Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आसाम गण परिषदेचा भाजपशी समझोता पण रालोआत सहभाग नाही
गण परिषद ६ तर भाजप ८ जागा लढविणार
नवी दिल्ली, ५ मार्च / पी.टी.आय.

 

भाजपशी आम्ही आसामपुरता जागावाटप समझोता केला असून याचा अर्थ आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झालो, असा नव्हे, असा स्पष्ट पवित्रा आसाम गण परिषदेने घेतला आहे.
आसाम गण परिषेदेच्या या स्पष्टीकरणापूर्वी तासभर आधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आसाम गण परिषद रालोआत सहभागी होत असल्याची घोषणा करून आनंद व्यक्त केला होता. गण परिषदेचे अध्यक्ष चंद्रमोहन पचोरी तसेच रालोआचे अध्यक्ष शरद यादव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत अडवाणी यांनी पूर्वेकडील राज्यात पहिल्यांदाच हा बदल होत असल्याचे नमूद करून आसाम गण परिषदेच्या सहभागामुळे सकारात्मक राजकीय ध्रुवीकरण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. आतापर्यंत देशाच्या राजकारणाची सूत्रे एकाच पक्षाच्या हाती एकवटली होती पण ‘रालोआ’ने ही पध्दत मोडीत काढतानाच बहुपक्षीय सत्ता अस्तित्वात आणली असेही त्यांनी नमूद केले होते. त्यानंतर काही वेळातच आसाम गण परिषदेचे अध्यक्ष पचोरी यांनी आम्ही रालोआत सहभागी झालो नसल्याचे सांगतानाच केवळ जागा वाटपाबाबतच समझोता झाल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीत आमचा वेगळा जाहीरनामा असेल असे सांगून ते म्हणाले आम्ही सहा तर भाजप आठ जागांवर उमेदवार उभा करणार आहे. आसाममधील अनेक प्रश्नांची सोडवणूक आतापर्यंत झालेली नाही. कॉँग्रेसने नेहमीच आमच्या तोंडाला पाने पुसली असल्याची टीका करून पचोरी म्हणाले की भाजप हे प्रश्न सोडवेल असे आम्हाला वाटते.