Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

महंतांच्या उमेदवारीने बसपाचे धक्कातंत्र!
प्रतिनिधी / नाशिक

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून प्रबळ दावेदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवाराच्या शोधमोहीमेत गुंतले असताना उत्तरप्रदेशातील ‘सोशल इंजिनिअरिंग पॅटर्न’च्या धर्तीवर मायावतींच्या बहुजन समाज पार्टीने आपल्या उमेदवाराची थेट घोषणाच करून धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. विशेष म्हणजे, ज्या नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रहाचा ऐतिहासिक लढा झाला, त्याच काळाराम मंदिराच्या पुजारी घराण्यातील महंत सुधीरदास यांना बसपाने उमेदवारी दिली आहे.

राजीनाम्याचा मुद्दा आणि काँग्रेसजन
भाऊसाहेब : नाशकात अन् दिंडोरीत कांग्रेसची काय हालचाल रे भावराव..
भाऊराव : निवडणुकीचा मोसम असूनसुद्धा या दोन्ही मतदारसंघात सध्या काँग्रेसच्या आघाडीवर तशी सामसूमच आहे दादा.
भाऊसाहेब : अन् मग तरी कांग्रेस कमिटीतल्या बैठकीत एकामेकाच्या इरोधात बार का निघाले?
भावडय़ा : आम्ही पोरांनी जोशात येऊन जरा काही केलं की, लगेच उपदेशाचे डोस पाजता, आता बोला ना डॅड..
भाऊराव : हे पहा अंतर्गत गटबाजी हा काँग्रेसचा स्थायीभाव आहे..

‘विकासाबाबत दक्षता बाळगावी’
लोकसभेत नाशिकचे प्रतिनिधित्व यशवंतराव चव्हाण, गो. ह. देशपांडे यांच्यासारख्या नामवंतांनी केले आहे. साहजिकच या मतदार संघातून निवडून येणाऱ्या खासदाराकडून नाशिककरांच्या खूप अपेक्षा असतात. सध्या मुंबई, पुणे, नाशिक हा विकासात्मक सुवर्णत्रिकोण तयार होतो आहे. या पाश्र्वभूमीवर दळणवळणाची साधने अपेक्षित आहेत. द्रूतगती रस्त्याचे काम पूर्णत्वास येत आहे, परंतु त्याचबरोबर नाशिककडून मुंबई-नागपूर-पुणे अशा पद्धतीने मुख्य शहरांना लवकर पोहचता यावे म्हणून नियमितपणे विमानसेवा कायमस्वरुपी उपलब्ध कशी होईल, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी खासदाराने दक्षता घ्यावी.

झुंजार!
दिवसाकाठी एक वेळेला तरी पोट भरेल एवढे धान्य, पावसापासून संरक्षण करणारी घोंगडी, अंधारात काम करताना साप-विंचवापासून रक्षण व्हावे म्हणून विजेरी.. अशा अगदी मूलभूत मागण्यांसाठी आदिवासी सालदारांना मग्रूर मालदारांविरुद्ध संघटीत करण्यापासून सुरू झालेली वाहरू सोनवणे यांची संघर्ष यात्रा आज आदिवासींचा आत्मसन्मान व मानवमुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. ‘गोधड’ मुळे साहित्य क्षेत्रात आपली ठसठशीत मोहोर उमटविणाऱ्या सोनवणे यांना खरे तर स्वानुभवाचे जे तुटक तुटक भाग आपण खरडतो त्याला कधी काळी साहित्यमूल्य प्राप्त होईल, याची जशी सुतराम कल्पना नव्हती तशीच कुठल्याही पक्ष-संघटनेची सुद्धा गंधवार्ता नव्हती.

