Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

लोहशिंगवे परिसरात बिबटय़ाचा संचार
भगूर / वार्ताहर

लोहशिंगवे भागात पुन्हा एकदा बिबटय़ाने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली असून त्यामुळे नागरिक

 

भयभीत झाले आहेत.
भगूरपासून जवळच असलेल्या लोहशिंगवे, वंजारवाडी भागात बिबटय़ाचा मुक्त संचार सुरू आहे. बिबटय़ांकरवी कुत्र्यांना भक्ष केले जात आहे.
या भागात मोठय़ा प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. सध्या बहुतेक क्षेत्रावरचा ऊस साखर कारखान्यांमध्ये पोहोचल्याने बिबटय़ांना लपण्यासाठी जागा राहिलेली नाही. त्यातच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्या जंगलभागात पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. रानालगतच लोहशिंगवे व वंजारवाडी ही गावे असल्याने बिबटे दरवर्षी या भागाचा आश्रम घेतात. या भागात दारणा नदी असल्याने बिबटय़ांना पिण्याचे पाणीही सहजरित्या उपलब्ध होत असते. याच कारणांमुळे यंदाही बिबटय़ांचा संचार येथे वाढल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणातील परिस्थिती पाहता, या भागात पिंजरा लावून बिबटय़ांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भ्रष्टाचार विरोधी समितीची शाखा
भ्रष्टाचारासारखी अनिष्ट प्रथा ही समाजहिताला घातक ठरू पाहत असल्याने त्याविरुद्ध एकत्रित येऊन सामाजिक संघर्ष उभा करण्याची गरज भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी समितीचे अध्यक्ष ए. आर. खान यांनी व्यक्त केली.
देवळाली कॅम्प येथे समितीचे उद्घाटन खान यांच्या हस्ते सिंधी पंचायत सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी समितीचे जिल्हाध्यक्ष मनी नायर होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे निरीक्षक निसार सय्यद, महासचिव अरीफ शेख, जनरल सेक्रेटरी मनिष सच्चर, नरेंद्र निकम, हमाम शेख आदी उपस्थित होते. स्वागत पंडित साळवे, डॉ. पार्वती लकारिया, पारोसी तडवी, मनुषा राजभोज यांनी केले.