Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

व्यक्तिवेध

लंकेच्या संघाला एकेकाळी लिंबू-टिंबू मानले जायचे. दिलीप वेंगसरकर, गुंडाप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, झहीर अब्बास, जावेद मियाँदाद, सलीम मलिक अशा दादा फलंदाजांच्या मधल्या फळीचा त्यावेळी भारतीय उपखंडात बोलबाला होता. द्विशतकी-त्रिशतकी भागीदाऱ्या करणे हा जणू त्यांचा हक्क! १९९६ चा विश्वचषक जिंकला आणि लंकेच्या संघाने कात टाकली. सरस खेळाडू घडवित केवळ संपूर्ण क्रिकेटविश्वामध्ये दबदबा निर्माण केला. स्फोटक सनथ जयसूर्याखेरीज दुलिप मेंडिस, असांका गुरुसिंघे, अर्जुना रणतुंगा, अरविंद डिसिल्वा, महेला जयवर्धने, कुमार संगकारा अशा मध्यफळीतील बलाढय़ फलंदाजांनी संघाला भक्कम आधार दिला. याच मालिकेतील भरवश्याचा अष्टपैलू खेळाडू म्हणजे थिलान समरवीरा. गेल्याच

 

आठवडय़ामध्ये तो ‘हेडलाईन्स’चा मानकरी झाला. पाकिस्तानविरुद्ध कराची येथे झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये थिलानने ३१४ धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्यापाठोपाठ लाहोरच्या दुसऱ्या सामन्यात २१४ धावा झळकावित त्याची बॅट तळपली. लागोपाठच्या कसोटींमध्ये द्विशतक वा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या ‘क्लब’मध्ये तो विराजमान झाला. त्याचे इतर सदस्य आहेत डॉन ब्रॅडमन, इंग्लंडचे वॉल्टर हॅमण्ड, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ, विनोद कांबळी आणि लंकेचा कुमार संगकारा. वास्तविक, उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या थिलानचा खेळ हा गावसकर-विश्वनाथ यांच्याप्रमाणे आकर्षक वा संदीप पाटीलप्रमाणे धुवाँधार नाही. तरीही गेले दशकभर त्याने लंकेच्या संघातील मुख्य खेळाडू म्हणून स्थान टिकवून ठेवले आहे. आपली विकेट सहजासहजी न फेकता, तळाच्या फलंदाजांच्या साथीने गडगडलेल्या डावाला आकार देणे, हे जातीवंत मधल्या फळीतील फलंदाजाचे लक्षण असते. नेमकी तीच कामगिरी थिलानने साधली. ४९ कसोटींमध्ये ५१.०७ च्या सरासरीने थिलानने तीन हजार २६९ धावा काढल्या आहेत. परंतु, गेल्या दीड वर्षांमध्ये अचाट फॉर्म दाखविणाऱ्या थिलानची सरासरी ९० च्या घरामध्ये आहे! भारताविरुद्ध २००१ साली शतक झळकावून थिलानने कसोटी पदार्पण साजरे केले. अर्थात, फलंदाजीप्रमाणेच त्याची कारकीर्दही संघर्षपूर्ण ठरली आहे. प्रारंभीच्या यशानंतर २००६ सालच्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. एव्हाना तो तिशीकडे झुकला होता. त्यामुळेच पुनरागमनाची शक्यता धूसर होती. परंतु, थिलानने जिद्द सोडली नाही. श्रीलंकेच्या अ संघाच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर धावांचा पाऊस पाडत राहिला. फलंदाजीप्रमाणेच ऑफस्पिनची कलाही त्याला अवगत होती. त्या कलेचा या खडतर कालावधीत फायदा झाला. बॅडपॅचमध्ये केलेल्या सरावाबद्दल थिलान सांगतो, ‘सलामीच्या फलंदाजांनी धावा न काढता नवा चेंडू केवळ जुना करण्याची कामगिरी केली, तरी काही बिघडत नाही. मधल्या फळीच्या फलंदाजांबाबत मात्र तसे नाही. चांगले चेंडू तटवून काढतानाच संधी मिळताच धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागते. तीसुद्धा तळाच्या फलंदाजांच्या साथीने. त्यासाठी फटक्यांमध्ये वैविध्य आणून क्षेत्ररक्षकांमधील जागा शोधण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते. आता मला तशी फलंदाजी करण्याच्या कौशल्याबरोबरच आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. त्याचाच फायदा पाकिस्तानातील खेळींदरम्यान झाला. तिशी ओलांडली असली, तरी संघासाठी मी उपयुक्त खेळाडू ठरलोय, याचे समाधान वाटते,’ असेही थिलान म्हणतो. अखेर तब्बल १८ महिने संघाबाहेर राहिल्यानंतर, थिलान पुन्हा कसोटी संघात दाखल झाला आणि पाकिस्तानातील विक्रमी खेळीद्वारे त्याने संधीचे सोने केले. लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात इतर पाचजणांसह थिलानही जखमी झाला. गोळीमुळे मांडीला झालेल्या जखमेवर तो उपचार घेत आहे. या हल्ल्याचा संपूर्ण क्रिकेटविश्वालाच धक्का बसला आहे. त्यामधून सावरण्यासाठी काही कालावधी नक्कीच लागेल. परंतु, थिलानच नव्हे, तर संपूर्ण लंकेचा संघच लढवय्या आहे. हा धक्का पचवून क्रिकेटविश्वामध्ये एखाद्या ‘समरवीरा’प्रमाणे ते पुन्हा दिमाखात उभे राहतील, याबद्दल दुमत नाही.