Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

काँग्रेसच्या विदर्भ मेळाव्याचा ‘फ्लॉप शो’
कोटी रुपयांचा खर्च पाण्यात

न.मा. जोशी, यवतमाळ, ४ मार्च

वृत्तविश्लेषण
कोटी रुपये खर्च करूनही काँग्रेसच्या विदर्भ मेळाव्याचा ‘फ्लॉप शो’ का झाला, कार्यकर्ते आणि बडय़ा नेत्यांनी मेळाव्याला पाठ का फिरवली, याबद्दलचे कवित्व आता काँग्रेसमध्ये सुरू आहे. सकाळी १० वाजता आयोजित मेळावा दुपारचे साडेबारा वाजले तरी सुरू करण्याची हिंमत आयोजकांनी केली नाही.

नागपुरात पुन्हा ‘द्वंद्व’!
नितीन तोटेवार, नागपूर, ४ मार्च

अगदी ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये विजयी होणाऱ्या उमेदवारांबाबत नागरिकांना उत्सुकता असली तरी, अनेकवेळी कोण विजयी होईल, यावरून दावे-प्रतिदावे चालतात. युक्तिवाद होतात. त्यास लोकसभा निवडणूकही अपवाद नाही. यंदाही असे घमासान होणार आहे, ते समर्थक आणि विरोधकांमध्ये. मात्र ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते राहणार नाही, तर मतदार असतील. विदर्भात सर्वाधिक ‘द्वंद्व’ रंगणार आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात. सुमारे १९ वर्षांपूर्वी असेच ‘द्वंद्व’ रंगले होती.

बुलढाण्यात पुन्हा डॉ. शिंगणेंनाच संधी?
सोमनाथ सावळे, बुलढाणा, ४ मार्च

छत्तीस वर्षांनंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या झालेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी शिवसेना व बहुजन समाज पार्टीचे उमेदवार जवळपास निश्चित असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही जागा पदरी पाडून घेण्यासाठी जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. ‘सर्व काही साहेब (शरद पवार) यांच्या पंतप्रधान पदासाठी’ या ध्येयाने इरेला पेटलेल्या राष्ट्रवादीने अग्रहक्क सांगितला असून प्रथम पसंतीचे उमेदवार म्हणून जिल्ह्य़ाचे विद्यमान पालकमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव पुढे केले आहे.

राजकीय पक्षांच्या कार्यालयात चहलपहल सुरू
नागपूर, ४ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या बिगुल वाजल्यानंतर उमेदवारांच्या प्रचाराच्या आणि निवडणुकीच्या दृष्टीने शहरातील विविध राजकीय पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजप व बसपाने त्यांच्या उमेदवारांची घोषणा केल्याने कार्यकर्त्यांना प्रचाराची तयारी करणे सोयीचे झाले आहे.

गडचिरोली-चिमूरसाठी भाजपतर्फे आमदार नेतेंची चर्चा
गडचिरोली, ४ मार्च / वार्ताहर

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे गडचिरोलीचे आमदार अशोक नेते यांना उमेदवारी मिळणार असल्याचे मानले जात असताना पक्ष निरीक्षकांसमोर ऐनवेळी डॉ. रमेश गजबे यांचेही नाव समोर आले आहे.

राजपूत समाजाचा मद्यपानावर बहिष्कार
चिखली, ४ मार्च / वार्ताहर

सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान मद्यसेवन करणाऱ्या समाजबांधवांविरोध कठोर कार्यवाही करण्याचा ठराव राजपूत समाजाच्या सभेत मंजूर करण्यात आला. कोलाश येथील सिद्धेश्वर संस्थानात सामूहिक विवाह सोहोळ्याच्या आयोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
समाजबांधवांचा वेळ, श्रम व पैसा वाचविण्यासाठी ‘एक गाव-एक लग्नतिथी’ हा कार्यक्रम राबवण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती शंकरराव सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. डॉ. प्रतापसिंह राजपूत, बी.सी. सपकाळ, प्रतापसिंह परिहार याप्रसंगी उपस्थित होते. लग्नाप्रसंगी आप्तांनी कपडे व भांडे अहेर स्वरूपात न देता रोख स्वरूपात मदत देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान मद्यपानाच्या वाढत्या प्रमाणाबाबत यावेळी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. मद्यपींविरुद्ध प्रसंगी पोलिसांच्या मदतीने कठोर कारवाई करण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. समाजहितास्तव घेतलेल्या राजपूत समाजाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बुद्धिमत्तेच्या वाढीसाठी अभ्यास आवश्यक -सुरेश चन्ने
गोंदिया, ४ मार्च / वार्ताहर

परीक्षा कोणत्याही वर्गाची असो, कॉपीच्या प्रकारात वाढ झाली आहे पण, उत्तीर्ण होण्यासाठी एकमेव रामबाण उपाय कॉपी हा नसून त्यासाठी अभ्यास हाच एक महत्त्वाचा आणि चांगला मार्ग आहे, असे प्रतिपादन देवरी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश चन्ने यांनी केले. देवरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. चन्ने पुढे म्हणाले की, शाळेचे शिक्षक वर्ग शिकवण्यात आणि संस्कारमय मार्गदर्शनात आघाडीवर असतात. विद्यार्थ्यांमध्येही अभ्यासाची चिकाटी आहे. मात्र, एखाद्या कोणाच्याही संगतीने जर कॉपीचा विचार असेल तर, पुढच्या भविष्याचा विचार करून चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होणे चांगले, असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृहाचे अधीक्षक रूपचंद जांभूळकर होते. शाळेचे मुख्याध्यापक मनोज भुरे यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक मधुकर तांडेकर यांनी केले. संचालन भावेश अग्रवाल आणि दामिनी राऊत यांनी केले, आभार रूकैयानाज शेख हिने मानले.

नरखेड पालिका उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रवीण बालपांडे
नरखेड, ४ मार्च / वार्ताहर

नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रवीण बालपांडे हे भाजप राष्ट्रवादी युतीचे संजय गुरमुले यांचा पराभव करून विजयी झाले. शिक्षण सभापतीपदी निर्मला गजबे, बांधकाम सभापतीपदी देवकू वंजारी तर महिला व बालकल्याणच्या सभापतीपदी माधुरी हणवतकर या बिनविरोध निवडून आल्या. विषय समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन तर एका अपक्ष महिला सदस्याची वर्णी लागली. विजयी पदाधिकाऱ्यांचे मुन्ना रॉय, सुदर्शन नवघरे, नहिम कुरेशी, बब्बु शेख, मुनीर शेख, राहुल गजबे, निरंजन वंजारी, सतीश शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

आजनसरा रस्त्याची दुर्दशा
हिंगणघाट, ४ मार्च / वार्ताहर

तालुक्यातील वडनेर-आजनसरा मार्गावरील अपघातास आमंत्रण देणारे सस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान क्रांती संघटनेने केली आहे. विदर्भाचे पंढरपूर म्हणून संत भोजाजी महाराजांचे आजनसरा हे तीर्थक्षेत्र संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. हजारो भाविक येथे रविवार व बुधवारी दर्शनाला येतात परंतु, वडनेर ते आजनसरा या ७ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच रुग्णांनाही या रस्त्यावर येण्या-जाण्यास त्रास होतो. वडनेर-आजनसरा मार्गाच्या दुरवस्थेमुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात घडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान क्रांतीचे विदर्भ अध्यक्ष संतोष तिमांडे यांनी केली आहे.

निमकव्हळा येथे महाजल योजनेचे उद्घाटन
खामगाव, ४ मार्च / वार्ताहर

तालुक्यातील निमकव्हळा येथे महाजल योजनेच्या विहीर व जलवाहिनीचे उद्घाटन अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य नाना कविश्वर यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच उषा भारसाकडे, उपसरपंच अनुसया इंगळे, सदस्य निवृत्ती वाघमारे, सुनीता निमकरडे, राजाराम वाघमारे आदी उपस्थित होते. या योजनेमुळे गावातील पेयजल संकट दूर होऊन नागरिकांना सुलभ पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास कविश्वर यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास रामचंद्र भारसाकडे, गोपालसिंग इंगळे, देवीदास लढे, महेंद्र राठोड, संजय वाघमारे, प्रकाश लाड, जगदेव मुंढे, अमोल भोसले, महादेव चिम, समाधान लांडगे, हरिभाऊ सुरडकर, अशोक इंगळे आदी उपस्थित होते.

