Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

गाण्यातला पैलवान
अभिजीत आणि त्याचा स्कार्फ..

अभिजीतने जेव्हा गाणे सोडले होते तेव्हा त्याने स्वत:ला अभ्यासात गुंतवून ठेवले होते. सलग तीन वर्षे तो सतत १५ तास अभ्यास करायचा. त्याकाळात त्याचे केस गळायला सुरूवात झाली. तरुणपणातच त्याला टक्कल पडत चालले होते. सारेगमपच्यावेळी सुरुवातीच्या काही भागात तो परीक्षकांना तसाच दिसला. मात्र एकदा अवधुत गुप्ते त्याला म्हणाला की, तू तरुण असून म्हातारा दिसतो. त्यावेळी ‘स्टाईल’ म्हणून अभिजीतने डोक्याला स्कार्फ बांधला आणि हा स्कार्फ नंतर त्याच्या जीवनाचा एक भागच बनला. आज स्कार्फ शिवाय तो कधीही गात नाही. त्याला तो शोभूनही दिसतो. ‘लग्नातदेखील हा स्कार्फ बांधूनच बोहल्यावर चढेन’ असे अभिजीत गमतीत म्हणत असतो.

चॉईस इज युवर्स
अभिनयाची जुगलबंदी

रिचर्ड येट्स यांच्या ‘बेस्ट सेलर’ कादंबरीवर आधारलेला ‘रेव्होल्यूशनरी रोड’ हा चित्रपट ‘एलिजी’नंतर आपल्याकडे लागलेला नातेसंबंधांवरचा यंदाचा दुसरा चित्रपट म्हणावा लागेल. असे चित्रपट साधारण आपल्या प्रेक्षकांच्या पारंपरिक हॉलीवूड इमेजशी जराही मिळते जुळते नसतात. हा चित्रपट भारतात येण्यामागे त्यातील लिओनाडरे डीकॅपरिओ आणि केट विन्स्लेट या जोडीचं टायटॅनिक नंतर पुन्हा चित्रपटात एकत्र येणं येवढंच कारण पुरेसं आहे. (टायटॅनिकने हॉलीवूडला प्रथमच भारत ही आपल्या चित्रपटांसाठी मोठी बाजारपेठ बनू शकते, याची जाणीव करून दिली होती.) ‘रेव्होल्यूशनरी रोड’ मध्ये आपल्या ठाम अशा मूल्यांच्या आधारे जगू पाहणाऱ्या दोन स्वतंत्र विचारांच्या जोडप्याची कथा येते. ही कथा घटनाप्रधान नसून व्यक्तिरेखांना वाव देणारी असल्यामुळे दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायची इच्छा असल्यास हा चित्रपट नक्कीच निराश करणार नाही.
चित्रपट : ‘रेव्होल्यूशनरी रोड’
दिग्दर्शक : सॅम मेन्डिस
कलाकार : लिओनाडरे डीकॅपरिओ आणि केट विन्स्लेट

‘ऑस्कर विनर परफॉर्मन्स’
एकाच आठवडय़ात केट विन्स्लेटचे दोन चित्रपट प्रदर्शित होणं ही आपल्याकडल्या हॉलीवूड चाहत्यांसाठी मोठी पर्वणी आहे. नाझींच्या छळछावण्यांबाबतचे अनेक सिनेमे यापूर्वी आलेले आहेत. पण ‘द रीडर’ सिनेमाची कथा आणि विषय चाणाक्ष प्रेक्षकाच्याही कल्पनेपलीकडील आहे . एक प्रौढ स्त्री आणि तरुण मुलगा यांच्यातील युद्धाच्या वातावरणात निर्माण होणारं आकर्षण यापलीकडे चित्रपटाविषयी सांगणं म्हणजे अन्यायकारक ठरेल. प्रत्यक्षात चित्रपट पाहून अधिक जाणून घेण्यातच खरी मजा आहे. केट विन्स्लेट या चित्रपटात टायटॅनिकमधील रोझपेक्षा लहान दिसलीय. अगदी ‘हेवनली क्रिचर्स’मधील तिच्या पहिल्या भूमिकेइतकी. ती खरोखरीच बारीक आहे, की नाही, यावरून चित्रपट प्रदर्शनाआधीपासून गाजत होता. केटचा ‘ऑस्कर विनर परफॉर्मन्स’ म्हणून उशिरा का होईना आपल्याकडे आलेला हा चित्रपट चुकवू नये असा आहे.
चित्रपट : ‘द रीडर’
दिग्दर्शक : स्टीफन डालड्री
कलाकार : केट विन्स्लेट, राल्फ फिनिज, डेव्हिड क्रोस
प्रतिनिधी

ब्रिज में रंगी छोटी बहू
आगामी होलिकोत्सवाच्या निमित्ताने झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांमधील चार जोडय़ा हिंदू चित्रपटातील काही लोकप्रिय गाण्यांवर नृत्य सादर करणार आहेत. हा कार्यक्रम येत्या ६ मार्च रोजी रात्री साडेसात वाजता झी टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे. ‘ब्रिज मे रंगी छोटी बहू’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. झी टीव्हीवरील श्री-हरी, रणबीर-राणो, राधीका-देव आणि जीत सोनी या चार जोडय़ा हिंदू चित्रपटातील ढोली तारो ढोल बाजे, तेरी और तेरी, नगाडा बजा आदी गाण्यांवर नृत्य सादर करणार आहेत. तसेच होळीवरील प्रसिद्ध असलेले ‘रंग बरसे’ हे गाणेही या वेळी सादर होणार आहे. झी टीव्हीवरील श्री, रणबीर राणो, छोटी बहू आणि मयका आदी लोकप्रिय मालिकांमधील या चार जोडय़ांना घेऊन हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. ‘छोटी बहू’मधील विशाखा आणि मृणालिनी या दोघी बॉलिवूडमधील काही लोकप्रिय गाण्यांवरील नृत्याची जुगलबंदी सादर करणार आहेत. तर सयंतीन घोष आणि अन्य स्पर्धकांची ‘डान्स इंडिया डान्स’मधील काही गाजलेली नृत्ये दाखविण्यात येणार आहेत.
प्रतिनिधी