Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादीचे सहा खासदार पक्षांतर्गत गटबाजीमुळे अडचणीत
संतोष प्रधान
मुंबई, ५ मार्च

 

शरद पवार यांना पंतप्रधानपद मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याला प्राधान्य दिले असले तरी केंद्रीय ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्यासह पक्षाच्या विद्यमान सहा खासदारांना पक्षांतर्गत असंतोष किंवा गटबाजीचा सामना करावा लागत आहे. परिणामी यापैकी दोन-तीन खासदारांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे.
पक्षांतर्गत गटबाजी मिटविण्यासाठी स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला असला तरी वाद काही संपुष्टात आलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसू नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला आहे खरा, पण तो कितपत यशस्वी होईल याबाबत पक्षातच साशंकता आहे. राष्ट्रवादीचे राज्यात सध्या १० खासदार असले तरी त्यातील सहा जणांना पक्षांतर्गत गटबाजी किंवा संघर्षांचा सामना करावा लागत आहे. सूर्यकांता पाटील (हिंगोली), देविदास पिंगळे (नाशिक), जयसिंगराव गायकवाड (बीड), तुकाराम गडाख (नगर), लक्ष्मणराव पाटील (सातारा) व सदाशिव मंडलिक (कोल्हापूर) या सहा खासदारांचा त्यात समावेश आहे. पक्षाच्या सर्व विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली जाईलच असे नाही, असे पक्षाचे प्रवक्ते मदन बाफना यांनी स्पष्ट केले आहे. बाफना यांच्या या विधानामुळे काही खासदारांचा पत्ता कापला जाईल हे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या फटकळ स्वभावामुळे इतर पक्षांपेक्षा त्यांनी स्वपक्षीयांनाच अधिक दुखावले आहे. राज्यातील सरकारमध्ये राष्ट्रवादी हा घटक पक्ष असताना महाराष्ट्र सरकारवर त्यांनी तोंडसुख घेण्याची संधी सोडलेली नाही. राज्याचे सहकार राज्यमंत्री व हिंगोली जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांनाही त्यांनी दुखावले आहे. दांडेगावकर यांच्या समर्थकांचे पत्ते कापण्याचा उद्योग सूर्यकांता पाटील यांच्या गटाकडून झाला आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील अनेक पदाधिकारी पाटील यांच्या विरोधात आहेत. राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसमध्येही सूर्यकांता पाटील यांना विरोध आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी मात्र सूर्यकांता पाटील यांनी चांगले जमवून घेतले आहे.
नाशिकमध्ये विद्यमान खासदार देविदास पिंगळे यांची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीतूनच प्रयत्न झाले आहेत. ते नेतृत्व करीत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर जप्ती आणण्यात आली. उपमुख्यमंत्री व जिल्हयाचे नेते छगन भुजबळ व पिंगळे यांचे जमत नाही. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या नाशिकमधील अधिवेशनात स्थानिक खासदार असतानाही पिंगळे यांना दूरच ठेवण्यात आले होते. समीर भुजबळ यांना नेतृत्व पुढे करून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा भुजबळांचा प्रयत्न आहे.
बीडचे खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्याबद्दल स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीची भावना आहे. खासदार असताना गायकवाड यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी संबंध ठेवले नाही, असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. बीडमधून गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. मुंडे यांच्याशी लढत देण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते तगडय़ा उमेदवाराला उभे करतील अशी शक्यता आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे मुंडे यांच्या विरोधात लढण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळेच भाजपच्या वतीने विधानसभेवर निवडून गेलेल्या व सध्या राष्ट्रवादीशी घरोबा केलेल्या प्रकाश सोळुंखे यांच्या गळ्यात राष्ट्रवादीची उमेदवारी पडण्याची शक्यता आहे.
नगरचे खासदार तुकाराम गडाख यांच्याबद्दल राष्ट्रवादीत फारसे चांगले मत नाही. पक्षाची स्थानिक नेतेमंडळी त्यांच्या विरोधात आहेत. गडाख यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे राष्ट्रवादीतच बोलले जात आहे. साताऱ्याचे लक्ष्मणराव पाटील यांच्याबद्दल पक्षात फारसे चांगले मत नाही. त्यातच कराड मतदारसंघ नव्या रचनेत राहिलेला नसल्याने तेथील खासदार श्रीनिवास पाटील यांचे साताऱ्यावर लक्ष आहे. लक्ष्मणराव पाटील यांना उमेदवारी दिल्यास जागा कायम राखणे कठीण जाईल, असे जिल्ह्य़ातील नेत्यांनी मागे पक्षाध्यक्ष पवारांच्या निदर्शनास आणून दिले होते. कोल्हापूरमधील गटबाजीने कळस गाठला आहे. पवारांनी प्रयत्न करूनही वाद मिटलेला नाही. विद्यमान खासदार सदाशिव मंडलिक विरुद्ध हसन मुश्रीफ हा वाद राज्यभर गाजला आहे. कोल्हापूरमध्ये मंडलिक यांच्यासह विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, माजी मंत्री दिग्विजय खानविलकर आदी चार ते पाच जण इच्छुक आहेत. मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षांतर्गत गटबाजी अधिक उफाळण्याची चिन्हे असल्याने नवा चेहरा देण्याबाबत विचार होण्याची शक्यता आहे.