नळयोजनेचे उद्घाटन होऊनही पाणीपुरवठा नाही
मूर्तीजापूर, ४ मार्च / वार्ताहर

तालुक्यातील सिरसो येथील पाणीपुरवठा योजना उद्घाटनाच्या दिवशीही नळांना पाणी पुरवू शकली नसल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सिरसो ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. १ करिता शासनाने २६ लाख रुपये खर्चाची नळ योजना मंजूर करून तिचे काम पूर्ण केले. हे काम पूर्ण होत नाही तोच गेल्या २७ फेब्रुवारीला योजनेचा लोकार्पण सोहोळा आमदार तुकाराम बिरकड यांच्या प्रमुख उपस्थितीत ठरला. मात्र, उद्घाटनप्रसंगी योजनेचा ‘कॉक’ सुरू करण्यात आला तेव्हा एकाही नळातून पाणी आले नाही. या योजनेसाठी जलकुंभ उभारल्यानंतर घरोघरी पाणी पुरवण्यासाठी कंत्राटदाराच्या माध्यमातून जलवाहिनी जोडण्यात आली. हे काम झाल्यानंतर प्रभागातील नागरिकांना ‘मीटर’ सहित नळजोडणीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. अनेक नागरिकांची योजनेच्या उद्घाटनापूर्वी मीटरसहित जोडणी पूर्ण झाली होती. मात्र, उद्घाटनाला त्यापैकी एकाही नळाला पाण्याचा थेंब पोहोचला नाही. उद्घाटनापासून नळधारकांना आजवर पाणी का मिळत नाही, याचा शोध घेतला असता योजनेच्या जलवाहिन्या आधीपासूनच ‘लिकेज’ होत आहेत, असे निदर्शनास आले. या सोहोळ्याआधी निदान काही दिवस तरी या जलवाहिन्यांची चाचणी करायला पाहिजे होती. नंतरच लोकार्पण सोहोळा होणे गरजे होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

‘धर्म माणसांना जोडतो’
बुलढाणा, ४ मार्च / प्रतिनिधी

धर्म माणसांना जोडण्याचे व घडवण्याचे काम करतो, ही शिकवण समाजामध्ये रुजवून नवा समाज घडवण्याचा संकल्प करून त्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे, असे प्रतिपादन जमात-ए-इस्लामीचे प्रदेशाध्यक्ष नजर मो. मदऊ यांनी केले. बुलढाणा शहरातील इदगाह मोती मस्जीदजवळ २ मार्च आयोजित जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी मो. समी, शोएब ए दावत, म. जियाउद्दीन, त्र्यंबक निकाळजे, शे. मतीन, अ‍ॅड. ज्योतीराव राऊत, अ. रहेमान हाफीज, मो. अख्तर मो. इमरान, अफजला बानो, तोफीक असलम खाँ. मौलाना रियाज, प्रशांत सोनुने आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नजर मो. मदऊ हे होते. अधिवेशनात प्रत्येक वक्तयांनी धर्माच्या श्रेष्ठतेबाबत विचार मांडले. कोणताही धर्म हा दुसऱ्या धर्माबद्दल तेढ निर्माण करण्याची शिकवण देत नाही. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. हाच संदेश दिला पाहिजे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी कुठलीही कृती करता कामा नये, हाच पवित्र संदेश कुराणामध्ये सांगितला आहे, असेही मुस्लीम समाजाच्या नेत्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. या अधिवेशनाचे संचालन आतीक अली, डॉ. यासिन, उमेर अहमद यांनी केले. तर सईद उल्लाहखाँ यांनी आभार मानले. अधिवेशनासाठी जमात ए इस्लामीचे शहराध्यक्ष अ. हमीद खान तसेच हफीज खान यांनी सहकार्य केले.

