Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बिहारमध्ये लोकसभेच्या २६ जागांवर जनता दल (संयुक्त)चा दावा
पाटणा, ५ मार्च/पीटीआय

 

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० पैकी २६ जागांवर जनता दल (संयुक्त)ने दावा सांगून आपला मित्रपक्ष भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
जनता दल (संयुक्त)चे अध्यक्ष राजीव रंजनसिंग यांनी बुधवारी रात्री सांगितले की, बिहारमध्ये लोकसभेच्या २६ जागांवर आमचे उमेदवार जिंकतील, याची आम्हाला खात्री आहे. या २६ जागांची यादी भाजपचे नेते अरुण जेटली यांना देण्यात आली असून त्यावर भाजपकडून लवकरच उत्तर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. बिहारमधून लोकसभा निवडणूकांसाठी जनता दल (संयुक्त) आपले उमेदवार येत्या एक ते दोन दिवसांत जाहीर करणार आहे.
२००४ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दल (संयुक्त)ने बिहारमध्ये लोकसभेच्या २४ जागा लढविल्या होत्या. यासंदर्भात पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, बिहारमधून लोकसभेच्या २८ जागा लढविण्याची इच्छा असल्याचे जनता दल (संयुक्त)ने भाजपला गेल्याच महिन्यात कळविले होते. पण त्यानंतर दोन जागांवरील दावा जनता दल (संयुक्त)ने सोडून दिला होता.
दरम्यान जनता दल (संयुक्त)च्या या दाव्यावर भाजपचे बिहारमधील खासदार तसेच मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधील भाजपचे मंत्री नाराज आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या २६ जागांवर दावा सांगितल्याची जाहीर घोषणा जनता दल (संयुक्त)ने केल्याने भाजप अधिक अस्वस्थ झाला आहे. दोन्ही पक्षांनी परस्पर चर्चेने सोडविण्याचा हा प्रश्न जनतेपर्यंत का नेण्यात आला असा सवाल भाजपचे नेते विचारू लागले आहेत.
बिहारमधील किशनगंज, अरारिया, कटिहार, भागलपूर लोकसभा जागांची जनता दल (संयुक्त)ने केलेली मागणी भाजपला अमान्य आहे.हे चार मतदारसंघ सोडायला भाजप तयार नाही. त्यापैकी याआधी किशनगंज येथून भाजपचे नेते शहनवाझ हुसेन निवडून गेले होते. आता ते भागलपूरचे खासदार आहेत.