Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

प्रताप कापड गिरणीचा मुद्दा कळीचा
वार्ताहर / धुळे

एकेकाळी खान्देशचे वैभव म्हणून संपूर्ण राज्यात परिचित असलेल्या येथील प्रताप कापड गिरणीची अवस्था सध्या खालावली असली तरी त्याकडे पहाण्याची कोणत्याही लोकप्रतिनिधीला आजवर गरज भासलेली नाही. केंद्रीय पातळीवरील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने (एनटीसी) ताब्यात घेतलेला हा कापड उद्योग ऊर्जितावस्थेत येण्याची शक्यता धूसर बनली असली तरी किमान देशोधडीला लागलेल्या कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता कुणी लक्षात घेतलेली नाही, अशी स्थिती आहे. किमानपक्षी येत्या निवडणुकीच्या निमित्ताने तरी या मुद्दय़ाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले जाणे अपेक्षित आहे.

काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांविरुध्द कारवाईचा ठराव संघटनेच्या बैठकीत मंजूर
वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ात काळा बाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांविरुध्द कठोर स्वरूपाची कारवाई करावी, असा ठराव जळगाव जिल्हा सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावामुळे आता धान्याचा काळाबाजार रोखण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आली आहे. संघटना कोणत्याही परिस्थितीत गैरव्यवहार करणाऱ्या दुकानदारांना पाठिशी घालणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी मनोमीलनावर प्रश्नचिन्ह
घडामोडी, शहादा / वार्ताहर

नंदुरबार लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा जिल्ह्य़ातील सर्व दिग्गजांनी काँग्रेसकडून माणिकराव गावित यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली असली तरी राष्ट्रवादीचे नेते आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्वपूर्ण ठरणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होईल की नाही, याबद्दल संदिग्धता असल्याने राष्ट्रवादीही उमेदवारीसाठी पूर्णपणे तयारीत आहे. डॉ. गावित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने नंदुरबार जिल्ह्य़ात काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविल्यानंतर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील संबंध अधिकच ताणले गेले. माणिकराव गावित, सुरूपसिंग नाईक विरूध्द डॉ. गावित यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू राहिली. कार्यक्रम कोणताही असो, बोलण्याची संधी मिळाल्यावर एकमेकांवर आगपाखड करण्याची संधी दोन्ही बाजूंकडून साधली गेली. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली तरी दोन्ही बाजूचे नेते एकत्र कसे येणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. प्रचारात कुपोषण, आरोग्य, बेरोजगारी, दळणवळण, अविकसीत दुर्गम परिसर, पाणी हे कळीचे मुद्दे ठरण्याची शक्यता आहे. आदिवासी मतदारांवर पूर्वीपासून पंडित नेहरू, इंदिरा गांधींचा प्रभाव राहिलेला आहे. परंतु हा प्रभाव आता काहीसा कमी झाल्याचे दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांनी प्रचाराचे रणशिंग याच मतदार संघातून फुंकले होते. शहादा-दोंडाईचा विधानसभा मतदार संघातून भाजपचे जयकुमार रावल, नंदुरबारमधून डॉ. विजयकुमार गावित, नवापूरमधून सुरूपसिंग नाईक, अक्कलकुव्यातून अ‍ॅड. पद्माकर वळवी, अक्राणीतून के. सी. पाडवी हे काँग्रेसचे आमदार आहेत. साक्रीतही डी. एस. अहिरे व शिरपूरमध्ये अमरीश पटेल हे काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेस आघाडीला बऱ्यापैकी लढत द्यावयाची असेल तर कुंवरसिंग वळवी, शिवाजी पाटील, नरेंद्र पाडवी, शशिकांत वाणी, नागेश पाडवी या भाजपमधील नेत्यांना अंतर्गत वाद मिटवावे लागतील.

राष्ट्रवादीकडून खा. वसंत मोरे निश्चित;
तर युती उमेदवाराच्या शोधात
जळगाव / वार्ताहर

२००७ मध्ये पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेला एरंडोल लोकसभा मतदार संघ पुनर्रचनेनंतर जळगाव लोकसभा मतदारसंघ झाला असून मतदार संघावर पुन्हा वर्चस्व मिळविण्यासाठी भाजप-सेना युतीने उमेदवार जाहीर होण्याआधीच प्रचारास सुरूवात केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खा. वसंत मोरे यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. यापूर्वीच्या एरंडोल मतदार संघात एरंडोलसह पारोळा भडगाव, अमळनेर, चोपडा, पाचोरा आणि चाळीसगाव या विधानसभा मतदार संघांचा समावेश होता. १९५१ च्या निवडणुकीत जळगाव, १९५७ मध्ये पूर्व खान्देश, १९६२, १९६७ आणि १९७१ च्या निवडणुकांमध्ये पुन्हा जळगाव, १९७७ पासून २००७ च्या पोटनिवडणुकीपर्यंत एरंडोल अशा प्रकारे या मतदार संघाची ओळख होती. पुनर्रचनेनंतर त्यास पुन्हा जळगाव नाव मिळाले आहे. हा मतदार संघ आणि केंद्रिय मंत्रीपद हे समीकरणच बनले आहे. हरिभाऊ पाटसकर, सोनुसिंग पाटील, विजय पाटील आणि एम. के. आण्णा पाटील यांनी मंत्रीपद भुषविले आहे. १९५१ ते २००७ पर्यंतच्या एकूण १५ निवडणुकांमध्ये येथून सर्वाधिक सात विजय भाजपने मिळविले आहेत. १९८० नंतर या मतदार संघातून मराठा समाजाचाच उमेदवार विजयी झाला आहे. २००७ च्या पोटनिवडणुकीत सुरेश जैन यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना डावलण्यात आल्यानंतर ते राष्ट्रवादीविरूध्द अधिकच आक्रमक झाले. पुनर्रचनेनंतर जळगाव मतदार संघ अस्तित्वात आल्याने युतीकडून आपण उमेदवारी करण्याचे जैन यांनी जाहीर करून टाकले होते, परंतु अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जैन यांनी उमेदवारीविषयी वक्तव्य करणे टाळले असून राज्यसभेत जाण्याचा त्यांचा इरादा असल्याचे सांगण्यात येते. १९८४ च्या पोटनिवडणुकीत पत्रकार क्षेत्रातील दिग्गज ब्रिजलाल पाटील व १९८९ मध्ये सहकार क्षेत्रातील नेते पी. के. अण्णा पाटील (गुजर) या गुजर समाजातील नेत्यांनी येथून निवडणूक लढवली, परंतु त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. शिवसेनेकडे ही जागा गेल्यास चिमणराव पाटील तर भाजपकडून एम. के अण्णा पाटील इच्छुक आहेत.