Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भाजप, माकपची प्रचारात आघाडी; राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे कॉंग्रेसची पंचाईत
नाशिक / प्रतिनिधी

काँग्रेस व जनता दल या पक्षांना अधिक प्रमाणात जवळ करणारा म्हणून ओळख असलेला मालेगाव लोकसभा मतदार संघ पुनर्रचनेनंतर आता दिंडोरी मतदार संघ झाला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदार संघाची झालेली तोडफोड काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी अनुकूल दिसत असली तरी मागील निवडणुकीत भाजपला कौल देणाऱ्या या मतदार संघातील चित्र उमेदवारी जाहीर

 

झाल्यानंतरच अधिक स्पष्ट होईल.
कोणत्या उमेदवाराला विजयी करायचे, हे ठरविणाऱ्या पूर्वीच्या मालेगाव लोकसभा मतदार संघातील मालेगाव आणि दाभाडी हे विधानसभा मतदार संघ पुनर्रचनेत धुळे लोकसभा मतदार संघात गेले आहेत. पुनर्रचित दिंडोरी मतदार संघात नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड व दिंडोरी या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. पेठ तालुका दिंडोरीमध्ये तर सुरगाणा तालुका कळवण विधानसभा मतदार संघात समाविष्ट करण्यात आला आहे. सद्यस्थितीत सहापैकी पाच विधानसभा मतदार संघांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. निहाल अहमद यांच्यामुळे जनता दलाला कायम साथ देणारा मालेगाव विधानसभा मतदार संघ धुळ्याला जोडण्यात आल्याने त्यांची ताकद आता नसल्यागत झाली आहे. पेठ-सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे माकपचे आ. जीवा पांडु गावित यांची लोकसभेसाठी उमेदवारी सर्वप्रथम जाहीर झाल्याने त्यांनी प्रचारास सुरूवात केली आहे.
भाजप-सेना युती होईल किंवा नाही या वादात न पडता भाजपनेही नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा घेऊन प्रचाराचे रणशिंग फुंकले. भाजपकडून खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण राहील, याविषयी अनिश्चितता कायम आहे. पाच आमदार राष्ट्रवादीचे असल्याने त्यांनीही मतदार संघावर दावा केला आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेले दिवंगत झेड. एम. कहांडोळे आणि कचरूभाऊ राऊत यांची मुले अनुक्रमे रमेश कहांडोळे व दिलीप राऊत यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एकंदरच काँग्रेस आघाडी, सेना-भाजप युती व माकपची तिसरी आघाडी यांच्यात तिरंगी सामना होण्याची चिन्हे आहेत. मनसेची भूमिकाही नांदगावसारख्या भागात महत्वपूर्ण ठरू शकते.