Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

आचारसंहितेची ऐशी-तैशी!
महापौरांच्या सरकारी निवासस्थानीच राजकीय पत्रपरिषद
औरंगाबाद, ५मार्च/प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी झाल्याबरोबरच सरकारी सोयींचा वापर करण्यावर र्निबध लागू झाले. औरंगाबादेत याचा पहिला फटका भारतीय जनता पक्षाला बसला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणारी सभा ऐन वेळी रद्द करावी लागली. तथापि त्यापासून भा. ज. प.च्या कार्यकर्त्यांनी काहीच धडा घेतला नाही. त्याच सभेसाठी शहरात आलेल्या भा. ज. प.च्या पदाधिकारी आणि प्रसिद्ध अभिनेत्री स्मृती इराणी यांची राजकीय पत्रकार बैठक महापौरांच्या सरकारी बंगल्यावर आज झाली!

सुरेश धस यांच्या मोठेपणात माझाही खारीचा वाटा - मुंडे
बीड, ५ मार्च/वार्ताहर

(कै.) रामचंद्र धस यांच्या खरे बोलण्याची व बोलल्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा आमदार सुरेश धस यांनी घ्यावी, असा सल्ला देऊन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी आज ‘धस राजकारणात मोठे झाले तरी त्यात आपला खारीचा वाटा मानावा,’ असा चिमटा काढला. भा. ज. प.चे आष्टीचे बंडखोर आमदार सुरेश धस यांची पुतणी योगिनी व संजिवनी यांचा विवाह आज जामगाव येथे झाला.

तिची आर्त हाक
एका मोठय़ा हॉस्पिटलच्या स्वागत-कक्षामध्ये बसले होते. ‘इथं गर्भलिंगनिदान केले जात नाही’ अशी पाटी सर्वच हॉस्पिटलमध्ये (कायद्याने अनिवार्य केल्यामुळे) असते, तशी इथेही होती. पाटीच्या खालीच पंचवीस-तिशीच्या पाच-सहा महिला सोनोग्राफीसाठी बसल्या होत्या. प्रश्न पडले. गर्भ निरोगी, सुस्थितीत आहे का हे बघण्यासाठी सोनोग्राफी करण्यात येणार होती की तो मुलीचा/मुलाचा आहे हे बघण्यासाठी? मुलीचा असेल तर तो गर्भाकुर खुडला जाणार का? आधीच्या एक-दोन मुली असतील तर हीच शक्यता होती.

काँग्रेसला हरविण्याचा मान शिवसेनेला
सुहास सरदेशमुख
उस्मानाबाद, ५ मार्च

लोकसभेच्या १९५२च्या निवडणुकीपासून ते थेट १९९६ पर्यंत उस्मानाबादकरांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून दिला. वास्तविक हे शहर, जिल्हा म्हणजे डाव्या विचारांचा. राजकारणाला नवे वळण देऊ पाहणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे उद्धवराव पाटील, नरसिंगराव देशमुख यांच्यासारख्या नेतेमंडळींनासुद्धा तब्बल ४४ वर्षे काँग्रेसला हटविता आले नाही. ते काम केले शिवसेनेने!
पहिल्या सहा निवडणुकांमध्ये, म्हणजे १९५२ ते १९७७पर्यंत ही लढाई मुद्दय़ांची लढाई होती. पुढे मुद्देच हरविले. प्रचारयंत्रणा तगडी झाली.

गणवेष खरेदीकरिता अडीच कोटी रुपये मंजूर
सर्वसाधारण सभेचा निर्णय
औरंगाबाद, ५ मार्च/प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून खासगी शाळांच्या दर्जाचे गणवेष देण्यात येतात. हा निर्णय झाल्यापासूनच हे गणवेष वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहेत. पहिले दोन वर्षे दिवाळीच्या सुटय़ांनंतर गणवेष तर उन्हाळ्याच्या सुटय़ा होण्यापूर्वीच बूट देणे शक्य झाले होते. पुढील शैक्षणिक वर्षांत स्वातंत्र्यदिनापर्यंत तरी गणवेष देणे शक्य व्हावे म्हणून आतापासूनच तयारी सुरु करण्यात आली असून यासाठी सर्वसाधारण सभेने अडीच कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.

