Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

झोप!

 

‘डॉक्टर, झोप लागतच नाही हो काही केल्या!’ मानसोपचारतज्ज्ञाला हे वाक्य काही नवीन नाही. मानसिक आजार, शारीरिक दुखणी, ताणतणाव आणि विचित्र जीवनशैली यापैकी कुठल्याही कारणाने आधी सहज येणारी झोप ‘परकी’ होते आणि हे घडेपर्यंत साधारणपणे कोणालाच झोपेचं महत्त्व कळत नाही.
विश्वकोशाप्रमाणे झोप म्हणजे माणसाची शारीरिक आणि मानसिक झीज भरून काढण्यासाठी, दिवसाच्या ठराविक वेळात शुद्ध हरपण्याची नैसर्गिक प्रक्रिया! झोप आपोआप येते म्हणून आपण तिला गृहित धरतो, तिच्या तालाशी खेळतो आणि तालाचा तोल सुटला, की दु:खी होतो. निद्रेशिवाय शरीराची नि मनाची नीट मशागत होत नाही आणि अशा परिस्थितीत नवीन पहाट रुजत नाही!
माणसाच्या मेंदूतली रसायनं दोन गटात विभागता येतील. उत्तेजित करणारी आणि शांत करणारी! झोपेसाठी शांत करणारी रसायनं लागतातंच पण बरोबरीने उत्तेजित करणाऱ्या रसायनांशिवाय झोपेचा संपूर्ण उपयोग मनुष्य अनभवू शकत नाही. त्याचं असं असतं..
असं म्हणतात, की फार फार वर्षांपूर्वी एक मोठा तारा होता. त्याचं प्रस्थ इतकं वाढलं, की ते त्याला स्वत:लाच सांभाळता येईना! फुटला नि त्याची अगणित शकलं झाली. त्यातील एक म्हणजे सूर्य नि त्याची मालिका. त्यातील एक निळीशार, पाणी असलेली! पृथ्वी! नियतीच्या या प्रचंड नाटय़ात विविध रसायनांचा पालापाचोळा होता. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फरस, विविध क्षार, हायड्रोजन, क्लोराइड्स, सोडियम पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर अनेक घटकांचा वापर करून निसर्गाच्या प्रयोगशाळेत जीवसृष्टी निर्माण झाली. काळाच्या ओघात जीवसृष्टीने उत्क्रांतीचा मार्ग स्वीकारला नि सजीवसृष्टीचं पृथ्वीवरचं स्वरूप बदलत गेलं. या बदलात निसर्गाने मात्र आपले सजीव सृष्टीतले दुवे तितकेच मजबूत ठेवले नि उत्क्रांतीला नैसर्गिकतेच्या बंधनात ठेवलं! म्हणूनच माणसाच्या स्वास्थ्याला नैसर्गिक गरजांच्या परिपूर्णतेची निकड आहे. झोप ही त्यातलीच एक गरज!
सर्वच सजीव कुठल्यानं कुठल्या प्रहरी कार्यरत असतात. ज्यासाठी लागणारी ऊर्जा त्यांना निसर्गातून हवा, पाणी, अन्न यातून मिळते. त्या ऊर्जेच्या निर्मितीतील प्रक्रिया शरीरात घडवून आणण्यासाठी जी पूर्वतयारी शरीराला करायला लागते, ती झोपेत होते आणि जे जिन्नस लागतात त्यांची जमवाजमव दिनचर्येत होते. थोडक्यात आयुष्याचं सोपं गणित आहे. जागृतावस्थेत ऊर्जेचा वापर करून ऊर्जानिर्मितीसाठी लागणाऱ्या पदार्थाची जमवाजमव, उत्क्रांतीतील स्वत:च्या सहभागाचा पाठपुरावा आणि निद्रावस्थेत जमवलेल्या पदार्थाचा ऊर्जेत बदल! या आलटून पालटून येणाऱ्या स्थितींचा पृथ्वीच्या भ्रमणाशी- दिवस रात्रीशी तितकाच घनिष्ठ संबंध असतो.
साधारण रसायनांतून ऊर्जा निर्माण करून ती साठवून, हवी तेव्हा वापरण्याची सोय करून तीन प्रयोगशाळा करून दिवसभरासाठी तयार करणं हे काम सोपं नक्कीच नसणार. या कामासाठी मेंदूची तयारी जसा दिवस ओसरायला लागतो तशी आपसूक व्हायला लागते. डोळ्यांतील ‘रेटिना’मधील उजेडाने उत्तेजित होणारे ‘रॉड्स’ सरणाऱ्या दिवसाची जाणीव मेंदूला ताबडतोब करून देतात आणि मेंदूत सुरू होतं एक अद्भुत नाटय़! काही प्रोटॅगोनिस्टस आणि त्या व्यतिरिक्त असंख्य कलाकार! प्रत्येकाच्या टाइमिंगवर ठरतो नाटकाचा प्रभाव! मध्यंतरापर्यंत फक्त गोष्टीची जुळवाजुळव आणि नंतर येणारा क्लायमॅक्स आणि सुखद शेवट! मेंदूच्या पटलावर दर रात्री घडणारं हे नाटय़ ज्या दिवशी चुकतं, तेव्हा झोप लागत नाही.
