Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

साथी निहालभाई जंग के लिए तैयार !
नाशिक, ५ मार्च / खास प्रतिनिधी

 

आताचा दिंडोरी अन् पूर्वाश्रमीच्या मालेगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी साथी निहालभाई सज्ज झाले आहेत. ऐंशीचा उंबरठा ओलांडलेल्या या समाजवादी साथीने या अगोदरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिवंगत हरिभाऊ महाले यांची साथ केल्यामुळे त्यांनी स्वत:चा उमेदवार म्हणून विचार केला नसावा. पण मालेगाव हा मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभेला जोडला गेल्यानंतर मालेगाव आणि धुळ्यातील मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या ध्यानात घेता निहालभाई नव्या जोमाने या जंगसाठी तैयार झाल्याने जनता दल धर्मनिरपेक्ष या पक्षाच्या गोटात त्यादृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. याच कारणास्तव भाईंनी अलिकडेच दिल्लीवारी करुन पक्ष पातळीवरील महत्वपूर्ण चर्चेत सहभाग घेतल्याचेही बोलले जाते.
मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा या अगोदर मालेगाव लोकसभा मतदारसंघाचे अंग होते. या एकमेव कारणामुळे मग साथी निहालभाई सांगतील, ठरवतील वा जाहीर करतील तोच उमेदवार अशी एक परंपराच ठरून गेली. भाईंच्या मर्जीतील एकमेव उमेदवार म्हणजे हरी शंकर महाले. अडीच ते तीन दशकाच्या कालावधीत जेवढय़ा काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यातील जवळपास प्रत्येक निवडणुकीत महालेच उमेदवार होते.
स्वत: हरिभाऊ हे दिंडोरी तालुक्यातील रहिवासी. पाश्र्वभूमी आदिवासी आणि निहालभाईंशी कायमची बांधिलकी या प्रमुख कारणांमुळे त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत अन्य मतदारसंघामध्ये पडणारा मतांचा खड्डा एकटे मालेगाव शहर भरून काढत असे. त्यामुळे हरिभाऊ त्या निवडणुकांमध्ये कधी विजयी झाले तर कधी विजयाच्या उंबरठय़ापासून परत फिरले. पण प्रत्येक निवडणुकीवर वरचष्मा हा कमी-अधिक प्रमाणात हरिभाऊंचा अर्थात साथी निहालभाईंचाच राहिला.
आता हरिभाऊ हयात नाहीत. पुनर्रचनेत मालेगाव हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ खुला होतानाच दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये परावर्तीत झाला. निहालभाई ज्या मालेगावच्या एकगठ्ठा मतांच्या बलबुत्यावर हरिभाऊंना एक हाती जिंकून आणायची किमया दाखवित वा विजयाच्या शर्यतीत शेवटपर्यंत टिकवून ठेवू शकले तोच मालेगाव मतदारसंघ यंदापासून खुल्या झालेल्या धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला आहे. हा योगायोग म्हणा की साथी निहालभाईंच्या पडत्या काळात चालून आलेली संधी म्हणा मग संबंध राजकीय कारकिर्दीत लोकसभेची उमेदवारी कधीही न केलेल्या भाईंनी आता धुळे मतदारसंघातून इच्छा प्रदर्शित केली असावी असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळते. त्यादृष्टीने भाईंनी चाचपणी सुरु करताना आपल्या समवेतच पक्षातील त्यांच्या जवळचे कार्यकर्ते डॉ. गिरीश मोहिते यांच्याही नावाची चर्चा पक्षार्तगत पातळीवर सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि साथी निहालभाईंचे सख्य जगजाहिर असल्यामुळे त्यातूनच मग गेल्या लोकसभा निवडणुकीनुसार यावेळीही राष्ट्रवादीने जनता दलाशी युती करावी आणि पाठोपाठ धुळे मतदारसंघ जनता दलाला सोडावा अशी गळही पक्षातर्फे घातली आहे.