Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

फिफ्टी-फिफ्टीची मागणी करणारे
पवार सापडले ‘ट्वेंटी-२०’ मुळे कोंडीत!
नवी दिल्ली, ५ मार्च/खास प्रतिनिधी
लोकसभा, विधानसभेचे जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडे फिफ्टी-फिफ्टीची मागणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ट्वेंटी-२० मुळे चांगलेच कचाटय़ात सापडले आहेत. श्रीलंकन क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकांदरम्यान होऊ घातलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वेंटी-२० स्पर्धेला सुरक्षा प्रदान करणे शक्य नसल्याची केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी भूमिका घेतल्यामुळे आयपीएलचे आयोजक हवालदिल झाले आहेत. आयपीएलची दुसरी आवृत्ती रद्द होऊ नये म्हणून आयोजकांच्या वतीने पवार यांना पुढाकार घ्यावा लागत असल्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसला रगडण्याची काँग्रेसला आयतीच संधी मिळाली आहे.

पक्षांतर्गत वणव्यात युती होरपळली!
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी
भाजप २६ आणि शिवसेना २२ असे जागावाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची घोषणा होऊन चोवीस तास उलटण्याच्या आधीच युतीतील नेत्यांनी आज केलेल्या परस्परविरोधी विधानांमुळे युतीत पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. मुंबई दक्षिण, कल्याण व यवतमाळ या जागांवरून तसेच शरद पवार यांच्या पंतप्रधानकीवरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा वापरल्याने युतीतील तणाव वाढला आहे. या वादाच्या पाश्र्वभूमीवर पूनम महाजन राव यांनी आज एका पत्रकाद्वारे युती भक्कम करण्यासाठीच आपले प्रयत्न राहातील, असे स्पष्ट केल्याने मुंबई दक्षिण मतदारसंघाबाबत मात्र युतीत समझोता होण्याचे संकेत मिळत आहेत.

नौदलाच्या पहिल्यावहिल्या जागतिक सागर सफरीची धुरा मराठी माणसाच्या खांद्यावर!
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी
भारतीय नौदलाच्या वतीने जागतिक सागर सफरीसाठी कमांडंट दिलीप दोंदे यांची निवड करण्यात आली असून विशेष म्हणजे भारताच्या वतीने अशी सफर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. सेल बोटीतून (हवेवर चालणारी बोट) दोंदे संपूर्ण विश्वाला समुद्रमार्गे वळसा घालणार असून या बोटीत ते एकटेच असणार आहेत. कोणताही कर्मचारी सोबत न घेता दोंदे यांनी आखलेली ही सागर सफर निर्विघ्न पार पडेल, असा विश्वास नेव्हीचे व्हाईस अ‍ॅडमिरल जे.एस. बेदी यांनी व्यक्त केला. दोंदे यांच्या या सफरीसाठी नेव्हीने साडेचार कोटी रूपये खर्च करून खास सेल बोट तयार केली आहे.

महात्मा गांधी यांच्या साहित्यावरील ‘स्वामित्त्वधना’चा अधिकार संपुष्टात!
कोणत्याही प्रकाशकाला गांधीसाहित्य प्रसिद्ध करता येणार
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी
महात्मा गांधी यांच्या साहित्यावर गेल्या काही वर्षांंपासून असलेला ‘नवजीवन ट्रस्ट’चा स्वामित्त्वधनाचा (कॉपीराइट) अधिकार नुकताच संपुष्टात आला आहे. यापूर्वी स्वामित्त्वधनाचे अधिकार नवजीवन ट्रस्टकडे असल्याने या ट्रस्टशिवाय अन्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला गांधीजींचे साहित्य प्रकाशित करता येत नव्हते. मात्र हा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता महात्मा गांधी यांचे साहित्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला किंवा गांधीप्रेमी मंडळींना प्रकाशित करता येणार आहे.

आयपीएलच्या तारखांत बदल होणार?
नवी दिल्ली, ५ मार्च /वृत्तसंस्था

केंद्रीय गृहखात्याने इशारावजा सूचना केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दुसऱ्या आयपीएल स्पर्धेच्या नियोजित कार्यक्रमात आता बदल करण्याचे ठरविले असून सुधारित तारखा गृहखात्याला सादर केल्या आहेत.
१६ एप्रिल ते १३ मे या कालावधीत भारतात पाच टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार असून कोटय़वधी रुपयांचा नफा असलेल्या आयपीएल स्पर्धेलाही त्याचदरम्यान म्हणजे १० एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ऐन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देशाची सुरक्षाव्यवस्था बंदोबस्तात गुंतली असताना आयपीएलच्या ट्वेन्टी-२० स्पर्धेत गोंधळ उडवून देणे अतिरेक्यांना सहज शक्य होणार आहे. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आयपीएल स्पर्धा लोकसभा निवडणुकीनंतर घ्यावात, अशी सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केली होती. मात्र सोन्याचे अंडे देणाऱ्या या कोंबडीला मारायचे कसे या विवंचनेत असलेल्या क्रिकेट मंडळाने स्पर्धा वाचविण्यासाठी नवा तोडगा काढला आहे.
स्पर्धा पुढे ढकलल्यास कोटय़वधी रुपयांचा तोटा मंडळाला होणार असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा पुढे न ढकलण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मात्र जो नवा तोडगा काढण्यात आला आहे, त्यानुसार स्पर्धेचा उद्घाटनीय आणि शेवटचा सामना ठरल्याप्रमाणेच होतील, परंतु ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी आणि त्याच्या दोन दिवस अगोदर व नंतर त्या शहरात आयपीएलचे सामने खेळविले जाणार नाहीत. या संदर्भातील अहवाल केंद्रीय गृहखात्याला पाठविला असून आता त्यांच्या उत्तराची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वाट पाहात आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा हा नवा तोडगा मान्य होणार आहे. या स्पर्धेसाठी खासगी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी असाही मुद्दा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने उपस्थित केला आहे. मात्र त्याला केंद्राने यापूर्वीच विरोध केला आहे.

महाराष्ट्राची वेगळी चूल
सार्वत्रिक निवडणुकांच्यादरम्यान राज्य सरकार त्यांच्या शहरात होणाऱ्या आयपीएल सामन्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवू शकतील का, अशी विचारणा केंद्राने राज्याला केली असून अनेक राज्यांनी आयपीएल सामन्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यास आम्ही असमर्थ असल्याचे मत प्रदर्शित केले आहे. ही स्पर्धा पुढे ढकललेलीच बरी, असा पवित्रा अनेक राज्यांनी घेतला आहे. प. बंगाल, दिल्ली, पंजाब आणि हैदराबादच्या पोलिसांनी निवडणुकीनंतर स्पर्धा घ्याव्यात असा सल्ला दिला असताना महाराष्ट्राने मात्र आयपीएलसाठी पोलिसांची ज्यादा कुमक बंदोबस्तासाठी देऊ, असा सल्ला दिल्याचे वृत्त आहे.

बलात्काप्रकरणी ज्येष्ठ नागरिक अटकेत
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

उपचाराचा खर्च करणाऱ्या ट्रस्टकडे नेण्याचे आमिष दाखवून २१ वर्षांच्या तरूणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आज कांदिवली पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला अटक केली.
रमेश सेठ (६४) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून तो कांदिवली येथील महावीर नगरमधील रहिवाशी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गरीब असून प्रदीर्घ आजाराने त्रस्त आहे. तिच्या आजारासाठी तीन लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर तिच्या कुटुंबियांनी त्यासाठी अनेक ट्रस्ट आणि दानशूर व्यक्तींच्या भेटी घेऊन मदतीची याचना केली. मात्र एकानेही तिच्या उपचारासाठी मदत केली नाही. काही दिवसांपूर्वी सेठ यांचा पीडित महिलेच्या कुटुंबियांशी संबंध आला आणि त्याने आपण हा खर्च उचलणाऱ्या ट्रस्टशी त्यांची भेट घालून देऊ असे आश्वासन दिले. मात्र मदत करणाऱ्या ट्रस्टमध्ये घेऊन जातो असे सांगून सेठ याने मंगळवारी पीडित महिलेला गोराईजवळील गावात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्यानंतर बोरिवली स्थानकावर सोडून पळून गेल्याचा आरोप महिलेने केला आहे.

मुंबईत दुसऱ्याही दिवशी चोऱ्यांचे सत्र सुरूच!
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत मुंबईमध्ये सुरू असलेले चोऱ्यांचे सत्र गुरूवारीही सुरू होते. बुधवारी रात्री ताडदेव येथे दोन जणांनी एका घरामध्ये दरोडा घालून सुमारे १४ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. ताडदेव येथील टाटा कॉलनीमध्ये राहणाऱ्या रतनबेन शहा (२०) यांच्या घरी दोन अज्ञात इसमांनी शिरकाव करून घरातील सुमारे पाच लाख ३० हजार रोख रकमेसह नऊ लाख १४ हजार रुपयांचे दागिने लुटून नेले. ही घटना घडली त्या वेळी शहा या आपल्या मुलासह बाजारात गेल्या होत्या व त्यांचा नोकर पोषाराम माळी हा (१७) हा घरात एकटा होता. चोरटय़ांनी घरात प्रवेश करून सुरूवातील माळीचे तोंडाला चिकटपट्टी लावली तसेच त्याचे हातपाय बांधले आणि त्याला बाथरूममध्ये बंद करून ठेवले. त्यानंतर घरातून रोखरकमेसह १४ लाख रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला.

रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचा प्रश्न
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

बारावीच्या रसायनशास्त्र-१ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना गोंधळून टाकणार प्रश्न विचारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे एका गुणाचे नुकसान होऊ शकेल, असे काही शिक्षकांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.बहुपर्यायी प्रकारच्या पहिल्या प्रश्नातील पाचव्या उपप्रश्नात एकूण चार पर्याय देण्यात आले होते. त्यापैकी एका योग्य पर्यायाचे उत्तर लिहायचे होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र चार पैकी ए, बी आणि डी हे तिन्ही पर्याय योग्य होते. त्यामुळे उत्तरात कोणता पर्याय नमूद करायचा यावरून विद्यार्थी बुचकळ्यात पडल्याचे प्रा. सुभाष जोशी यांनी सांगितले. याबाबत काही पालक शिक्षण मंडळाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव बसंती रॉय यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही ती शिक्षण मंडळाच्या पुणे कार्यालयाकडे पाठवू. शिवाय, शिक्षणतज्ज्ञांकडून सदर प्रश्न तपासून घेऊ, अशा त्या म्हणाल्या.

 


प्रत्येक शुक्रवारी