Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
रिक्षावाला
संध्या : काय गं, वैशाली, कोणाशी भांडत होतीस?
वैशाली : रिक्षावाला. अजून कोण?
संध्या : अगं, पण झालं काय असं?
वैशाली : पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झालेत, म्हणून रिक्षावाल्यांनी पण भाडं कमी केलं, म्हणून मी कमी पैसे दिले तर भडकला.
संध्या : भडकायला काय झालं त्याला? पेपरमध्ये आलंय, न्यूज चॅनेल्सवर सारखं सांगताहेत.
वैशाली : अगं, तेच तर मीही म्हटलं त्याला, तर म्हणतो कसा, ते काय आम्हाला माहीत नाही. आम्हाला युनियनच्या तशा सूचना नाहीत.
संध्या : अरे वा! पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले की, अगदी रातोरात भाडेवाढ होते. मग आता भाडं कमी करताना एवढी खळखळ का?
वैशाली : हेच हेच मीही त्याला सांगितलं. पण तो मानायलाच तयार नाही गं. मग रस्त्यात उगी तमाशा नको म्हणून देऊन टाकले पैसे.
वेदा : आई, तू तरी काय गं! कशाला एक-दोन रुपयांसाठी एवढा वाद?
वैशाली : तुला गं कशाला एवढा त्यांचा पुळका आलाय?
वेदा : पुळका वगैरे काही नाही, पण रुपया दोन रुपयांसाठी कशाला भांडायचं?
वैशाली : वेदा, अगं असा पै-पैचा हिशोब ठेवला तेव्हा आजचे दिवस दिसताहेत. म्हणून रुपया-दोन रुपयांसाठीही जीव तुटतो.
संध्या : हो गं. काडी काडी जमवून संसार करायचा असतो, हे या पिढीला काय माहिती असणार? आणि वेदाबाई, खरं सांगायचं नां तर प्रश्न रुपया-दोन रुपयांचा नाहीये गं. प्रश्न तत्त्वाचा आहे. भाव वाढले की भाडी वाढवता, मग कमी झाले की भाडी कमीही करायला नकोत का?
वैशाली : अगदी बरोबर बोललीस. हक्क कळतात, मग जबाबदारी कळायला नको?
संध्या : जबाबदारी नुसती कळून उपयोगाची नाही. ती पारही पाडावी लागते. अगं, उभी हयात गेली आमची रिक्षानं प्रवास करण्यात. पण अलीकडचे रिक्षावाले इतकं पायापाशी बघतात नां अगदी त्याचा राग येतो.
वैशाली : तर काय, परवा संध्याकाळी आईला घेऊन गेले होते. किती वेळ आम्ही रिक्षासाठी थांबलो होतो. एक रिक्षावाला यायला तयार नव्हता. नुसते रिकाम्या रिक्षा उडवत निघून जात होते. पण एकालाही असं वाटलं नाही की, म्हातारी बाई आहे. जवळचं भाडं असलं तरी घेऊन जावं. हल्ली तर आई त्यामुळे कुठे यायलाच तयार नसते.
वेदा : अशा वेळेला सरळ पोलिसांना बोलवायचं.
वैशाली : पोलिसांना काय बोलवायला हवं? हे असे पोलीस समोर उभे असतात तरी त्यांच्या नाकाखाली रिक्षावाले सरळ नाही म्हणतात. पोलीसही नुसतेच बघत उभे असतात.
संध्या : त्याचाही काही उपयोग होत नाही. अगं, तुला माझी मैत्रीण आनंदी माहित्येय ना.. ती चांगली खमकी आहे. अशीतशी गप्प बसणाऱ्यातली नाहीये. तिला असाच एक रिक्षावाला ‘नाही’ म्हणाला तर तिनं सरळ पोलिसालाच पकडून आणलं. मग काय झक मारत त्याला भाडं स्वीकारावंच लागलं.
वैशाली : पण घरापर्यंत सोडलं का तिला?
संध्या : म्हणजे काय? एकदा भाडं स्वीकारलं की न्यावंच लागतं.
वैशाली : असं काही सांगू नकोस. हल्ली हे रिक्षावाले कसे वागतील सांगता येत नाही. परवा माझी भाची सुनिधी आणि तिची मैत्रीण रिक्षानं येत होत्या, तर तो रिक्षावाला सारखा पचापचा थुंकत होता..
वेदा : हो नं! आणि मावशी, म्हणून सुनिधीनं त्याला रिक्वेस्ट केली हं की, काका, प्लीज थुंकू नका नं. तर त्या रिक्षावाल्यानं काय केलं माहित्येय? त्यानं रिक्षा गचकन् थांबवली आणि चक्क त्या दोघींना उतरायला सांगितलं.
संध्या : काय सांगतेस काय?
वेदा : हो नं. अगं, दोघी इतक्या घाबरल्या होत्या नं. त्या रिक्षावाल्याचा रागरंग बघून रिक्षातून उतरल्याही होत्या. पण तुला तर माहित्येय ना, त्यांचं कॉलेज किती लांब आहे ते. रिक्षाही पटकन् मिळत नाहीत. तेवढय़ात त्यांच्याच वर्गातले दोघंजण बाईकवरून येताना दिसले. तेव्हा दोघींच्या जिवात जीव आला. चौघांनी मिळून त्या रिक्षावाल्याला सरळ पोलीस स्टेशनलाच नेलं.
संध्या : अगं, या थुंकण्यावरून आठवलं. माझ्या मामेसासूबाई अशाच रिक्षातून येत होत्या नां, तेव्हा तो रिक्षावालाही असाच थुंकत होता. त्यांनीही त्याला थुंकू नको सांगितलं. त्यानं थुंकायचं थांबवलं. पण ‘वँ वँ’ करत बोलायला लागला.
वेदा : वँ वँ म्हणजे?
संध्या : अगं, तोंडात पानाचा तोबरा भरलेली माणसं कसं बोलतात, पाह्य़लं नाहीस का तू कधी?
वेदा : ओके ओके. आलं लक्षात. शी! तो तर आणखीनच घाणेरडा प्रकार.
संध्या : तेच तर. म्हणून शालिनीताईंनी त्यावरूनही त्याला टोकलं तर म्हणतो कसा, काय प्रॉब्लेम आहे आजी तुमचा! थुंकू देत नाही. तोंडात ठेवलं तर त्याचाही राग येतो तुम्हाला.
वैशाली : काही रिक्षावाले गप्प बसून ऐकून घेतात. पण काही भांडायलाच उठतात. मला तर भीतीच वाटते. सुनिधीलाही मी तेच सांगितलं. म्हटलं, कशाला पोलिसांपर्यंत जायचं? कुठे डूखबिख धरला, काही केलं म्हणजे मग? आपली ही मुलं सतत बाहेर असतात.
वेदा : आई, काहीतरीच हं तुझं! अशा भीतीनं काय घरातच बसून राहायचं का? आजच्या जमान्यात ‘अरे’ला ‘कारे’ करावंच लागतं.
संध्या : दिवस कसे बदलतात नाही! एकेकाळी याच रिक्षावाल्या काकांना मुलांच्या भावविश्वात किती मानाचं आणि महत्त्वाचं स्थान होतं नाही! त्यांच्यावर मुलं सोडून आपणही किती निर्धास्त असायचो नाही?
वेदा : रिक्षावाले काकांच्याबरोबर आम्ही काय धमाल करायचो.
वैशाली : त्यांनी मुलांना अगदी आपलं मानलं होतं नाही. मुलांचे वाढदिवस काय, सहली काय, सेंडऑफ काय.. किती करायचे नाही?
संध्या : त्यांनी आपल्या मुलांना असं प्रेम दिलं ना म्हणून आज ते स्वत:च्या मुलाच्या मायेच्या घरटय़ात आनंदानं राहताहेत.
वैशाली : त्यांच्या मुलानं मात्र त्यांच्या कष्टाचं चीज केलं हं. आता मात्र मुलगा-सून अगदी छान जपताहेत त्यांना.
संध्या : नशीब काढलंन् काकांनी. आयुष्यभर तत्त्वानं वागले. आताच्या रिक्षावाल्यांना म्हणावं भेटा एकदा काकांना.
संध्या : जाऊ दे गं. उडदामाजी काळेगोरे. काही रिक्षावाल्यांचा अनुभव वाईट आला म्हणून सगळ्यांनाच कशाला वाईट ठरवायचं? चल, मी मस्तपैकी चहा करते.
shubhadey@gmail.com