Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
लोकमानस

‘पालिरत्न’ डॉ. मीना तालिम यांचे आदर्श कर्तृत्व

 

इतिहास संशोधक आणि पाली भाषेच्या महामेरू डॉ. मीना तालिम आज ७७ वर्षांच्या आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त गौरव होणे उचित ठरावे असे हे व्यक्तिमत्त्व. त्या १९६० साली मुंबई विद्यापीठाच्या पाली भाषेच्या पहिल्या ‘डॉक्टर’ ठरल्या. पाच दशके पाली भाषेचा अविरत अभ्यास करत तालिम मॅडमनी इतिहासातील अवघड प्रकरणे विद्यार्थ्यांसमोर सोप्या पद्धतीने मांडली. याचा योग्य सन्मान म्हणजे त्यांना नुकताच मिळालेला ‘पालिरत्न’ हा बहुमान.
पण हा प्रवास सोपा नव्हता. सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये एकाच वेळेस Ancient Indian Culture आणि पालीच्या विभागप्रमुख म्हणून त्या काम पाहत असत. तीन दशकांहून अधिक काळात तालिम मॅडमच्या हाताखालून अनेक विद्यार्थी बाहेर पडले.
‘पाली भाषेच्या आधारे अनेक वेळा मला इतिहास उलगडणे शक्य झाले. आपल्या देशाची नुसती संस्कृतीच नाही, तर विज्ञान आणि सामाजिक व्यवस्था, व्यापार-उदीम अशा अनेक गोष्टी समजून घेता आल्या,’ तालिम मॅडम सांगतात. आणि खरेच आहे. त्यांनी लिहिलेल्या‘Woman as Depicted in Early Buddhist Literature ’या मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात प्राचीन स्त्रियांची महत्त्वपूर्ण माहिती मिळते. ‘Bagh Painting- identification & interpretation ’या सोमय्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात बौद्ध काळातील चित्रकलेची आणि जातककथांची सविस्तर माहिती आढळते. नुकतेच प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक तर संशोधनाचा ध्रुव ताराच! ‘Science of Medicine & Surgery in Buddhist India.’ मुलीच्या मदतीसाठी अमेरिकेला गेलेल्या तालिम मॅडमनी तिथे एकही दिवस वाया न घालवता अखंड लिखाण करून हे पुस्तक सिद्ध केले.
पाली भाषेच्या अभ्यासातून त्यांनी अजंठा येथील चित्रांमधील जातककथांना जिवंत केले. त्यांचे यावरील पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. मॅडम स्वत:ही एक उत्तम चित्रकार आहेत, ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असेल! त्यांच्या पुस्तकांतील रेखाटने त्यांची स्वत:ची असतात. इतकेच नाही तर ‘बुद्धिस्ट स्टडी’ त्यांनी चित्ररूपाने फार सुंदर रीतीने शिकवला आहे. उत्कृष्ट चित्रांच्या transparencies हे त्यांच्या लेक्चरचे वैशिष्टय़. Buddhist Art हा जिव्हाळ्याचा विषय आणि तो त्या तल्लीनतेने शिकवतात, समजावून सांगतात. एवढेच नाही ‘सम्राट अशोका’वरही मॅडमचा अभ्यास दांडगा आहे. अनेक जातककथा आणि सम्राट अशोकावरील अमर चित्रकथाही त्यांनी अभ्यासपूर्ण, मात्र लहानांना समजेल अशा प्रकारे लिहिल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या सीनियर गाइड असूनही आजही त्या उत्साहाने के. जे. सोमय्या कॉलेजमध्ये बुद्धिस्ट स्टडीज शिकवायला जातात. घरी खिडकीजवळच्या छोटय़ा टेबलवर मॅडमचा लिखाणाचा ‘संसार’ व्यवस्थित मांडलेला आहे. तब्येतीच्या तक्रारी असल्या तरी, तहान-भूक विसरून त्यांची तपश्चर्या चालू आहे. ‘हे सगळं केलं खरं! तेव्हा तर माझी तिन्ही मुलं लहान होती.’ मॅडम गहिवरून सांगतात. अनेक नामवंतांनी मॅडमच्या अभ्यासाचे कौतुक केले आहे. डॉ. पी. व्ही. बापट, फादर हेरास, डॉ. हॉर्नर, चिं. वि. जोशी, डॉ. सांकालिया, डॉ. सोमय्या आणि किती तरी.. मॅडमचे मन सभासमारंभांत रमत नाही, पण प्रत्येक विद्यार्थी त्यांना नावानिशी लक्षात असतो. मॅडम शतायुषी होवोत, ही आम्हा विद्यार्थ्यांची प्रार्थना!
मंजिरी ठाकूर
rtmanjiri@gmail.com

