Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

ारज्यात रोज लाखो लिटर पाण्याची चोरी
पुणे, ४ मार्च/खास प्रतिनिधी

वारजे आणि परिसराच्या पाणीपुरवठय़ासाठी खडकवासला धरणातून थेट आणलेल्या जलवाहिनीवर हद्दीलगतच्या समाविष्ट गावांतील बडय़ा मंडळींनी बेकायदा जोड घेतल्याने दररोज सुमारे वीस लाख लिटर पाण्याची चोरी होत आहे.

आता मात्र ‘हद्द’ झाली!
हद्दीचा वाद हा केवळ पोलिसांमध्ये असतो, असा तुमचा समज असेल तो साफ चुकीचा आहे. हद्दीचा वाद राजकारण्यांमध्येही असतो असा शोध लागला आहे आणि त्याचे जनक आहेत पुण्याच्या खासदारकीच्या शर्यतीतील एक तगडे उमेदवार! विकासाची आघाडी.. अशी घोषणा देणाऱ्या या उमेदवारी इच्छुकाने अगदी ‘अटकेपार’ विकास घडविल्याची वदंता आहे.

विद्यापीठ की पिठाची गिरणी ?
मुकुंद संगोराम

पुणे विद्यापीठातील कर्मचारी भरतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चर्चा आता चव्हाटय़ावर आली आहे. विद्यापीठाच्या एकूण कारभारातील हे हिमनगाचे टोक आहे. देशाच्या शैक्षणिक क्षितिजावर पुणे विद्यापीठाचे नाव नेहमी दर्जा आणि कार्यक्षमता या कारणांसाठी गाजत राहिले आहे.

मोकाट कुत्र्यांकडून दीड कोटींच्या मैदानाची नासधूस
पिंपरी, ४ मार्च / प्रतिनिधी

महापालिकेने दीड कोटी रुपये खर्च करून चार वर्षांपूर्वी नेहरुनगर येथील हॉकी पॉलिग्रास मैदानावर अंथरलेली कृत्रिम हिरवळ (मॅट)परिसरातील मोकाट कुत्र्यांनी उध्वस्त केल्याने या मैदानाला बकाल स्वरूप आले. गेल्या आठवडय़ापासून येथील हॉकी सामने बंद आहेत.त्यामुळे या मैदानावर खेळाडूंचा वावर नाही.मैदानाच्या सुरक्षेसाठी दोन रक्षक असताना रात्रीच्या सुमारास मोकाट कुत्री फिरत असतात. त्यांनी कृत्रिम हिरवळ फाडून ओढत नेली व बऱ्याच अंशी उध्वस्त केली.

साडेतीन मतदारसंघांसाठी साडेसात हजार मतदान यंत्रे
यंत्रांची चाचणी पूर्ण; दुरुस्तीचे काम आठ दिवसांत

पुणे, ४ मार्च / खास प्रतिनिधी

पुणे जिल्ह्य़ातील साडेतीन लोकसभा मतदारसंघांच्या मतदानासाठी ७ हजार ५०० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे देण्यात आली असून या मतदान यंत्रांची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली आहे. बिघडलेल्या अवस्थेतील दोन टक्के मतदान यंत्रांच्या दुरुस्तीचे काम येत्या आठ दिवसांत पूर्ण केले जाणार आहे.पुणे जिल्ह्य़ातील बारामती, शिरूर, पुणे व मावळ या लोकसभा मतदारसंघांची निवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे.

वीजवाहिन्या जळाल्याने चिंचवडमधील वीजपुरवठा विस्कळीत
पुणे, ४ मार्च/ प्रतिनिधी

वाळलेल्या गवताला लागलेल्या आगीमुळे वीज कंपनीच्या चिंचवड येथील सबस्टेशनमधील वीजवाहिन्या जळाल्याने चिंचवड एमआयडीसीसह चाकण, देहूरोड, मळवली आदी भागातील वीजपुरवठय़ावर परिणाम झाला होता. पर्यायी व्यवस्था करून या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. सबस्टेशन जवळ असलेल्या गवताला दुपारी एकच्या सुमारास आग लागली होती. या आगीमुळे काही वीजवाहिन्या जळाल्या. त्यामुळे या सबस्टेशनवर असलेल्या विविध भागातील वीजपुरवठा बंद झाला होता.

‘भविष्यात भारत जगाचे नेतृत्व करेल’
पुणे, ४ मार्च /प्रतिनिधी

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे भविष्यात भारत जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास आय स्क्वेअर आयटीचे उपसंचालक डॉ. अतनू रक्षित यांनी व्यक्त केला. माईर्स आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पुणेतर्फे दोन दिवसीय ‘टेकयुवा- २००९’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. रक्षित यांच्या हस्ते झाले. या वेळी एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. राहुल कराड, प्राचार्य डॉ. टी. एन. मोरे, प्रा. डी. पी. आपटे, प्रा. डॉ. आर. के. भाटिया व प्रा. शंकर माळी हे उपस्थित होते. रक्षित म्हणाले की, या क्षेत्रात तरुणांनी केवळ तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून चालणार नाही. त्याबरोबरच प्राप्त ज्ञान सादर करण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टींचे प्रश्न साचेबंद पद्धतीतून सोडविले तर आपण चांगले निर्णय घेऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

कुंभार समाजाच्या मेळाव्याचे आयोजन
पुणे, ४ मार्च / प्रतिनिधी

कुंभार समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या रविवारी (८ मार्च) उस्मानाबाद येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुंभार समाजाला भटक्या विमुक्त जातीत समाविष्ट करावे, समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, कुंभारकाम, मूर्तीकाम,वीट काम करणाऱ्यांना मातीवरील रॉयल्टी पूर्णपणे माफ करावी, धरणे, तलाव, गावतळी, गायरान जमीन येथून कुंभारांना गाळमाती मोफत मिळावी, कुंभारकामाचा विषय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकविला जावा, अशा समाजाच्या मागण्या असल्याचे महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाषाणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या मागण्यांसाठी शासनाकडे गेली दहा वर्षे पाठपुरावा करण्यात येत आहे. तथापि, शासनाने त्याकडे लक्ष न दिल्याने समाजाचे शक्तिप्रदर्शन घडविण्याच्या हेतूने या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे महासंघाचे कार्याध्यक्ष सुरेश कोते यांनी सांगितले.

राजकीय रणधुमाळीत रसिकांना ‘स्वरसागर’ची संगीतमय मेजवानी
िपपरी, ४ मार्च / प्रतिनिधी

वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या स्वरसागर संगीत महोत्सवाची दशकपूर्ती साजरी होते की नाही, अशी चिन्हे असताना अखेर त्यास १९ ते २१ मार्चचा मुहूर्त सापडला आहे. निवडणुकांच्या राजकीय रणधुमाळीत शहरातील रसिकांना मेजवानी देण्याची भूमिका पालिकेने घेतली असून हा संगीतमय कार्यक्रम महापौर अपर्णा डोके यांच्या वॉर्डात होणार आहे. चिंचवडच्या तानाजीनगर भागात उदय मित्र मंडळाच्या मैदानात १९ तारखेला सिनेअभिनेत्री जुही चावला आणि ज्येष्ठ संगीतज्ञ पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या हस्ते स्वरसागरचे उद्घाटन होणार आहे.

जि.प. प्राथमिक शाळांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
परीक्षा २ एप्रिल रोजी सुरू होणार
पुणे, ४ मार्च / प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात लोकसभेच्या निवडणुकांमुळे बदल करण्यात आला असून आता या परीक्षा २ एप्रिल रोजी सुरू होणार आहेत. या परीक्षेसाठी बहुसंची ऐवजी एकच प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवी इयत्तेच्या परीक्षा दरवर्षी १५ एप्रिल रोजी सुरू होतात. परंतु लोकसभेच्या निवडणुका १६ एप्रिल रोजी होणार आहेत. पुण्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षेत अडचण येऊ नये म्हणून परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकाप्रमाणे २ एप्रिल रोजी परीक्षा सुरू होतील आणि ११ एप्रिल रोजी परीक्षा संपतील. विद्यार्थ्यांना बहुसंची प्रश्नपत्रिका देण्यात येतात. त्यातही बदल करताना आता एकच प्रश्नपत्रिका सर्वत्र दिल्या जातील, असे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

माजी नगरसेवक तानाजी कलाटे यांचे निधन
पिंपरी ४ मार्च / प्रतिनिधी

माजी नगरसेवक तानाजी तुकाराम कलाटे(वय-५८)यांचे आज पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई असा परिवार आहे.
विद्यमान नगरसेविका कमल कलाटे यांचे ते पती, तर राहुल कलाटे यांचे ते वडील होत.आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर वाकड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.माजी खासदार नाना नवले, आमदार लक्ष्मन जगताप, महापौर अपर्णा डोके यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत (सन १९८६) ते वाकड प्रभागातून निवडून आले होते. त्याकाळी स्थापत्य विभागाचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. ते नामांकित मल्ल होते. १९७३ मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत त्यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. वाकड परिसराच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

पिंपरीत आज पाणीपुरवठा बंद
िपपरी, ४ मार्च / प्रतिनिधी

िपपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवारी (५ मार्च) टप्पा एक ते तीनचा उपसा सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण िपपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहनही तुपे यांनी केले आहे