देवदर्शनासाठी जाणाऱ्या ऑटोला जीपची धडक; एक ठार
घाटंजी, ४ मार्च / वार्ताहर

आकपुरी येथून देवदर्शनासाठी जाणाऱ्या ऑटोला घाटंजीकडे जाणाऱ्या काळी-पिवळी जीपने ऑटोला जबर धडक दिल्याने अजय काळे (२८) हा घटनास्थळीच ठार झाला. आकपुरी येथील अजय काळे, प्रवीण कोडापे हे ऑटोरिक्शाने धानोरा येथे देवदर्शनासाठी जात असताना यवतमाळकडून येणाऱ्या काळी-पिवळी जीपने ऑटोला जबर धडक दिल्याने अजय काळे हा घटनास्थळीच ठार झाला, तर प्रवीण कोडापे हा जबर जखमी झाल्याने त्याला सावंगी (मेघे) येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे.
वडगाव पोलिसांनी जीप चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रा. लक्ष्मण देशपांडेंना श्रद्धांजली
पुलगाव, ४ मार्च / वार्ताहर

‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचे जनक प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या निधनाने येथील नाटय़ रसिकांना जबर धक्का बसला. एका उत्कृष्ट नाटय़ कलावंतास रसिक मुकले. ५४ पेक्षा जास्त व्यक्तीरेखा रंगमंचावर उभा करणारा हा कलावंत खरंच महान होता. २००३ साली स्थानिक कलाविष्कार मंडळाने ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ हा त्यांचा प्रयोग आयोजित करून रसिकांची पसंती घेतली होती.
अशा या कलावंतास सुसंस्कार भारती, कलाविष्कार मंडळाने श्रद्धांजली वाहिली. या श्रद्धांजली कार्यक्रमात सुसंस्कार भारतीचे राजाभाऊ शहागडकर, रमेश ददमाल, महेश बोकडे, प्रदीप मिठोले, मनोज पनपालिया, सुधाकर किल्लोर, भोलानाथ बंसोडे, कलाविष्कारचे अध्यक्ष प्रमोद बोराटणे, अरविंद बाभळे, दिलीप घालणी, अविनाश शहागडकर, वर्षां बाभळे, संध्या बोराटणे, विठ्ठल वानखेडे, अविनाश श्रीराव इत्यादी उपस्थित होते.

आरोग्य उद्यानाची पायाभरणी
हिंगणघाट, ४ मार्च / वार्ताहर

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत येथील उपजिल्हा रुग्णालयात धर्मशाळा भूमिपूजन समारंभ व आरोग्य उद्यान पायाभरणी आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजू तिमांडे होते. यावेळी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा परिषद अध्यक्ष कलावती वाकोडकर, नगराध्यक्ष श्यामकुमार मसराम, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. विजय गेडाम उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्ण स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी येत असतात. औषधोपचारादरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी मोफत निवास व्यवस्था व्हावी म्हणून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत धर्मशाळा बांधकाम करण्यात येत आहे.

लोकसहभागातून तंटामुक्त गाव शक्य -वडेट्टीवार
भंडारा, ४ मार्च / वार्ताहर

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या यशस्वीतेकरिता लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक सुरेश सागर यांनी ५३९ तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना झाल्याचे सांगितले. ६२४ ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून ७०२० सदस्य ग्रामसुरक्षा दलात आहेत. २६८ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ तसेच १११ गावांनी ‘दारूबंदी’ केल्याची माहिती दिली. सभेला जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे उपस्थित होते. आभार अप्पर पोलीस अधीक्षक पुरुषोत्तम गवई यांनी मानले.

निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण
आर्वी, ४ मार्च / वार्ताहर

निम्न वर्धा प्रकल्प आंदोलन कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवाजी चौकात विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. बांधकामाचे नवीन दर, नोकरीत आरक्षण, पर्यायी भूखंड वाटप, शेती अनुदान, आदी मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. आर्वी येथील प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ अभियंता गायकवाड यांचे तात्काळ स्थानांतरण करून चौकशी करण्यात यावे, अशीही प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. उपोषणाची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष नत्थुजी गडलिंग, सचिव डॉ. मिरगे, गजानन हनवंते, माणिक मलिए यांनी दिला आहे.