वास्तुशास्त्र नव्हे वास्तुरचनाशास्त्र!
महाराष्ट्र शासनाच्या एका शिष्यवृत्ती योजनेसंबंधीची भली मोठी जाहिरात पाहिली. (१२ फेब्रुवारी) त्यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय इ. विद्याशाखांच्या बरोबरीने ‘वास्तुशास्त्र’ असा अभ्यासक्रमाचा उल्लेख आहे. वास्तविक ‘आर्किटेक्चर’ या विद्याशाखेला ‘वास्तुशास्त्र’ असे संबोधणे संभ्रमात टाकणारे आहे. कारण ‘वास्तुशास्त्रा’च्या नावाने सध्या जे चालले आहे त्याचा ‘आर्किटेक्चर’ या विद्याशाखेशी सुतराम संबंध नाही!
आर्किटेक्चर या शब्दाचा अचूक प्रतिशब्द म्हणजे ‘वास्तुरचनाशास्त्र’ आणि त्याचा शॉर्टफॉर्म करायचा तर ‘वास्तुरचना’. आर्किटेक्ट म्हणजे ‘वास्तुरचनाकार’; वास्तुशास्त्री नव्हे. कृपा करून ‘आर्किटेक्चर’ या अत्यंत प्रगत अशा विद्याशाखेला ‘वास्तुशास्त्र’ नावाच्या अंधश्रद्धेशी जोडू नका. विपर्यस्त प्रतिशब्द जनमानसावर चुकीच्या प्रतिमा दृढ करतात. उच्च व अतिउच्च शिक्षणक्षेत्रातील ‘आर्किटेक्चर’ या विद्याशाखेच्या संबंधात पूर्णपणे चुकीचा व दिशाभूल करणारा प्रतिशब्द टाळण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया!
चंद्रमोहन वैद्य, ठाणे
वास्तुरचनाकार

सामाजिक संस्थांची माहिती हवी
निलेश रुपवते यांचा ‘न्यायव्यवस्थेला हवा मानवी चेहरा’ व संजय केतकर यांचा ‘न्यायव्यवस्थेत समाजाचा पुढाकार हवा’ हे दोन्ही लेख (२६ फेब्रुवारी) वाचले. एका निमसरकारी आस्थापनेची वकील म्हणून दीर्घकाळ काम केल्यानंतर व आता स्वयंसेवी संस्थांच्या वतीने लोकांच्या प्रश्नांसंबंधी काम करताना जे वास्तव समोर आले ते या निमित्ताने पुन्हा आठवते. आपल्याकडे तक्रारदाराची अन्यायाविरुद्ध लढत असताना होणारी फरफट दु:खदायक आहे. या अन्यायाचे निराकरण करणारे कायदे कागदावरच राहतात व अंमलबजावणीच्या क्षेत्रात पोलीस, कोर्ट, सरकारी कार्यालये येथे चपला झिजवताना मग हा अन्यायग्रस्त ‘शहाणा’ व्हायचे ठरवतो व स्वत:शीच कोर्टाची पायरी न चढण्याचा वायदा करतो!
म्हणूनच अन्यायग्रस्तांच्या मदतीला ज्या सामाजिक संस्था उभ्या आहेत त्याची माहिती नागरिकांना असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वत:च्या अधिकाराबद्दलही नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. माहितीच्या अधिकाराचा वापर करून घेणे आपण शिकायला हवे.
मनीषा तुळपुळे, पनवेल
mtulpule@in.com

सारस्वत ब्राह्मण समाज संस्थेत निवडणूकच झालेली नाही
सारस्वत ब्राह्मण समाज संस्थेच्या निवडणुकीविषयीची बातमी (२८ फेब्रु.) ही खोडसाळपणे दिलेली असून, सत्य वेगळेच आहे.सारस्वत ब्राह्मण समाज या जुन्या संस्थेत गेली कित्येक वर्षे मतदानच झालेले नाही. व्यवस्थापकीय मंडळाचे कार्यवाह गिरीश परुळकर हे ठराविक सहकाऱ्यांचेच नॉमिनेशन भरतात आणि बिनविरोध निवडणुका दाखवून आपलेच ठराविक सहकारी व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य म्हणून घेतात. या वर्षी काही तरुण कार्यकर्त्यांनी नॉमिनेशन भरून गिरीश परुळकर यांना आव्हान दिले असता त्यांनी २८ सप्टें. २००९ रोजी नियोजित निवडणूक घेतलीच नाही. शिवाय अ‍ॅड्. सुभाष सबनीस व डॉ. कल्पना वायंगणकर या निवडणूक निरीक्षकांना काढून टाकण्याची नोटीस ९ नोव्हें. २००८ रोजी दिली. दिशाभूल करणाऱ्या बातमीत सांगितले आहे तसा या निरीक्षकांनी स्वत:हून राजीनामा दिलेला नाही! उद्दामपणाचा कळस म्हणजे परुळकर यांनी आव्हान देणाऱ्या तरुण उमेदवारांना ६ डिसें. २००८ रोजी सभासदत्वच रद्द करण्याची नोटीस दिली. मनमानीचा अतिरेक झाल्याने तरुण उमेदवारांनी सिटी सिव्हिल कोर्टात धाव घेतली तेव्हा परुळकरांनी ८ मार्च २००९ रोजी गिरगाव येथील सारस्वत ब्राह्मण समाजच्या कार्यालयात निवडणूक घेण्याचे कोर्टासमोर मान्य केले आहे.
राजेंद्र देसाई, कल्पना प्रभु, मुंबई
परिवर्तन पॅनल