गंगाखेड तालुक्यात ग्रामीण आरोग्याची ऐशी-तैशी
वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालय नकोसे!
प्रमोद साळवे
गंगाखेड, ४ मार्च

परभणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील आरोग्यसेवा विस्कळित झाली आहे. सरकारची सूचना असतानाही प्राथमिक आरोग्यकेंद्रांचे अधिकाधिक वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी न राहता शहरात राहतात. त्यामुळेल्याने ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

उर्दूची प्रश्नपत्रिका दोन तास उशिरा!
अंबाजोगाई, ५ मार्च/वार्ताहर

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अंबाजोगाईत गोंधळ उडाला. सकाळी ११ वाजता ऊर्दू आणि मराठी विषयाची परीक्षा सुरू झाली. परंतु मिल्लिया परीक्षा केंद्रावर ऊर्दूची प्रश्नपत्रिका शिक्षण विभागाकडून न मिळाल्यामुळे तब्बल दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले. दुपारी एक वाजता ही प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यामुळे दोन तास उशिराने परीक्षा सुरू झाल्यामुळे परीक्षा काळातही शिक्षण विभाग किती सतर्क आहे या घटनेवरून दिसून आले. दहावीच्या परीक्षेस आजपासून प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या परीक्षेत ऊर्दू विषयाची प्रश्नपत्रिकाच मिल्लिया केंद्राला न मिळाल्यामुळे शिक्षकासह विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. यानंतर केंद्रप्रमुखाने गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा मिळाला नसल्यामुळे परीक्षेचा वेळ वाढवून देण्याची मागणी केली. प्रश्नपत्रिका मिळाल्यापासून तीन तासांचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आला. ज्या विषयाची आज परीक्षा आहे त्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा केंद्राला पोहोचला का नाही याची माहितीसुद्धा परीक्षा मंडळाला नव्हती. यानंतर प्रत्येक केंद्रावर शिल्लक राहिलेल्या प्रश्नपत्रिका जमा करून त्याच्या झेरॉक्स काढून १११ विद्यार्थ्यांना वाटून परीक्षा सुरू करण्यात आली.

वऱ्हाडाचा टेम्पो उलटून दोन ठार, ४० जखमी
निलंगा, ५ मार्च/वार्ताहर

निलंगा-उदगीर रस्त्यावर शिऊर गावाजवळील वळणावर आज वऱ्हाडाचा टेम्पो उलटून चालकासह दोन जण ठार व ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव जाणारा हा टेम्पो उलटला. पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील बोरसुरी येथील सलीम शेख यांच्या मुलीच्या लग्नाचे वऱ्हाड घेऊन टेम्पो (क्रमांक एमएच २४ ए २०२६) उदगीरला जात होता. शिऊर गावाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. या अपघातात टेम्पोचालक शिवाजी लक्ष्मण कळसे (बोरसुरी) जागीच ठार झाला. लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार चालू असताना अंजुम शेख यांचे निधन झाले. जखमी असलेल्या ४० वऱ्हाडी मंडळींवर निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघाताबाबत वशीम बकबुल शेख (पेठ, निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

आरोपीचा पोलीस कोठडीत अन्नत्याग
अर्धापूर, ५ मार्च/वार्ताहर

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी माहेरी आलेल्या महिलेच्या दोन वर्षांच्या मुलाचा क्रूर खून केल्याचा आरोप असलेल्या सुभाष नारायण वाघमारे याने पोलीस कोठडीत अन्नत्याग सुरू केला आहे. तालुक्यातीला मालेगाव येथील दीक्षा श्रीखंडे यांचा मुलगा ज्ञानरत्न (वय २) याचा रविवारी खून केल्याच्या आरोपावरून वाघमारेला अटक करण्यात आली. अटक केल्यापासून त्याने एकदाही जेवण घेतले नाही. सकाळी त्याची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्याला नांदेडच्या गुरुगोविंदसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. अटक केल्यापासून तो बोलतही नाही आणि जेवतही नाही, असे पोलिसांनी सांगितले.

चार दिवसांपासून हिंगोली तहानलेले
हिंगोली, ५ मार्च/वार्ताहर

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे वीजपंप जळाल्याने मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अजूनही दोन दिवस वाट पहावी लागणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर एक आठवडाभर निर्जळी अनुभवावी लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आठवडय़ाच्या शेवटी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

नांदेड जिल्ह्य़ात चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
नांदेड, ५ मार्च/वार्ताहर

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितिन गोकावे यांच्यासह जिल्ह्य़ातल्या चार निरीक्षकांच्या आज तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. हे चारही अधिकारी बदलीसाठी पात्र नव्हते. श्री. गोकावे अडीच वर्षांपूर्वी नांदेडमध्ये आले होते. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी त्यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. आज त्यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. माजी महापौर तथा काँग्रेसचे नेते ओमप्रकाश पोकर्णा यांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नूर महंमद शेख यांची हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे. मुदखेड पोलीस ठाण्याचे प्रकाश डुकरे यांची औरंगाबाद शहरात, तर इतवारा पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक महंमद गुलाम पठाण यांची पुणे (शहर) येथे बदली करण्यात आली आहे. बदल्यांचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) अहेमद जावेद यांच्या स्वाक्षरीने आज नांदेडमध्ये पोहोचले.

न्यायालयीन कोठडीतून महिलेचे पलायन
नांदेड, ५ मार्च/वार्ताहर

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीने आज सरकारी रुग्णालयातून पळ काढला. किनवट तालुक्यातल्या इस्लापूर येथील नईआबादी परिसरात राहणाऱ्या ध्रुपदाबाई जळबा जिनेवाड हिला खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. किनवटच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत तिची रवानगी केल्यानंतर तिला नांदेडच्या कारागृहात आणण्यात आले होते. पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आज तिला नांदेडच्या गुरुगोविंदसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुपारी ३ वा. पोलिसांची नजर चुकवून तिने पळ काढला. काही क्षणात हा प्रकार लक्षात आला; परंतु तोपर्यंत ती पसार झाली.

जीपची दुचाकीस धडक; एक जखमी
अंबाजोगाई, ५ मार्च/वार्ताहर
जीपची मोटरसायकलला धडक बसून व्यापारी गंभीर जखमी झाला. काल रात्री दूध डेअरीजवळ हा अपघात झाला.व्यापारी रामेश्वर पांडुरंग भुतडा काल रात्री दुकान बंद करून घराकडे जात होते. त्यांच्या मोटारसायकलीला संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य बाळासाहेब शेप यांच्या जीपची (क्रमांक एमएच ४४-२१५) धडक बसली. त्यात ते जखमी झाले.

टिप्पर अंगावरुन गेल्याने एक ठार
लोहा, ५ मार्च/वार्ताहर

दुरुस्तीचे काम चालू असलेला टिप्पर अचानक सुरू होऊन अंगावरून गेल्याने एक जण ठार झाला. तालुक्यातील ढाकणी येथे काल रात्री झालेल्या या अपघातात वाहनमालक सुरेंद्र सदाशिव मेश्राम ठार झाले. ढाकणी येथे कामानिमित्त गेलेला टिप्पर (क्रमांक टी.जी.ओ. ४२ सी ७६४०) बंद पडला. सुरेंद्र सदाशिव मेश्राम व चालक अनिल मेश्राम (दोघेही राहणार पानखेड, जिल्हा अकोला) दुरुस्ती करीत होते. टिप्पर अंगावरून गेल्याने मेश्राम ठार झाले.

‘अध्यात्मिक अधिष्ठानाशिवाय मानवी जीवनाला सार्थकता नाही’
परभणी, ५ मार्च/वार्ताहर

अध्यात्माच्या अधिष्ठानाशिवाय मानवी जीवनाला सार्थकता प्राप्त होत नाही. आज आपण कितीही भौतिक प्रगती साधली असली तरीही जोवर हे अधिष्ठान प्राप्त होत नाही तोवर आपल्या आयुष्याला सुगंध येणार नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्त्या कमल ठकार यांनी केले.मराठवाडा साहित्य परिषद, काव्यरजनी मंडळ व गोविंद प्रतिष्ठान आळंदी यांनी पोखर्णा इंडस्ट्रीज येथे आयोजित कै. नरहर कुरुंदकर स्मृतीदिनानिमित्त तसेच पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या आयोजित सत्कार कार्यक्रमात श्रीमती ठकार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक रामेश्वर सोमाणी होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष रमाकांत कुलकर्णी, बा. बा. कोटंबे संजय चिटणीस, मसापचे विभागीय कोषाध्यक्ष देवीदास कुलकर्णी होते.काव्यरजनी मंडळाच्या अध्यक्षा कमल कुलकर्णी, हरिगोविंद प्रतिष्ठानचे राजेंद्र पोखर्णा यांनी स्वागत केले. लेखक बाबा कोटंबे, संजय चिटणीस, आसाराम लोमटे यांचा श्रीमती ठकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन वसुधा देव यांनी केले.

स्मशानभूमीसाठी जागा देण्याची इराणी व ख्रिश्चन समाजाची मागणी
गेवराई, ५ मार्च/वार्ताहर

शहरातील इराणी व ख्रिश्चन समाजाला स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी करण्यास अडचणी येत आहेत. सरकारने तातडीने स्मशानभूमीसाठी जागा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून शहरात इराणी, ख्रिश्चन व इतर जाती धर्माची माणसं येथे वास्तव्यास आहेत. मात्र या समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी नाही. पूर्वी शहरातील गायरानाच्या ठिकाणी अंत्यविधी करण्याची प्रथा होती. लोकसंख्या वाढीमुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून वस्त्या झाल्याने स्मशानभूमीसाठी जागा नाही. ख्रिश्चन समाजासाठीसुद्धा स्मशानभूमीसाठी जागा नाही. त्यांच्यातील मृत व्यक्तिंना थेट बीड येथे घेऊन जावे लागते. या दोन्ही समाजातील लोकांनी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी केली आहे. महसूल प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन मंडळ अधिकाऱ्यास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

लग्नसराई व निवडणुकीच्या हंगामामुळे पांढऱ्या टोप्यांना मागणी
सोयगाव, ५ मार्च/वार्ताहर
सध्या लग्नसराई व त्यात निवडणुकीच्या हंगामामुळे नेत्यापासून गल्लीतील मान्यवरांचे पेहराव बदलले असून पांढऱ्या कडक इस्त्रीच्या कपडय़ांवर पांढऱ्या टोपीमुळे या कार्यकर्त्यांचे व्यक्तिमत्वरूबाबदार दिसू लागले आहे. टोपी परिधान करण्याचा इतिहास फार जुना आहे. ग्रामीण भागात बाराही महिने डोक्यावर टोपी घालतात. विविध पक्षाचे नेते मंडळी पांढऱ्या शुभ्र खादीच्या कपडय़ांवर वेळ प्रसंगीच टोपी घालतात.मात्र पांढरी टोपी आजही लोकप्रिय आहे. लग्नामध्ये मानपानप्रसंगी ही टोपी घातल्याशिवाय वधू-वर मंडळीची भेट होत नाही. पांढऱ्या टोप्या तयार करणाऱ्या कंपन्या खानदेशात आहे. यात कॉटन, खादी, टेरिकॉट अशा विविध कपडय़ाच्या टोप्यांची निर्मिती होते. अनेक वर्षांपासून टोपी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी सांगितले की, निवडणुकीमुळे टोपी विक्री व्यवसायाला आणखी चांगले दिवस येतील. या दुकानदारांकडे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांची टोपी खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

संतुष्ट माणूसच खरा सम्राट - बाभुळगावकर
जालना, ५ मार्च/वार्ताहर
खऱ्या अर्थाने संतुष्ट असलेला माणूसच सम्राट असतो, असे प्रतिपादन अनेक उदाहरणे देत राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे उद्घाटक बाभुळगावकर शास्त्री यांनी केले.याप्रसंगी नानामहाराज पोखरीकर, ब्रह्मकुमारी सुलभादीदी, खासदार रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, भास्कर अंबेकर, अनिरुद्ध खोतकर, राजेश राऊत उपस्थित होते.श्री. बाभुळगावकर म्हणाले, आपल्याशी सर्वानी प्रेमाने वागावे, असे सर्वाना वाटते. जेवणाप्रमाणेच हीपण माणसाची भूक असते.प्रास्ताविक भास्कर अंबेकर यांनी केले. याप्रसंगी आमदार अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवे यांचीही भाषणे झाली.कीर्तन महोत्सवाचे पहिले पुष्प भगवानमहाराज आनंदगढकर यांनी गुंफले. ते म्हणाले की, परमेश्वराचे अस्तित्व सर्वत्र आहे. प्रत्येकाच्या हृदयात तो वसला आहे. सोन्यावाचून अलंकार, मातीपासून माठ, कारणावाचून कार्य व परमेश्वराशिवाय जग असू शकत नाही.

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा सत्कार
बीड, ५ मार्च/वार्ताहर
गुरु क्रीडा मंडळ व व्यायामशाळा पदाधिकाऱ्यांच्या वतीने नाटय़ संमेलन यशस्वी केल्याबद्दल संयोजक नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सारडानगरी येथे संयोजक भारतभूषण क्षीरसागर व डॉ. दीपा क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी नगरीतील गुरु क्रीडा मंडळ व व्यायामशाळेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी अध्यक्ष कृष्णा वर्मा, उपाध्यक्ष अनुप मंत्री, सचिव अविनाश खेडकर, सदस्य कृष्णा शिंदे, रोहित मोरे, स्वानंद नायगावकर, बंटी रत्नपारखी, कृष्णा इगडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अनुप मंत्री यांनी केले.

प्रा. शिंदे व गायकवाड सेवानिवृत्त
लातूर, ५ मार्च/वार्ताहर

राजर्षी शाहू महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील विज्ञानचे प्रा. लक्ष्मण शिंदे व इंग्रजीचे प्रा. श्रीधर गायकवाड हे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्याबद्दल त्यांना निरोप देण्यात आला.शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव व प्राचार्य डॉ. एस. बी. जाधव यांच्या हस्ते पुष्पहार, श्रीफळ व सरस्वतीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सुरेश वाघमारे, प्रा. एम. आर. पाटील, प्रा. विलास कदम, प्रा. कल्याण कांबळे, प्रा. डॉ. शेषेराव मोहिते आदींनी व्यक्त केले.

बचतगटांच्या मागण्यांसाठी आमदार माने यांचे उपोषण
औसा, ५ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील महिला बचतगटाच्या मागण्या मंजूर कराव्या यासाठी राजमाता जिजाऊ महिला बचतगट संघटनेने काल आमदार दिनकर माने यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. पूरक पोषण आहाराचा दर २००६मध्ये १ रुपया ९८ पैसे होता. सध्याच्या महागाईमध्ये हा दर बचतगटांना दर परवडणारा नाही. यामुळे तो ५ रुपये करावा, तालुक्यातील सर्व महिला बचतगटांचे वर्गीकरण करण्यात यावे, सरकारने घोषणा केल्याप्रमाणे चार गट स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालेल्या सर्व महिला बचतगटांनामागणीनुसार कर्ज द्यावे, महिला बचतगटांना स्वस्त धान्य दुकान व किरकोळ केरोसीन दुकानाचे परवाने त्वरित देण्यात यावे या मागण्या या वेळी मांडण्यात आल्या. त्या मंजूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा औसा तहसीलदार प्रभोदय मुळे यांना दिलेल्या निवेदनात आहे. त्यावर सर्वश्री. माने, मधुकर भोसले, राजाभाऊ काकडे, संजय उजळंबे, जयश्री उटगे, सुनीता सूर्यवंशी, त्रिशाला कांबळे, मीरा कुलकर्णी आदींच्या सह्य़ा आहेत.

