Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

काँग्रेस बंडखोराला पाठबळ देण्याचा डाव
सांगलीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे सूर जुळेना!
गणेश जोशी
सांगली, ५ मार्च

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस बंडखोरीला पाठबळ देण्याच्या पवित्र्यात राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्याला बळ देऊन बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविण्याचे डावपेच राष्ट्रवादी काँग्रेस खेळत आहे. काँग्रेसला राजकीयदृष्टय़ा विकलांग बनविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी काँग्रेसने ही जागा स्वबळावर लढवावी, अशी मागणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून केली जाऊ लागली आहे.

एक लाखापर्यंतच्या ठेवीदारांना ६५ टक्के रक्कम मिळणार
बँक विलीनीकरणाबाबत काही नियम शिथिल
दयानंद लिपारे
इचलकरंजी, ५ मार्च

बँकांच्या विलिनीकरण प्रक्रियेतील प्रतिकूल नियमावलीतील रिझव्‍‌र्ह बँकेने बदल केला असून विलिनीकरणाबाबत काही नियमात शिथिलता करण्यात आली आहे. त्यामुळे गेली काही महिने विलिनीकरणाची प्रलंबित प्रक्रिया आता गतिमान होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. नव्या बदलामुळे एक लाखाच्या ठेवीदारांच्या ठेवीच्या रक्कम डीआयसीजीच्या सहकार्याने किमान ६५ टक्के रक्कम परत मिळण्याची खात्री मिळाल्याने ठेवीदारांचे हित जपले जाण्याची आश्वासक परिस्थिती निर्माण झाली आहे.

बालिकेवर बलात्कार करुन तिचा खून करणाऱ्यास फाशीची शिक्षा
कोल्हापूर, ५ मार्च / प्रतिनिधी

असहाय बालिकेला खाऊचे आमिष दाखवून तिचे अपहरण करणे, तिच्यावर अमानुष बलात्कार करणे आणि तिची हत्या करणे तसेच पुरावा नष्ट करणे हे एखाद्या आरोपीने केलेले गुन्हे व्यक्तीविरूध्दचे मानता येणार नाहीत तर हे गुन्हे समाजाविरूध्दचे आहेत म्हणूनच अशा आरोपीला समाजात जिवंत राहण्याचा अधिकार राहत नाही असे मत नोंदवून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. बी. महाजन यांनी बाबू ऊर्फ रवींद्र सुरेश कांबळे (वय २५) याला आज फाशीची शिक्षा ठोठावली. मानवी संवेदना बधिर करून टाकणाऱ्या या खटल्यात सरकारच्यावतीने अ‍ॅड. अशोक एन.रणदिवे यांनी काम पाहिले.

डेक्कन कॉलेजमधील पक्षिजीवन
डेक्कन कॉलेजच्या १२५ एकरच्या परिसरात विविध झाडे व पक्षी आहेत. गेल्या २०-२५ वर्षांत काळाच्या ओघात आणि आसपास वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे, त्यांच्या उपद्रवामुळे येथील वृक्षराजी व पक्षिजीवन कमी झाले. सध्या या परिसरात वड, पिंपळ, पायरी (पिंपरी) निलगिरी, कडुलिंब, शिवण, गुलमोहोर, चिंच, रेन ट्री, वावळ, आंबा, चाफा, पाम, बांबू, जांभूळ, बाभूळ, सुबाभूळ अशी बरीच झाडे म्हणजे ऑक्सिजनच्या बँका आहेत. त्यामुळे नेहमी शुद्ध व स्वच्छ हवा मिळते.

गोव्यातील नाटय़संस्थेतर्फे उद्या ‘नागानन्द’ मराठी नाटय़ाविष्कार
सहाव्या शतकातील मूळ संस्कुतमधील नाटक
कोल्हापूर, ५ मार्च / विशेष प्रतिनिधी
गायन समाज देवल क्लबच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांतील नाटय़विषयक उपक्रमांचा भाग म्हणून गोव्यातील कला आणि सांस्कृतिक संचालनालयाच्या सहकार्याने शनिवार, ७ मार्च रोजी रात्री साडे नऊ वाजता केशवराव भोसले नाटय़गृहात गोव्यातील प्रभाकर सांस्कृतिक संस्थेतर्फे श्री हर्षदेव लिखित ‘नागानन्दम’चा ‘नागानन्द’ हा मराठी नाटय़विष्कार सादर केला जाणार आहे.