वयाप्रमाणे माणसाच्या झोपेत बदल होत जातात. जन्मजात १८ ते २० तासांची झोप वयाप्रमाणे कमी होत जाते. पौगंडावस्थेत ज्या सहजतेने मुलं रात्रीचा दिवस करू शकतात तितक्याच सहजतेने दिवसाची रात्र! प्रौढावस्थेत मात्र झोपेच्या प्रक्रियेच्या पूर्वतयारीला हळूहळू जास्त महत्त्व प्राप्त होतं. कमी होणाऱ्या झोपेच्या गरजेबरोबरच झोपेच्या पूर्वतयारीची नियमबद्धता किंवा शिस्त महत्त्वाची व्हायला लागते. मन:स्थिती, विचार, बदलत्या अपेक्षा नि जीवनशैली यांचा परिणाम या पूर्वतयारीवर व्हायला लागतो आणि जास्त ताणलं, की काहीतरी तुटतं!
आयुष्यात बऱ्याच गोष्टींनी झोप उडू शकते. त्यातील काही कारणं परिस्थितीजन्य तर काही मानसिक असू शकतात. बहुतांश वेळा ही कारणं काही दिवसांपुरती त्रास देतात. जेव्हा सातत्याने झोप येण्यास किंवा पूर्ण होण्यास त्रास होतो, तेव्हा त्याला ‘झोपेची व्याधी’ म्हटलं जातं. एखाद् दिवशी झोप न येणं हे वयाप्रमाणे स्वाभाविक आहे, पण व्याधी म्हणण्यासाठी सातत्याने झोप लागण्यास त्रास होणं, झोप सलग न लागणं दिवसा प्रहरी झोप येणं, घोरणं किंवा झोपेत बोलणं, दात चावणं, घाबरून उठणं, यापैकी गोष्टी अनुभवणं आवश्यक आहे.
साधारण माणसाला प्रौढावस्थेत आठ तासांची झोप आवश्यक असते. ही गरज व्यक्तीच्या शारीरिक श्रमांवर बेतलेली असते आणि व्यक्ती व्यक्तींतून त्यात आवश्यकतेनुसार बदल होतो. जर आपल्याला सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटत असेल, दिवसा जेवणानंतरची वेळ सोडून वेंगुळलेलं वाटत नसेल आणि कामाच्या दिवशी आणि सुट्टीच्या दिवशी जागं होण्याची वेळ फारशी बदलत नसेल, तर आपली झोप व्यवस्थित आहे, असं समजण्यास हरकत नाही.
ज्यांची झोप व्यवस्थित नाही, त्यांच्या झोपसाठी काही सूचना - १) दिवसा झोप / वामकुक्षी / डुलकी टाळा
२) सकाळी किंवा संध्याकाळी शारीरिक व्यायाम करा
३) मद्यपान टाळा
४) दुपारनंतर चहा / कॉफी / सिगरेट / तंबाखू टाळा
५) झोपेआधी एक तास तरी मन प्रसन्न ठेवा. अडलेली कामं प्रपंचातल्या अडचणी, भांडणं यांचा लेखाजोखा पलंगावर नको.
६) रात्रीचं जेवण आणि झोप यात निदान दोन तास ठेवा. झोपेआधी केळं, पपईसारखी फळं खा किंवा दूध प्या.
७) झोपेच्या जागेत व्यवस्थित अंधार, कमीतकमी आवाज आणि डास आणि सुखासीन तापमान ठेवा.
८) झोपेच्या आधी दोन तास आंघोळ करा; पण पाणी खूप थंड किंवा गरम नको. शरीराच्या तापमानापेक्षा थोडं जास्त गरम सर्वात योग्य!
९) गादी, उशी आरामदायी असावी. झोप येत नसल्यास नुसतं पलंगावर पडून राहू नका किंवा टी. व्ही. पाहू नका. गादीवरून उठून वाचन करा, संगीत ऐका. लिहा, पाठांतर करा, चित्र काढा, परत झोप आली की मगच पलंगावर जा.
१०) झोप आली नाही किंवा तुटली तर घडय़ाळ पाहू नका.
११) सर्व दिवस उठण्याची वेळ तीच ठेवा
१२) झोप किती तास लागली, यापेक्षा शांत लागली का? दुसऱ्या दिवशी उत्साही वाटलं का? याचा विचार करा.
झोपेला माणसाच्या आरोग्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेक्सपियर ‘हेन्री द फोर’ या नाटकात झोपेविषयी म्हणतो, हे झोपेचं महत्त्व जेव्हा झोप लागत नाही, तेव्हाच समजतं. निद्रानाशाच्या असहाय्य अवस्थेत झोपेच्या गोळ्या अमृतासमान वाटतात; पण त्याचं व्यसन लागू शकतं. झोपेच्या शास्त्राबद्दलचं माणसाचं ज्ञान आज मर्यादित आहे म्हणून झोपेशी खेळण्यापेक्षा लागणाऱ्या झोपेचा आदर बाळगणंच इष्ट ठरेल. दिवसभराच्या ताणतणावांना सामोरं जाण्यासाठी रात्रीच्या झोपेला म्हणूनच तर महत्त्व आहे!
doc-ashish@yahoo.com