Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वृक्षसंवर्धनासाठी नेचर क्लबचा उपक्रम
प्रतिनिधी / नाशिक

वृक्ष संवर्धनासाठी सदैव प्रयत्न करणाऱ्या येथील नेचर क्लब ऑफ नाशिक या संस्थेतर्फे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संदेशातंर्गत‘चला वृक्ष बघू या’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून

 

७ मार्च रोजी सकाळी सात वाजता या उपक्रमास सुरूवात होणार आहे.
आपल्या शहरातील अनेक भागात नागरिकांना विविध प्रकारचे वृक्ष दिसतात. काही वृक्षांचा आकार, काहींची उंची, काहींची फुले नागरिकांना आकर्षित करीत असली तरी त्यांच्या विषयी फारशी माहिती त्यांना नसते. हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना असते, परंतु त्याविषयी योग्य माहिती त्यांना मिळत नाही. शहरातील नागरिकांची ही उत्सुकता शमविण्याचा एक प्रयत्न म्हणून नेचर क्लब ऑफ नाशिकने पुढाकार घेतला आहे. शहरातील दुर्मिळ वृक्ष कोणते, दुर्मिळ वृक्षांचा इतिहास, त्यांची संख्या व वृक्षप्रेमींना आपल्या परिसरातील वृक्षांचे ज्ञान व्हावे तसेच वृक्षसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने क्लबतर्फे उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
संपूर्ण शहरात हा उपक्रम सुरू करण्याचा क्लबचा मनोदय असला तरी प्रारंभीच्या टप्प्यात काही विशिष्ट भागांमध्येच हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्र्यंबकरोडवरील वीर सावरकर जलतरण तलावापासून टिळकवाडी, पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नवीन गंगापूर नाक्याजवळील हॉटेल सूर पर्यंतच्या हद्दीत येणाऱ्या वृक्षांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर हा उपक्रम शहरातील विविध भागांमध्येही राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी केले आहे.