Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नांदगाव पालिकेचे करवाढ नसलेले अंदाजपत्रक मंजूर
नांदगाव / वार्ताहर

नगरपालिकेचे २००९-१० वर्षांचे कोणतेही करवाढ नसलेले अंदाजपत्रक नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मंजूर करण्यात आले. एकूण शिल्लक एक लाख ८६ हजार ७१० रूपये

 

दाखविण्यात आली आहे.
मिळकतीच्या बाजूस आठ कोटी ३१ लाख ३६ हजार रूपये तर खर्च बाजूस आठ कोटी २९ लाख ४९ हजार २९० रूपये दाखविण्यात आले आहेत. अंदाजपत्रकाचे वाचन पी. एम. रासकर यांनी केले असून सूचक म्हणून यशवंत शिंदे तर अनुमोदक राजेश सुरंजे हे होते. सभेस यमुनाबाई महाजन, कांताबाई पवार, शिवाजी पाटील, शकुंतला कवडे, अंजनाबाई गायकवाड, चेतन पाटील आदी उपस्थित होते.
सिंगल फेज योजनेची मागणी
तालुक्यातील श्रीरामनगरमधील राऊतवाडा व महाजनवाडा येथे विद्युत कंपनीने सिंगल फेज योजना सुरू करावी यासाठी सहाय्यक अभियंत्यास निवेदन देण्यात आले होते. उपोषणही सुरू करण्यात आले होते. वीज वितरण कंपनीतर्फे नांदगांव उपकेंद्रात वेगळ्या प्रकारचे रोहित्र बसविल्यानंतर सिंगल फेज योजना सुरू करण्यात येईल. सदर काम तीन आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. याबरोबरच साकोरा, वाखारी येथील ग्रामस्थांनाही या योजनेचा लाभ मिळेल, असे लेखी पत्र देण्यात आल्याने राऊतवाडा व महाजनवाडा येथील ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. यावेळी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कचेश्वर बारसेंचा सत्कार
पुरोगामी विचारसरणीच्या लोकांची राजकीय क्षेत्राला मोठी आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अ‍ॅड. अनिल आहेर यांनी केले. नांदगाव येथे जेष्ठ शिक्षक नेते कचेश्वर बारसे यांचा एकसष्टीपूर्ती निमित्ताने जिल्हा बँक आवारात सत्कार समांरभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री बा. य. परीट गुरुजी, महात्मा गांधी विद्यामंदिरचे समन्वयक अपूर्व हिरे, जेष्ठ नेते बापू कवडे, विधीतज्ञ जयकुमार कासलीवाल, अशोक परदेशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. डी अहिरे यांनी केले. प्रास्ताविक रवि सोनस यांनी केले.