नळजोडणीसाठी उपोषणाचा इशारा
भंडारा, ४ मार्च / वार्ताहर

पाणी टंचाई आराखडय़ांतर्गत ७.५० लाख रुपयाची परसोडी शहापूर ठाणा नळजोडणी १५ दिवसात पूर्ण करण्यात यावी, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा ठाणा येथील महिलांनी दिला.
जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत ठाणा परिसरातील पाण्याचे जलस्रोत कोरडे झाल्यामुळे खरबी-ठाणा संयुक्त ग्रामीण पाणीपुरवठा योजना खंडीत झाली. याचा फटका ११५ नळधारांना बसला आहे. टंचाईसदृश्य परिस्थिती अंतर्गत ७.५० लाख रुपयाच्या योजनेला जिल्हा परिषदेने मंजुरी दिली. यात सुरू असलेली शहापूर-परसोडी मुख्य जलवाहिनी जोडण्यात यावी, अशी मागणी आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने महिलांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुंवर यांच्याशी चर्चेदरम्यान, उपोषणाचा इशारा दिला. माजी सभापती राजकपूर राऊत व सरपंच शिवदास उरकुडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता वि.की. टाकळीकर यांना शिष्टमंडळ भेटले. १५ दिवसात पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा या शिष्टमंडळाने दिला.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ७ व ८ मार्चला राज्य अधिवेशन
गोंदिया, ४ मार्च / वार्ताहर

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक)चे ७ व ८ मार्च २००९ ला नांदेड येथील कला मंदिरात आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी उपस्थित राहणार आहेत. ग्राम विकास व पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या अधिवेशनास मार्गदर्शक म्हणून ‘आयटक’चे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गुरुदास दासगुप्ता, अ‍ॅड. गोविंद पानसरे, मनोहर देशकर, सुकुमार दामले व डॉ. भालचंद्र कांगो उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार पी.जी. दस्तुरकर व संयोजक माधव ढोले हे आहेत, असे आयटकचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद गणवीर यांनी सांगितले. या अधिवेशनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचे वेतन व वेतनावर शंभर टक्के अनुदान राज्य शासनाने देणे, निवृत्तीवेतन योजनेची तात्काळ अंमलबजावणी व इतर मागण्यांवर आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष प्रा. तानाजी ठोंबरे राहणार आहेत. गोंदिया जिल्ह्य़ातून २५ प्रतिनिधी यात भाग घेणार आहेत.

वाघाचा वासरावर हल्ला; चौपनगुडीत दहशत
आवारपूर, ४ मार्च / वार्ताहर

माणिकगड पहाडावरील चौपगुडा येथे रुखमा गंगाधर बामने यांच्या गोठय़ात दावणीला बांधलेल्या वासरावर वाघाने हल्ला केला. जनावरांनी हंबरडा फोडताच गावकरी रुखमाच्या घराजवळ गोळा झाले. गावकऱ्यांना बघून वाघाने चक्क घरात प्रवेश केला. मात्र, यावेळी घरात कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नसल्याने प्राणहानी टळली. अखेर या वाघाला गावकऱ्यांनी पिटाळून लावले. या घटनेमुळे चौपनगुडा परिसरात कमालीची दहशत पसरली आहे.धास्तावलेल्या ग्रामस्थांनी वाघ पुन्हा गावात येईल, या भीतीने रात्रभर लाठय़ा-काठय़ा घेऊन गस्त घालने सरू केले आहे. मागील काही दिवसांपासून चौपनगुडा परिसरात वाघचा धुमाकूळ सुरू आहे. यापूर्वी मारुती जाधव यांच्या वगारावर वाघाने हल्ला चढवून त्याला ठार मारले. या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विद्यार्थिनीची आत्महत्या
कळमेश्वर, ४ मार्च / वार्ताहर

येथील गजानन महाराज नगरातील पालिकेच्या महाविद्यालयातील १२वीची विद्यार्थिनी जुही गौतम जांभूळकर (१८) हिने १२वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३ मार्चला सकाळी ५ वाजता घडली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जुही सकाळी ५ वाजता अभ्यासाकरिता उठल्यानंतर तिने शौचालयात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. तिचा ओरडण्याचा आवाज आल्याने परिसरातील लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण, आतून बंद असल्याने नागरिकांनी शौचालयावरील कवेलू काढून आत प्रवेश केला. त्यावेळी ती पूर्ण भाजून मृत पावलेली आढळली. बारावीची परीक्षा सुरू असताना तिचा एक पेपर बिघडला. अनुत्तीर्ण होणाच्या भीतीने तिने जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.