १९८७ मध्ये ‘गोधड’ हा त्यांचा भिलोरी व मराठी भाषेतील पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
सामाजिक आशयावर बेतलेल्या या काव्यसंग्रहाची विविध क्षेत्रातून वाखाणणी झाली. विविध पुरस्कार मिळाले. अनेक अभ्यासक्रमांसाठी त्यांच्या कविता लागल्या. नावाचा बोलबाला सुरू झाल्यावर त्यांना आदिवासी,
परिवर्तनवादी, विद्रोही अशा वेगळ्या प्रवाहांच्या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली.
या माध्यमातून त्यांनी सुरू केलेले आदिवासींचा आत्मसन्मानासाठीचे प्रयत्न अजूनही चालूच आहेत. आदिवासी म्हटल्यावर अरेरे, बिचारे असा एकूणात अन्य मंडळींचा दृष्टीकोन असतो, तो बदलावा आणि आदिवासींची सुद्धा एक विशिष्ट जीवनपद्धती आहे, त्याला समृद्ध संस्कृती आहे, आदिवासी जीवनाला एक वैचारिक बैठक आहे, ती समजून घ्यावी असे त्यांचे म्हणणे आहे. ‘चंद्रावरचे फक्त डागच बघत बसण्यापेक्षा त्याच्या प्रकाशाचीही जाणीव करून घ्या’, असे त्यांचे सांगणे आहे आणि यापुढचे आयुष्य त्यासाठी खर्च करण्याचे सोनवणे यांनी आता निश्चित केले आहे.. (लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यामुळे निवडणुक विषयक बातम्या, वार्तापत्रे यांना प्राधान्य देणे अपरिहार्य आहे. परिणामी, तूर्त हे सदर स्थगित ठेवण्यात येत असून निवडणुकीनंतर दर गुरूवारी पुन्हा ‘प्रोफाईल’द्वारे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा परिचय सुरू होईल.)