वायनरी उद्योगाच्या नकाराने द्राक्ष बागायतदार अडचणीत
सांगली, ५ मार्च / प्रतिनिधी

सांगली जिल्ह्य़ात तब्बल ३०० एकरावर वायनरीची द्राक्षे पडून आहेत. त्यांची खरेदी करण्यास वायनरी प्रकल्पांनी नकार दिला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास ती द्राक्षे जिल्हाधिकारी कार्यालयात टाकण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष बाबा कदम यांनी दिला.वायनरी पार्कच्या हमीमुळे तासगाव, कडेगाव व पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात वायनरीच्या द्राक्षांची लागण केली. परंतु आता वायनरी प्रकल्पांनी याकडे पाठ फिरवली आहे. तब्बल ३०० एकराहून अधिक द्राक्षांना उठाव नाही. पलूस येथे वायनरी पार्कसाठी तब्बल २५० एकर जमीन देण्यात आली आहे. परंतु तेथे केवळ तीन, तर जिल्ह्य़ात सहा प्रकल्प सुरू आहेत. अशा परिस्थितीत द्राक्ष बागायतदारांसमोर द्राक्षांचे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी येत्या आठ दिवसांत वायनरी प्रकल्पांशी चर्चा करून निर्णय द्यावा. अन्यथा, तसे न झाल्यास उर्वरित वायनरीची द्राक्षे जिल्हाधिकारी कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा बाबा कदम यांनी दिला आहे.

भाजपच्या निरीक्षकपदी बागडे व डॉ. फडके
सोलापूर, ५ मार्च/प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा (राखीव) निवडणुकीसाठी शहरातील भाजपची प्रचारयंत्रणा सज्ज करण्यात आली असून उमेदवाराच्या चाचपणीसाठी आमदार हरिभाऊ बागडे आणि विदर्भाचे विभागीय संघटक डॉ. राजेंद्र फडके हे कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेण्यासाठी येत्या ७ किंवा ८ मार्चला सोलापूरला येणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू यांनी सांगितले.सोलापूर लोकसभा मतदारसंघात २००३ च्या पोटनिवडणुकीत आणि २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने विजय मिळविला. आता विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी शहरातील ९८ वॉर्डातील ६३५ मतदान केंद्रांवर प्रत्येकी दहा कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय समाजातील प्रतिष्ठितांच्या बैठकांबरोबरच युवा, महिला, दलित मेळावे, कोपरासभा यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे श्री. जन्नू यांनी सांगितले.

शिवाजी सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध
गडिहग्लज, ५ मार्च / वार्ताहर

सर्व गट, तट आणि पक्षाच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने गडिहग्लज येथील श्री शिवाजी सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. विद्यमान दहा संचालकांसह नऊ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. निवडणुकीसाठी एकूण ८० अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी ६१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये विद्यमान चेअरमन प्रा. किसनराव कुराडे, व्हा.चेअरमन विजय नलवडे, प्रकाशराव चव्हाण, किरण कदम, तानाजी मोहिते, चंद्रकांत कांबळे, विष्णूपंत शिंदे, संजय मोकाशी, प्रमोद रणनवरे, श्रीमती विजयमाला रणनवरे या विद्यमान संचालकांचा समावेश आहे. उदय कदम, दीपकराव जाधव, जोतीराम केसरकर, संग्रामसिंह घाटगे, भीमराव पट्टनकुडी, श्रीकांत पाटील, निशिकांत चोथे, दत्ताजीराव देसाई, रत्नप्रभा चव्हाण या नऊ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

पोलीस उपअधीक्षक पाटील यांची बदली
पंढरपूर, ५ मार्च/वार्ताहर

पंढरपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक पी. आर. पाटील यांची बदली सोलापूर येथे झाली असून त्यांच्या जागी पुणे शहर येथून प्रमोद होनराव यांची नियुक्ती झाली आहे. होनराव यांनी पंढरपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून गुरुवार दि. ५ मार्च रोजी पदभार स्वीकारला आहे. प्रमोद होनराव हे ११ वर्षांपूर्वी पंढरपूरला फौजदार म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी सांगली येथे बदली झाली, तेथे त्यांनी सी. आय. डी. ब्रँच, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे काम केले. त्यानंतर त्यांची पुणे येथे जात पडताळणी कार्यालयाकडे बदली झाली. तेथून प्रमोशनवर पुणे शहर या ठिकाणी काही दिवस कार्यरत होते

‘लीड कॉलेज’ योजनेतील व्याख्यानांना चांगला प्रतिसाद
सांगली, ५ मार्च / प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने लीड कॉलेज योजनेंतर्गत येथील आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालयात ‘स्पिरिच्युअल सायन्स’ व ‘हिलींग विदाऊट मेडिसीन’ या विषयावर आयोजित व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात श्रीमती हेमा शेट्टी व प्रसन्नजीत कांबळे यांनी मार्गदर्शन केले. नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना मनोधैर्य व आत्मविश्वास वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचे भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असल्याचे सांगून वैज्ञानिक युगात विचाराने मनुष्याचे वेगळे साधन होऊ शकतात, असे हेमा शेट्टी म्हणाल्या. प्रसन्नजीत कांबळे यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य भौतिकदृष्टय़ा संपन्न झालेला आहे. मात्र तो मानसिकदृष्टय़ा कमकुवत बनला आहे. शारीरिक आजारांपेक्षा मानसिक आजारांचे रूग्ण वाढले आहेत. मानसिक संतुलन कसे साधावे, याबाबत मार्गदर्शन केले.प्रारंभी उपप्राचार्य सी. एस. मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चिंचकर यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.