Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

विशेष

झोप!
‘डॉक्टर, झोप लागतच नाही हो काही केल्या!’ मानसोपचारतज्ज्ञाला हे वाक्य काही नवीन नाही. मानसिक आजार, शारीरिक दुखणी, ताणतणाव आणि विचित्र जीवनशैली यापैकी कुठल्याही कारणाने आधी सहज येणारी झोप ‘परकी’ होते आणि हे घडेपर्यंत साधारणपणे कोणालाच झोपेचं महत्त्व कळत नाही. विश्वकोशाप्रमाणे झोप म्हणजे माणसाची शारीरिक आणि मानसिक झीज भरून काढण्यासाठी, दिवसाच्या ठराविक वेळात शुद्ध हरपण्याची नैसर्गिक प्रक्रिया! झोप आपोआप येते म्हणून आपण तिला गृहित धरतो, तिच्या तालाशी खेळतो आणि तालाचा तोल सुटला, की दु:खी होतो. निद्रेशिवाय शरीराची नि मनाची नीट मशागत होत नाही आणि अशा परिस्थितीत नवीन पहाट रुजत नाही!
माणसाच्या मेंदूतली रसायनं दोन गटात विभागता येतील. उत्तेजित करणारी आणि शांत करणारी! झोपेसाठी शांत करणारी रसायनं लागतातंच पण बरोबरीने उत्तेजित करणाऱ्या रसायनांशिवाय झोपेचा संपूर्ण उपयोग मनुष्य अनभवू शकत नाही. त्याचं असं असतं..

मूळ वाद गायरान जमिनीचा
महाशिवरात्रीच्या रात्री औरंगाबाद शहरापासून जेमतेम ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलंब्री तालुक्यातील पाल गावात रोहिदास पंडित तुपे याला विजेच्या खांबाला बांधून जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली. जात, गायरानाचा प्रश्न बाजूला ठेवून एकतर्फी प्रेम प्रकरण, खून आणि हत्या असे प्रसिद्धी माध्यमांनी छापले. औरंगाबाद विभागामध्ये गायरानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सरकारी पडीक जमीन आणि गायरान जमीन यावरील अतिक्रमण ३१ मार्च १९७८ पर्यंत नियमित करण्यात आले. प्रत्यक्षात शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी झालीच नाही. मराठवाडय़ात युक्रांद, लोकसमिती, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे त्यावेळचे भारतीय रिपब्लिकन पक्ष यांनी गावोगाव राजकीय चळवळी सुरू केल्या. आंदोलने उभारली. या गायरान जमिनी विशेषत: दलित, आदिवासी आणि भटके समाजातील लोक कसतात. भाकप, माकप, लेनिनवादी, भारिप बहुजन महासंघ, युक्रांद, कामगार आघाडी यांनी एकत्रित येऊन भूमीहीन हक्क संरक्षण परिषद स्थापन केली आणि या माध्यमातूनच १९८० पासून सतत मराठवाडय़ात आंदोलने झाली आहेत.

फिल्ममेकर्स
गणेश मतकरी यांच्या ‘फिल्ममेकर्स’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मॅजेस्टिक प्रकाशन व प्रभात चित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच पु. ल. देशपांडे कलाअकादमीमध्ये आयोजित करण्यात आला. अल्फ्रेड हिचकॉक, इंगमार बर्गमन, मजिद मजिरी, स्टीव्हन स्पिलबर्ग यासारख्या अकरा जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकाच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘फिल्ममेकर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते झाले. गणेश मतकरीने जागतिक दर्जाच्या दिग्दर्शकांची ओळख वाचकांना मराठीतून करून दिल्याबद्दल गोविंद निहलानी यांनी गणेशचे विशेष अभिनंदन केले. मराठी चित्रपटसृष्टीत आशय व तंत्राच्या पातळीवर मन्वंतर घडत असताना गणेशने भारतीय चित्रपट दिग्दर्शकांच्या शैलीचा अभ्यासपूर्ण धांडोळा घ्यावा, अशी अपेक्षादेखील त्यांनी या वेळी व्यक्त केली. नाटय़दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘फिल्ममेकर्स’ या पुस्तकाविषयीची आपली निरीक्षणं या प्रसंगी नोंदविली. गणेशने या दिग्गजांची ओळख सहज-सोप्या, विशेष पारिभाषिक शब्द न वापरता करून दिली आहे व माध्यमाचा विचार करताना आपण कसे खुजे पडतो याचं भानही या लेखांनी आपल्याला दिलं असल्याचं प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केली. गणेशच्या या पुस्तकांमुळे अनेक दर्जेदार चित्रपट पाहण्याची इच्छा वाचकांच्या मनात निर्माण होईल व हेच या पुस्तकाचे यश असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
प्रकाशन समारंभानंतर गणेश मतकरी यांनी ‘फिल्ममेकर्स’ या पुस्तकात ज्या दिग्दर्शकांवर लेख लिहिले आहेत त्यांच्या दिग्दर्शकीय शैलीची ओळख करून देणारे दृकश्राव्य सादरीकरण केलं. या वेळी त्याने ‘फिल्ममेकर्स’ लिहिण्यामागील भूमिका व प्रेरणादेखील प्रेक्षकांसमोर व्यक्त केल्या.
‘फिल्ममेकर्स’च्या प्रकाशनाचे निमित्त साधून ‘मराठीतील चित्रपट समीक्षा’ या विषयावरील परिसंवादाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात ‘महानगर’च्या संपादिका मीना कर्णिक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर, प्रभातचे सचिव संतोष पाठारे व गणेश मतकरी सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजीत देशपांडे यांनी केले. गणेश मतकरींचे लेखन सर्वसामान्य वाचकांना भावते, असे मत व्यक्त करताना मीना कर्णिक यांनी वृत्तपत्रासाठी चित्रपटाचे समीक्षण करताना येणाऱ्या मर्यादा प्रेक्षकांसमोर मांडल्या. सचिन कुंडलकरने गणेशच्या लिखाणामुळे आमच्या पिढीच्या दिग्दर्शकांना चांगला चित्रपट बनविण्यासाठी पाठबळ मिळालंय असं मान्य केलं. त्याच्यामुळे जागतिक पटलावर निर्माण होणाऱ्या चित्रपटाचं विश्लेषण वाचण्याची संधी मिळाली असंही त्याने सांगितलं. मराठीत जागतिक चित्रपटाबद्दल होणारे लिखाण तुलनेनं कमी असून, फिल्म सोसायटीच्या प्रेक्षकांना जागतिक चित्रपट पाहण्याची दृष्टी निर्माण करण्यासाठी गणेशचं लेखन ‘पूरक’ असल्याचं मत संतोष पाठारे यांनी या प्रसंगी व्यक्त केलं.
पंकज भोसले