Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कॅच देम यंग!
नवी दिल्ली, ५ मार्च/वृत्तसंस्था

 

भारत हा तरुणांचा देश असल्याचे मानले जाते. अर्थात ते खरेच आहे. स्वाभाविकच निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्षांचा भर तरुणांवरच केंद्रित आहे. त्यात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या निवडणुकीच्या निमित्ताने ४.३ कोटी नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. हे सगळे मतदार १८ ते ३० या वयोगटातील आहेत. स्वाभाविकच या तरुणांना काय हवे, त्यांना काय आवडेल, भावेल याविषयी सगळेच पक्ष अतिशय संवेदनशील बनले आहेत.
विशेष म्हणजे तरुणही आपल्या वयाला साजेल अशाच प्रकारे मतदान करतात. ते कोणत्याही पक्षाचे ‘कमिटेड’ मतदार नाहीत. कोणाची अपेक्षा आहे जो उमेदवार माझ्या गावात डिग्री कॉलेज बांधण्याचे आश्वासन देईल त्याला मी मत देईन. तर कोणाच्या मते उमेदवार कसा आहे याला जास्त महत्त्व आहे. तो किती शिकलेला आहे, त्याचे चारित्र्य कसे आहे, व्यवसाय काय या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. त्याचा पक्ष कोणता, त्याचे वय काय आदी बाबी दुय्यम आहेत. ही उदाहरणे तशी प्रातिनिधिक म्हणता येतील.
आजचा तरुण मोठय़ा प्रमाणात नेटवर संचार करतो. हे ध्यानात घेऊन भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार लालकृष्ण अडवाणी यांनी आपली प्रचार मोहीम नेटवरूनही राबविण्यास सुरुवात केली आहे. गूगलच्या माध्यमातून तब्बल २००० वेबसाइटवरून ही प्रचार मोहीम राबविली जाते आहे. अडवाणींचे वय आहे ८१ वर्षे. पण त्यांचा उत्साह तरुणांना लाजविणाराच आहे. आमच्याकडे तारुण्य आणि अनुभवाचे अनोखे मिश्रण आहे, असा दावा
दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी संगणक, मोबाईल अशा कोणत्याही साधनांची मदत न घेता थेट तरुणांना जाऊन भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रचारासाठी अथवा दौऱ्यानिमित्त ते देशात जिथे जिथे जातात तिथे महाविद्यालये, शैक्षणिक संस्था अथवा विद्यापीठांमध्ये जाण्यावर त्यांचा विशेष कटाक्ष असतो. थोडक्यात काय ‘कॅच देम यंग’ हाच नारा दोघेही देत आहेत. फक्त एकजण दिल्लीत बसून लाखो तरुणांपर्यंत पोहोचतो. तर दुसरा शब्दश: तरुणांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतो.