Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

राज्य

राहुल गांधी रमले कागलच्या विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुरांमध्ये!
कागल, ४ मार्च / वार्ताहर

मांजरी (पुणे)येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या कामकाजासंबंधी मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रातील विशेषत: दक्षिण महाराष्ट्रातील साखर उद्योगाबद्दल प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या खासदार राहुल गांधी यांनी आज कागल येथील राजर्षी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला भेट दिली.

निवडणुकीच्या गप्पांचे फड रंगू लागले
ज्ञानोबा सुरवसे
परळी वैजनाथ, ४ मार्च

‘गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राज्यभर सभा घेण्यास सुरुवात करून भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या प्रचाराला सुरुवातही केली.’ ‘राष्ट्रवादी काँग्रेसने खूपच आक्रमक भूमिका घेतलीय. काँग्रेस या दडपणााला बळी पडते की नाही?’ शिवसेनेतही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.’.. अशा देशपातळीवरील राजकीय घडामोडींच्या चर्चा आता अगदी उपाहारगृहापासून ते गल्लीपर्यंत रंगू लागल्या आहेत. ज्यांना राजकारणाचे काहीच देणे-घेणे नाही असे लोकही या चर्चेत मोठय़ा हिरीरीने भाग घेत आहेत.

दुर्मिळ चित्रांचे परतणे बनणार कालो कालो भविष्यती?
देवरुखमधील चित्र विक्री प्रकरण
सचिन पटवर्धन
देवरुख, ४ मार्च

सभासदांना अंधारात ठेवून देवरुखचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या दुर्मिळ चित्रसाठय़ाची विक्री केल्याप्रकरणी वादग्रस्त बनलेले देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ चित्रे परत आणण्याच्या प्रत्यक्ष कृतीच्या निर्णयाप्रत येत नसल्याने या प्रकरणातील गुंतागुंतच वाढत आहे. चित्र परत येऊन हे प्रकरण थांबेल, असे आश्वासक वातावरण असताना चित्र विक्री करणाऱ्या नियामक मंडळातील अनेकांनी संस्थेच्या सभेत एकसाथ राजीनामे दिले आहेत. दरम्यान, या सभाही अवैध असल्याची खुमासदार चर्चा शहरामध्ये रंगत आहे.

‘आचार संहितेचे पालन करा!’
पक्ष कार्यकर्त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन
खोपोली, ४ मार्च/वार्ताहर
निवडणूक आयोगाने १५ व्या लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा केली असून, सर्वत्र आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे व शासकीय यंत्रणेला साथ द्यावी, असे आवाहन कर्जत विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आर. एन. गरूड यांनी केले.

औरंगाबादच्या प्रतिभा हंप्रस यांना मुक्त विद्यापीठाचा रूक्मिणी पुरस्कार
नाशिक, ४ मार्च / प्रतिनिधी

औरंगाबाद येथील प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्यां प्रतिभा हंप्रस यांना येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘रूक्मिणी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आठ मार्च रोजी कोल्हापूर येथे आयोजित सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेला रूक्मिणी पुरस्काराने गौरविले जाते. पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. बहुविकलांग मुलांच्या पुनर्वसन, प्रबोधन व मार्गदर्शन कार्याबद्दल हंप्रस यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हंप्रस यांनी लंडन व हंगेरी येथे मतिमंद मुलांच्या उपचार पध्दतीचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग भारतात गरजु मुलांवर मोफत उपचार करण्यासाठी त्या करीत आहेत. बालकांमधील बहुविकलांग समस्येशी निगडीत पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. बी. देशमुख, गडचिरोलीच्या डॉ. मंदाकिनी आपटे, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. अजय कांबळे यांनी काम पाहिले.

धुळे-नंदुरबार सरकारी नोकर बँकेवर प्रगती पॅनलचे वर्चस्व
धुळे, ४ मार्च / वार्ताहर

प्रतिस्पर्धी लोकहिताय आणि विकास या दोन्ही पॅनलवर मात करीत सत्ताधारी प्रगती पॅनलने जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी बँकेवरील सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे. प्रगती पॅनलचे सर्वच्या सर्व २२ उमेदवार विजयी झाले. प्रगती पॅनलचे प्रमुख चंद्रकांत देसले यांनी हा विजय पारदर्शी कारभाराची फलश्रृती असल्याचे म्हटले आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा सर्वसाधारण मतदार संघात विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत देसले हे सर्वाधिक सहा हजार १४४ मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या गटातील विजयी उमेदवारांमध्ये अशोक पवार, उमाकांत बिरारी, देविदास पाटील, निशांत रंधे, सुरेश माळी, संजय कुवर, राजेंद्र पाटील, संजय शिंदे, दारासिंग वळवी, दत्तात्रय शिंदे, रवींद्र सैंदाणे यांचा समावेश आहे. सर्वसाधारण जळगाव मतदार संघात मनोहर पाटील, नाशिक सर्वसाधारण मतदार संघात किरण दाभाडे, अहमदनगर मतदार संघात किशोर सोनवणे, महिला राखीव मतदार संघात क्रांती जाधव, छाया पाटील, शोभा पवार, अनुसूचित जमाती मतदार संघात इंदास गावित, भटक्या विमुक्त जाती मतदार संघात राजेंद्र सूर्यवंशी, इतर मागासवर्गीय मतदार संघात शरद सूर्यवंशी विजयी झाले.