Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मुलुख मैदान
संधी निवृत्तीची अन् सुधारण्याचीही!
पुणे /प्रतिनिधी

 

बहुजन समाज पक्षाने पुण्यातून डी. एस. कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे तसेच अरुण गवळी यांनाही उमेदवारी दिली जाणार आहे. या उमेदवाऱ्यांमुळे निवृत्तीची आणि सुधारणेची संधी बसपने दिली आहे म्हणे!
कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनाच फायदा होईल का, असे विचारता बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड म्हणाले, ‘‘आम्ही कलमाडी यांना या वयामध्ये निवृत्तीची संधी देत आहोत. आमचा उमेदवार स्वच्छ आहे. हाच उमेदवारजिंकणार आहे.’’ अरुण गवळी यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी पाहता त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला तोटा होईल का व ही उमेदवारी योग्य आहे का, या प्रश्नावर गरुड म्हणाले. ‘‘पक्षाला तोटा होणार नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसने मागे त्यांची मदत घेतली होती, तेव्हा ते गुन्हेगार नव्हते का ? गवळी यांनी आमची विचारधारा स्वीकारली आहे. एखादी व्यक्ती सुधारणार असेल, तर तिला तशी संधी दिली पाहिजे.’’ जाता जाता गरुड यांनी रिपब्लिकन पक्षालाही टोले लगावले. रिपब्लिकन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने फुगवलेला फुगा असून त्या पक्षात आता नुसते नेतेच उरले आहेत, असे ते म्हणाले.
चले नीतीश ‘स्लमडॉग’ देखने
पाटणा : मोटारींचा ताफा, पोलिसांच्या पायलट व्हॅन्स या सर्वाना फाटा देत मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी चक्क सायकल रिक्षातून प्रवास केला आणि तोही फक्त ‘स्लमडॉग’ चित्रपट पाहण्यासाठी. आज सकाळी नितीशकुमार यांचा हा सायकल दौरा सुरू झाला आणि अनेकांच्या नजरा विस्फारल्या. एका साध्या सायकल रिक्षातून मुख्यमंत्री कोठे चालले आहेत याबद्दल सर्वानाच कुतहुल होते. अखेर त्यावर पडदा पडला आणि नीतिशकुमार यांनीच सांगितले की ‘भई हम तो वो ‘स्लमडॉग’ पिक्चर देखने जा रहे है. सुना है बहुत अच्छा पिक्चर है’ आचारसंहितेमुळे शासकीय गाडीने थिएटरवर गेल्यास उगाचच विरोधकांकडून तक्रार होईल म्हणून सायकल रिक्षाने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले खरे पण त्यातील प्रचाराचा ‘फंडा’ लपत नव्हता. मुख्यमंत्री तसेच मंत्री होण्यापूर्वी मी सायकल रिक्षातूनच प्रवास करीत असे, असे नमूद करतानाच जनतेनेच मला रेल्वेतून व नंतर विमानातून प्रवास करावयास पाठविले होते. त्यांचे हे उपकार मी कसे विसरणार, असा सवालही त्यांनी केला.
चारधाम यात्रा आणि राजकीय जत्रा
डेहराडून : लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय जत्रा भरत असतानाच उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला एप्रिलमध्येच सुरुवात होत आहे. चार धाम यात्रेमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केंद्राने सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकडय़ा पाठवाव्यात अशी मागणी उत्तराखंड सरकारने केली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात सर्वत्र रणधुमाळी माजत असतानाच एप्रिल महिन्याच्या मध्यास गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ येथील प्रसिध्द चारधाम यात्रा सुरू होत आहे. या यात्रेस देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक हजेरी लावतात तसेच काही विदेशी नागरिकांचाही या यात्रेत सहभाग असतो. त्यामुळे या यात्रेकरूंना संरक्षण देतानाच भयमुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी सुरक्षा यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे. राज्यातील पोलीस बळ अपुरे असल्याने केंद्राने तसेच शेजारील उत्तर प्रदेश तसेच हिमाचल प्रदेशाने पुढाकार घ्यावा, असे साकडे राज्याने घातले आहे.