Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आठवलेंच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्रचंड संताप
मुंबई, ५ मार्च/प्रतिनिधी

 

रामदास आठवले यांचे अखिल भारतीय अधिवेशन नुकतेच दिल्ली येथे पार पडले. त्या अधिवेशनात आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत गेल्यास आम्ही वेगळा विचार करू असे सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते संतापले आहेत. आठवले यांची हिंमत आता खूपच वाढली आहे. त्यांच्यासाठी शिर्डी मतदारसंघ द्या, यासाठी आम्ही काँग्रेसची मनधरणी करायची व हे आम्हालाच धर्मनिरपेक्षता शिकवणार, हे फारच झाले, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
आठवले हे बोलण्याच्या नादात कधी काय बोलतील हे सांगता येत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. कधी गद्य तर कधी पद्य स्वरुपात त्यांचे राजकीय विश्लेषण ते श्रोत्यांना ऐकवत असतात. दिल्ली येथील त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कथित युती विषयी प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीलाच इशारा देण्याचे काम केले.
आठवले हे शरद पवार यांचे अत्यंत लाडके आहेत. त्यामुळे त्यांना गप्प बसा सांगण्यास राष्ट्रवादीतील इतर नेते धजावत नाहीत. मात्र त्यांच्या दिल्ली येथील वक्तव्याचे पडसाद राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये उमटले आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील अत्यंत नाराज आहेत. त्यांनी शरद पवार यांनाही त्याबाबत सांगितले आहे.
शिर्डीची जागा सोडण्यास काँग्रेस काही केल्या तयार नाही. त्या ठिकाणी विखे पाटील यांचे विश्वासू रावसाहेब कसबे किंवा अन्य कुणालातरी उभे करण्याचे काँग्रेसच्या मनात आहे. कसबे हे महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे बुद्धिवंत म्हणून ओळखले जातात. मार्क्‍सवाद व फुले आंबेडकरवादावरील त्यांचे प्रभुत्व व अभ्यास वादातीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतरंगावर व त्यांच्या चातुर्वण्यावर आधारित फॅसिस्ट विचारसरणीवरील त्यांचे झोत हे पुस्तक महाराष्ट्राच्या बुद्धिवंतांच्या वर्तुळामध्ये चांगलेच लोकप्रिय आहे. अशा बुद्धिवंताला लोकसभेत पाठवल्यास त्याचा नक्कीच फायदाही होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसही आठवले यांच्यासाठी आपली ताकद पणाला लावेल, असे चिन्ह नाही. अर्थात शेवटच्या घटकेला पवार यांनाच दया आली व त्यांनी काही अ‍ॅडजस्टमेन्ट केली तरच आठवले यांना दिल्लीला जाता येईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.