Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

विविध

गांधीजींच्या वस्तू पुन्हा भारताकडे देणार; अनिवासी भारतीयाचा संकल्प
न्यूयॉर्क, ४ मार्च / पी.टी.आय.

 

गांधीजींच्या ऐतिहासिक वस्तू लिलावात खरेदी करून त्या पुन्हा भारत सरकारकडे सुपूर्त करण्याचा संकल्प येथील अनिवासी भारतीय व हॉटेल व्यावसायिक संत सिंग चटवाल यांनी सोडला आहे. आपल्या संकल्पाला येथील अनेक अनिवासी भारतीयांनीही मदतीचा हातभार लावण्याचे आश्वासन दिल्याचे चटवाल यांनी सांगितले. महात्मा गांधी यांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचा लिलाव उद्या येथे होत असून या लिलावाला भारतातून विरोध झाला आहे. सर्व भारतीयांच्या आदरस्थानी असलेल्या महात्मा गांधी यांच्या वस्तू लिलावात काढण्यात येऊ नयेत यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही अनेकांनी प्रयत्न केले आहेत. या वस्तूंमध्ये गांधीजी वापरत असलेला प्रसिध्द सोनेरी कडा असलेला चष्मा तसेच घडय़ाळ, पादत्राणे आदींची समावेश आहे. कोणी कितीही बोली लावली तरी आम्ही कोणत्याही स्थितीत या वस्तू खरेदी करणारच त्यासाठी कितीही पैसे खर्च झाला तरी बेहत्तर, असा ठाम आशावाद चटवाल यांनी व्यक्त केला. हा लिलाव ऑनलाईन असल्याने भारतामधील नागरिकही त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. दरम्यान भारत सरकारने त्वरित पावले उचलून लिलाव प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मुंबईत बोलताना केली. अमेरिकेतील भारताच्या राजदुताने याबाबत प्रसत्न करावेत जेणेकरून गांधी यांच्या ऐतिहासिक वस्तूंचा लिलाव होणार नाही तसेच या वस्तू आपल्या ताब्यात घेण्याबाबत केंद्राने सकारात्मक पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली.