Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दुसऱ्या टप्प्यातील कांदा अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग
नांदगाव / वार्ताहर

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात जानेवारी ते मार्च या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५० रूपये प्रमाणे अनुदान महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार अनुदानाचा दुसरा टप्पा ७१ लाख नऊ हजार ८५९ रूपये जिल्हा बँकेत वर्ग झाले असून संबधितांनी

 

आपापल्या जिल्हा बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन सभापती तेज कवडे व सचिव ज्ञानदेव आहेर यांनी केले आहे.
बाजार समितीने आठ हजार ३६ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा दोन कोटी ३७ लाख चार हजार ५७२ रूपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव शासनाला यापूर्वीच सादर केला आहे. त्यानुसार शासनाने पहिल्या टप्प्यात १,०२,३२,०१७ रूपये इतके अनुदान मंजूर केले असून त्याचे वाटप याआधी काही गांवाना झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील कांदा अनुदान ७१, ०९, ८५९ जिल्हा बँकेस प्राप्त झाले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाचा लाभ तालुक्यातील भवरी, भालूर, नांदगाव, वडाळी, सोयगांव, मांडवड, पिंजारवाडी, लक्ष्मीनगर, लोहशिंगवे, मोहगांव, हिसवळ, फुलेनगर, दहेगांव या गावातील शेतकऱ्यांना मिळणार असून उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान ६३,६२,६९६ रूपये मिळविण्यासाठी बाजार समितीचे संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे कवडे व आहेर यांनी सांगितले.
जळगाव शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन
तालुक्यातील जळगांव बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या संगणक कक्षाचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती मांगीलाल डंबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य निंबा मोरे अध्यक्षस्थानी होते. शाळेला पाच संगणक प्राप्त झाले असून दोन शिक्षक संगणक प्रशिक्षक आहेत.
कार्यक्रमास सरपंच दगा गावंडे, शिक्षक नेते भाऊसाहेब मवाळ, सोसायटी अध्यक्ष नामदेव गिते, उपाध्यक्ष दत्तात्रय कांदे आदी उपस्थित होते.