Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पवारांचे ‘घडय़ाळ’ शिवसेनेचे ‘टाईमिंग’ चुकवणार!
मुंबई, ५ मार्च / खास प्रतिनिधी

 

भाजपवरील दबावासाठी शिवसेनेच्या नवनेतृत्वाने शरद पवार यांचे ‘घडय़ाळ’ आपल्या हातावर बांधून घेतले असले तरी त्यामुळे भाजप आणि भाजपला मानणाऱ्यांत तीव्र नाराजी तर आहेच पण शिवसेनेच्याही कट्टर कार्यकर्त्यांंत आणि मतदारांत आश्चर्याची भावना असून निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसू शकेल, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. त्यातही शरद पवारांनी काँग्रेसवरील दबावतंत्राच्या आपल्या राजकारणासाठी शिवसेनेच्या वाघाचा ‘बकरा’ केला, असे चित्र सामोरे आले असून त्याचीच चर्चा सर्वत्र होते आहे.
भाजपमधील नितीन गडकरी आणि मुंडे यांतील अंतर्गत संघर्षांचा फायदा उठवत भाजपवर दबाव वाढविण्यासाठी शिवसेनेतील नव्या नेत्यांच्या एका गटाने शिवसेना आणि राष्ट्रवादी यांत जवळीक झाल्याचा भास निर्माण करणे आवश्यक असल्याचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पटवून दिले. त्यानंतर याच नेतृत्वाने वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत राष्ट्रवादीबरोबर शिवसेना जाऊ शकते, अशी सूचक विधाने करीत युतीतील तणाव वाढवत नेला. हा तणाव एका क्षणी इतका वाढला की, युती तुटण्याच्या टोकावर आली. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ एकत्र असलेल्या भाजपचा उल्लेख आपल्या ‘सामना’ या मुखपत्राच्या अग्रलेखांतून वारंवार ‘कमळाबाई’ असा केल्यानेही भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले.
लालकृष्ण अडवाणींना शिवसेनाप्रमुखांची भेट नाकारणे हा शिवसेनेच्या या धाडसी खेळीचाच एक भाग होता. भाजपला काहीही करून नमवणे हा शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम मुंडे-गडकरी वादामुळे बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाला. मात्र त्याचबरोबर शिवसेनेची आपल्याच मतदारांमधील विश्वासार्हता मात्र डागाळली. भाजपला झुकवण्यामागे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मुत्सद्दी राजकारणी अशी प्रतिमा जनमानसात जावी, असा विचार शिवसेनेत होता. मात्र उलटच झाले. पवार आपल्या फायद्यासाठी शिवसेनेला वापरून घेत आहेत आणि शिवसेनाही त्यापुढे वारंवार झुकते आहे, असे विचित्र चित्र लोकांपुढे गेले.
या पाश्र्वभूमीवर पवारांच्या पिंजऱ्यात शिवसेनेचा वाघ अचानक फसल्याने नाराज झालेल्या शिवसेनेच्या मतदारांना राज ठाकरे यांचा मनसे आपल्याकडे खेचून घेईल का, याविषयी राजकीय वर्तुळात विविध आडाखे बांधले जात आहेत. शिवसेनेची पवारांबाबतची भूमिका न पटलेला मतदार हा निश्चितपणे मनसेकडे वळेल, अशी चर्चा असून तसे झाले तर मात्र शिवसेनेचे टाईमिंग पवारांच्या ‘घडय़ाळाने’ चुकवले, असे चित्र सामोरे येणार आहे.