Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी न केल्यास कारवाई - वेलरासू
नाशिक / प्रतिनिधी

निवडणूक आचारसंहितेच्या काळात सर्व यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहून आपापली जबाबदारी पार पाडणे अभिप्रेत आहे. यामध्ये कोणत्याही स्वरुपाची हलगर्जी सहन केली जाणार नाही. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा अन्यथा संबंधितांवर व्यक्तीश : गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा

 

जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी दिला.
आचारसंहितेची व या काळातील संबंधीत यंत्रणांच्या जबाबदारीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महसूल, पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा परिषद, केंद्र शासनाची कार्यालये, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, नगरपालिका आदी यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महापालिका आयुक्त विलास ठाकूर, पोलीस आयुक्त हिमांशू रॉय, पोलीस अधीक्षक डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जी. वाघ, अपर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, म्हाडाच्या नयना गुंडे, निवासी उप जिल्हाधिकारी रमेश काळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सरिता नरके आदी उपस्थित होते.
या बैठकीत महापालिका, नगरपालिका हद्दीतील तसेच ग्रामीण भागातील होर्डिग्ज, बॅनर, भित्ती पत्रके, भित्ती चित्रे संबंधित यंत्रणांनी तातडीने काढून टाकावीत. पोलीस, महसूल, आरटीओ या यंत्रणांचे निवडणूक संबंधी अधिकारी, कर्मचारी यांच्या तातडीने बैठका, कार्यशाळा घ्याव्यात, वाहनांवरील निवडणूक प्रचार साहित्य वापरावर काटेकोर र्निबध घालावेत, ज्यांना शस्त्रे धारण करण्याचा परवाना दिला त्यांच्या परवान्यांची छाननी करणे, निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निवडणुकीचा कालावधी संपेपर्यंत नवीन शस्त्र परवाने देवू नये, सर्व पक्षांना विविध परवान्यांबाबत समान न्याय द्यावा आदी निवडणूक आचारसंहिते संबंधी विषयांवर चर्चा करण्यात आली.
यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत पोलीस व महसूल यंत्रणेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवडणूक संबंधी प्रशिक्षण घेण्याबाबत उप जिल्हा निवडणूक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
संदेवदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राची यादी पोलिसांनी तातडीने तयार करावी असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी ही यादी गतकाळात दाखल केलेल्या गुन्ह्य़ांच्या नोंदीवर सर्वस्वी अवलंबून न ठेवता ती सध्याच्या वस्तुस्थितीवर अवलंबून असावी अशी सूचना केली.