जिल्हा ग्रंथालय संघाचे रविवारी अधिवेशन
परभणी, ५ मार्च/वार्ताहर

मराठवाडा कृषी विद्यापीठ ग्रंथालय, सत्य शारदा सार्वजनिक ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय यांनी रविवारी (दि. ८) जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन आयोजित केले आहे. हे अधिवेशन कृषी विद्यापीठ परिसरात होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी सकाळी १०.३० वाजता कुलगुरू डॉ. एस. एस. कदम यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. सोळंके असतील. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक शिक्षण अधिष्ठाता डॉ. पी. आर. शिवपुजे, प्राचार्य भगवान देशमुख, ग्रंथपाल डॉ. एस. पी. सातारकर, ग्रंथालय संचालक सुभाष मुंडे, अशोक सोनी उपस्थित राहणार आहेत. विश्व साहित्य संमेलनात सहभागी झाल्याबद्दल प्रा. इंद्रजित भालेराव यांचा या वेळी सत्कार करण्यात येणार आहे.अधिवेशनात दुपारी ‘कृषितंत्रज्ञान वाचन साहित्य’ या विषयावर प्रा. रामेश्वर पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. डॉ. रावसाहेब चोले, डॉ. बी. टी. मुंडे, डॉ. डी. के. वीर, भास्कर पिंपळकर, डॉ. विलास पाटील त्यात सहभागी होतील. सायंकाळी ४.३० वाजता खुले अधिवेशन व चर्चासत्र होणार आहे.

बीएसएनएलच्या कोडबदलाने ग्राहकांना त्रास
बीड, ५ मार्च/वार्ताहर

भारत संचार निगम विभागाने दूरध्वनी ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक मंगळवारपासून स्थानिक दूरध्वनीवरून ९५ ऐवजी शून्य कोड सुरू केल्याने ग्राहकांना दोन दिवसांपासून या निर्णयाचा त्रास सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्य़ासह राज्यात सर्वत्रच भारत संचार निगमने स्थानिक दूरध्वनी ग्राहकांसाठी काही वर्षांपासून एसटीडी कॉलसाठी शून्य ऐवजी ९५ ची सोय सुरू केल्यामुळे स्थानिक ग्राहकांना ९५ ची सुविधा अंगवळणी पडली. मात्र ३ मार्चपासून या सुविधेचा वापर करताना हा मार्ग अस्तित्वात नाही, ही सेवा आपल्या दूरध्वनीवर उपलब्ध नाही, असे संदेश ऐकावे लागत आहेत. दोन दिवसांपासून सर्व ग्राहक या संदेशांनी त्रस्त झाले आहेत. काही ग्राहकांनी दूरसंचार कार्यालयात संपर्क करून चौकशी केली असता, नव्याने एसटीडीसाठी शून्य डायलची सुविधा लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र अद्यापही अनेक ग्राहकांना नव्या सोयीची कसलीच कल्पना नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

लोहा बाजार समितीच्या संचालकपदी वैजाळे
लोहा, ५ मार्च/वार्ताहर

बाजार समितीच्या ग्रामपंचायत गटातील आर्थिक-दृष्टय़ा दुर्बल घटक मतदारसंघातून अनसूयाबाई वैजाळे यांची निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे. यामुळे बाजार समितीत आमदार प्रताप पाटील चिखलीकर गटाचे १५ संचालक झाले आहेत.बाजार समितीच्या १७ जागांसाठी ७ डिसेंबरला निवडणूक झाली. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक गटात देवराव टोपारे यांच्या निधनामुळे निवडणूक स्थगित झाली होती. या जागेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. बालाजी नारायण बहिरे यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे वैजाळे यांची बिनविरोध निवड झाली.

जैविक वैद्यकीय कचरा टाकल्यास फौजदारी खटला
लातूर, ५ मार्च/वार्ताहर

रुग्णालयांनी जैविक वैद्यकीय घनकचरा रस्त्यावर टाकल्यास त्या दवाखान्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जैविक वैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा नियम आहे. काही रुग्णालये त्याचे पालन न करता असा कचरा रस्त्यावर टाकतात. असा कचरा रस्त्यावर टाकल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.