स्वाधार केंद्रातर्फे निराधार महिलांना आवाहन
जळगाव / वार्ताहर

शहरातील आनंदनगर परिसरात महिला व बाल विकास विभागामार्फत अनुदानित चाळीसगावच्या गजानन स्पोर्टस बहुउद्देशीय संस्थेचे स्वाधार केंद्र मंजूर झाले असून या केंद्रात निराधार, विधवा व परित्यक्ता महिलांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या संस्थेमार्फत मोफत कायदेशीर सल्लाही दिला जाणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गोष्टी पुरविल्या जाणार आहे. केंद्रात जळगाव जिल्ह्य़ातील ज्या महिलांना प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी महिला व बालविकास अधिकारी, जळगाव जिल्हा तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल आवारे यांच्याशी गजानन प्रसाद, ब्लॉक नं. दोन, आनंद नगर, मोहाडी रोड जळगाव या संस्थेच्या पत्यावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

लासलगाव परिसरात महिलेची हत्या
लासलगाव / वार्ताहर

येथे गळा कापून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात गेल्या पाच दिवसात हत्येच्या दोन घटना उघडकीस आल्याने जनतेत भितीचे वातावरण पसरले आहे. लासलगाव ग्रामपंचायतीचे सदस्य डी. जे. जगताप यांना टाकळी शिवारात शिवनदी पात्रात जगताप वस्तीजवळ मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांना त्यासंदर्भात माहिती दिली. २५ ते २८ वयाच्या महिलेचा हा मृतदेह असून अंगात पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, उजव्या हातावर आशा हे मराठी नाव व देवीचे चित्र गोंदलेले आहे. महिलेची उंची साडेपाच फुट असून मंगळसूत्र आहे. घटनास्थळी पुरुषाची चप्पल, दोन स्लिपर जोड, दोन देशी दारूच्या बाटल्या पोलिीसांना आढळून आल्या. लासलगाव पोलिसांनी मारेक ऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी लासलगाव पोलीस ठाण्याशी ९४२२३२११५० किंवा (०२५५०)२६६०५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.

निमगाव गटात भाविसे गट संपर्क प्रमुखपदांची नियुक्ती जाहीर
नांदगाव / वार्ताहर

निमगांव गटात भारतीय विद्यार्थी सेनेच्या गट संपर्क प्रमुख व उपतालुका प्रमुख पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तालुका प्रमुख संजीव पगारे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गटाच्या संपर्क प्रमुखपदी नरेंद्र आहेर, भालूर संपर्क प्रमुखपदी अमित आहेर, साकोरा गटाच्या संपर्क प्रमुखपदी डॉ. शालक पगार, निमगांव गटाच्या संपर्क प्रमुखपदी चंद्रकांत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून उपतालुका प्रमुखपदी न्यायडोंगरी येथे नंदकुमार आहेर, नांदगाव येथे अनंत आहेर, सागर हिरे, भालूरमध्ये उत्तम व्हरंगळ, साकोरा येथे शिवाजी सुरसे, निमगांव गटात संदीप आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय विद्यार्थी सेनेच्या शहर प्रमुखपदी संदीप आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकशाहीदिनी केवळ एकाच अर्जावर निर्णय
जळगाव / वार्ताहर

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाहीदिनाच्या कार्यक्रमात एकूण ११२ तक्रार अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी फक्त एकाच अर्जावर बैठकीत निर्णय घेण्यात आला. उर्वरीत १११ तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे चौकशीसाठी पाठविण्यात आले आहे. महसूल विभागाशी संबंधित १०, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संबंधित १३, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नावे आठ, सार्वजनिक बांधकाम विभाग एक, अधीक्षक भूमी अभिलेख विभागाशी संबंधित नऊ, पाटबंधारे विभाग एक, नगरपालिका संबंधी दोन व अन्य विभागाचे १२ तर सरकारी विभागाशी संबंधित सर्वाधिक ५४ अर्ज दाखल झाले होते. आजपर्यंत एकूण ८१४२ तक्रारी दाखल झाल्या असून ७७९० अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. तसेच ३५२ तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत.