Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

विजयासाठी नवा ‘राज’ फॉम्र्युला : मनसे निवडक १५ जागांवर लढणार
संदीप आचार्य
मुंबई, ५ मार्च

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तसेच शिवसेना-भाजप युती होणार हे स्पष्ट झाल्याने जास्तीत जास्त जागा लढण्याऐवजी निवडक जागा लढवून हमखास विजय मिळविण्याचा फॉम्र्युला वापरण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, धुळे, औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील १० ते १५ जागा लढविण्याचे निश्चित करण्यात आल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

आठवलेंच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्रचंड संताप
मुंबई, ५ मार्च/प्रतिनिधी

रामदास आठवले यांचे अखिल भारतीय अधिवेशन नुकतेच दिल्ली येथे पार पडले. त्या अधिवेशनात आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत गेल्यास आम्ही वेगळा विचार करू असे सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते संतापले आहेत. आठवले यांची हिंमत आता खूपच वाढली आहे. त्यांच्यासाठी शिर्डी मतदारसंघ द्या, यासाठी आम्ही काँग्रेसची मनधरणी करायची व हे आम्हालाच धर्मनिरपेक्षता शिकवणार, हे फारच झाले, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीचे सहा खासदार पक्षांतर्गत गटबाजीमुळे अडचणीत
संतोष प्रधान
मुंबई, ५ मार्च

शरद पवार यांना पंतप्रधानपद मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याला प्राधान्य दिले असले तरी केंद्रीय ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्यासह पक्षाच्या विद्यमान सहा खासदारांना पक्षांतर्गत असंतोष किंवा गटबाजीचा सामना करावा लागत आहे. परिणामी यापैकी दोन-तीन खासदारांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत गटबाजी मिटविण्यासाठी स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला असला तरी वाद काही संपुष्टात आलेले नाहीत.

साथी निहालभाई जंग के लिए तैयार !
नाशिक, ५ मार्च / खास प्रतिनिधी

आताचा दिंडोरी अन् पूर्वाश्रमीच्या मालेगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी साथी निहालभाई सज्ज झाले आहेत. ऐंशीचा उंबरठा ओलांडलेल्या या समाजवादी साथीने या अगोदरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिवंगत हरिभाऊ महाले यांची साथ केल्यामुळे त्यांनी स्वत:चा उमेदवार म्हणून विचार केला नसावा. पण मालेगाव हा मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभेला जोडला गेल्यानंतर मालेगाव आणि धुळ्यातील मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या ध्यानात घेता निहालभाई नव्या जोमाने या जंगसाठी तैयार झाल्याने जनता दल धर्मनिरपेक्ष या पक्षाच्या गोटात त्यादृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

कॅच देम यंग!
नवी दिल्ली, ५ मार्च/वृत्तसंस्था
भारत हा तरुणांचा देश असल्याचे मानले जाते. अर्थात ते खरेच आहे. स्वाभाविकच निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्षांचा भर तरुणांवरच केंद्रित आहे. त्यात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या निवडणुकीच्या निमित्ताने ४.३ कोटी नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. हे सगळे मतदार १८ ते ३० या वयोगटातील आहेत. स्वाभाविकच या तरुणांना काय हवे, त्यांना काय आवडेल, भावेल याविषयी सगळेच पक्ष अतिशय संवेदनशील बनले आहेत.

पवारांचे ‘घडय़ाळ’ शिवसेनेचे ‘टाईमिंग’ चुकवणार!
मुंबई, ५ मार्च / खास प्रतिनिधी

भाजपवरील दबावासाठी शिवसेनेच्या नवनेतृत्वाने शरद पवार यांचे ‘घडय़ाळ’ आपल्या हातावर बांधून घेतले असले तरी त्यामुळे भाजप आणि भाजपला मानणाऱ्यांत तीव्र नाराजी तर आहेच पण शिवसेनेच्याही कट्टर कार्यकर्त्यांंत आणि मतदारांत आश्चर्याची भावना असून निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसू शकेल, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. त्यातही शरद पवारांनी काँग्रेसवरील दबावतंत्राच्या आपल्या राजकारणासाठी शिवसेनेच्या वाघाचा ‘बकरा’ केला, असे चित्र सामोरे आले असून त्याचीच चर्चा सर्वत्र होते आहे.

आसाम गण परिषदेचा भाजपशी समझोता पण रालोआत सहभाग नाही
गण परिषद ६ तर भाजप ८ जागा लढविणार
नवी दिल्ली, ५ मार्च / पी.टी.आय.
भाजपशी आम्ही आसामपुरता जागावाटप समझोता केला असून याचा अर्थ आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झालो, असा नव्हे, असा स्पष्ट पवित्रा आसाम गण परिषदेने घेतला आहे. आसाम गण परिषेदेच्या या स्पष्टीकरणापूर्वी तासभर आधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आसाम गण परिषद रालोआत सहभागी होत असल्याची घोषणा करून आनंद व्यक्त केला होता.

बिहारमध्ये लोकसभेच्या २६ जागांवर जनता दल (संयुक्त)चा दावा
पाटणा, ५ मार्च/पीटीआय

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० पैकी २६ जागांवर जनता दल (संयुक्त)ने दावा सांगून आपला मित्रपक्ष भाजपला जोरदार धक्का दिला आहे. जनता दल (संयुक्त)चे अध्यक्ष राजीव रंजनसिंग यांनी बुधवारी रात्री सांगितले की, बिहारमध्ये लोकसभेच्या २६ जागांवर आमचे उमेदवार जिंकतील, याची आम्हाला खात्री आहे. या २६ जागांची यादी भाजपचे नेते अरुण जेटली यांना देण्यात आली असून त्यावर भाजपकडून लवकरच उत्तर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. बिहारमधून लोकसभा निवडणूकांसाठी जनता दल (संयुक्त) आपले उमेदवार येत्या एक ते दोन दिवसांत जाहीर करणार आहे.

संधी निवृत्तीची अन् सुधारण्याचीही!
पुणे /प्रतिनिधी

बहुजन समाज पक्षाने पुण्यातून डी. एस. कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे तसेच अरुण गवळी यांनाही उमेदवारी दिली जाणार आहे. या उमेदवाऱ्यांमुळे निवृत्तीची आणि सुधारणेची संधी बसपने दिली आहे म्हणे! कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनाच फायदा होईल का, असे विचारता बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड म्हणाले, ‘‘आम्ही कलमाडी यांना या वयामध्ये निवृत्तीची संधी देत आहोत. आमचा उमेदवार स्वच्छ आहे. हाच उमेदवारजिंकणार आहे.’’ अरुण गवळी यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी पाहता त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला तोटा होईल का व ही उमेदवारी योग्य आहे का, या प्रश्नावर गरुड म्हणाले.

समाजवादी पक्ष ३२ जागा लढणार
उमेदवारांची यादी आज जाहीर होणार
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

काँग्रेस पक्ष युपीएच्या घटक पक्षांची अवेहलना करीत आहे, असा आरोप करून महाराष्ट्रात लोकसभेच्या ३२ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा समजावादी पक्षाने केली आहे. या मतदारसंघातील उमेदवारांची यादी उद्या जाहीर करण्यात येणार आहे, असे सपाचे नेते अबू आसीम आझमी यांनी सांगितले. काँग्रेसने समजावादी पक्ष आणि रिपाइंच्या गटांशी आधी बोलणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली होती. मात्र काँग्रेसने या मागणीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता सपाने स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. स्वत: आझमी यांनी वायव्य मतदारसंघातून आपली उमेदवारी घोषित केली आहे. आम्हाला विरोधी बाकावर बसण्याची सवय आहे, मात्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आता विरोधी बाकावर बसावे लागेल, असा इशाराही आझमी यांनी दिला आहे. सपा सर्व धर्माच्या लोकांना उमेदवारी देणार आहे. युपीएमधील इतर घटक पक्षांनी एकजूट करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. औरंगाबाद, भिवंडी, वायव्य मुंबईसह ३२ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांना अमृतसरसाठी साकडे
अमृतसर, ५ मार्च/पी.टी.आय.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अमृतसरमधून लोकसभेची निवडणूक लढवावी, असे आवाहन पंजाब प्रदेश काँग्रेस समितीने केले आहे. भाजपचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. सिद्धू हे केवळ दूरचित्रवाहिन्यांवरील लाफ्टर शोजमध्ये झळकतात, लोकांच्या प्रश्नांबाबत ते काडीचे काम करीत नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांनी अमृतसरमधून उभे रहावे, असे साकडे प्रदेश काँग्रेसने घातले आहे.