Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पक्षांतर्गत वणव्यात युती होरपळली!
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी

 

भाजप २६ आणि शिवसेना २२ असे जागावाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची घोषणा होऊन चोवीस तास उलटण्याच्या आधीच युतीतील नेत्यांनी आज केलेल्या परस्परविरोधी विधानांमुळे युतीत पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. मुंबई दक्षिण, कल्याण व यवतमाळ या जागांवरून तसेच शरद पवार यांच्या पंतप्रधानकीवरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा वापरल्याने युतीतील तणाव वाढला आहे. या वादाच्या पाश्र्वभूमीवर पूनम महाजन राव यांनी आज एका पत्रकाद्वारे युती भक्कम करण्यासाठीच आपले प्रयत्न राहातील, असे स्पष्ट केल्याने मुंबई दक्षिण मतदारसंघाबाबत मात्र युतीत समझोता होण्याचे संकेत मिळत आहेत.
युतीतील संघर्षांला केवळ भाजप विरुद्ध शिवसेना असे स्वरूप नाही. तर भाजपमध्ये मुंडे विरुद्ध गडकरी आणि आता शिवसेनेतील ‘बोरुबहाद्दर’ विरुद्ध ‘चाणक्य’ अशा धुमसणाऱ्या आगीची पाश्र्वभूमी त्याला आहे. त्यामुळे मुंडे आणि गडकरी यांनी आज जागावाटपाबाबत परस्परविरोधी वक्तव्ये केल्याने गोंधळात अधिकच भर पडली.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ असलेली शिवसेना-भाजप युती अभेद्य असल्याचा निर्वाळा देत असतानाच युतीमध्ये भाजप २६ व शिवसेना २२ असे जागावाटपाचे सूत्र ठरल्याची जोरदार चर्चा असली तरी भाजपने आज हा दावा फेटाळला. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना मुंबई दक्षिण, यवतमाळ व कल्याण या जागांवर लढणार असल्याचे जाहीर केले. तसेच पवार यांच्याविषयीची शिवसेनेची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. मराठी माणूस पंतप्रधानपदी म्हणजेच दिल्लीच्या तख्तावर विराजमान व्हावा ही तमाम मराठी माणसांची आणि शिवसेनेचीही इच्छा आहे. मात्र त्याचा अर्थ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला पाठिंबा आहे, असा होत नाही, असेही राऊत म्हणाले. राऊत यांचे वक्तव्य प्रसारित होताच गडकरी यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला आणि जर तुम्हाला पवारांना पाठिंबा द्यायचा असेल तर युती विसरा, अशी प्रतिआव्हानाची भाषा केली. त्यावर मुंडे यांनी काहीही झाले तरी युती टिकणारच, असे वक्तव्य करून या गोंधळावर कळस चढवला. कोणीही कितीही आणि काहीही वक्तव्ये केली तरी युती अभेद्यच असून येत्या शनिवारी दोन्ही पक्ष संयुक्तपणे लोकसभेचे मतदारसंघ जाहीर करतील असे गोपीनाथ मुंडे यांनी सांगितल्याने संभ्रमावस्था अधिकच वाढली. त्यातून भाजपच्या नेत्यांमध्येच एकमत नसल्याचे उघड झाले.
शिवसेनेला मुंबई दक्षिण, यवतमाळ हवी असल्यास कोणत्याही परिस्थितीत आम्ही कल्याणची जागा लढणारच, असे नितीन गडकरी यांनी जाहीर करून टाकले. शरद पवार यांना पाठिंबा देण्याबाबत राऊत यांनी वक्तव्य केले आहे. मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत शिवसेनेने लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर केला होता. त्यामध्ये शिवसेनेने बदल केला असल्यास आमची त्याला हरकत नाही. तथापि, त्यापूर्वी युती तुटल्याचे जाहीर करावे, असे जोरदार आव्हानच गडकरी यांनी शिवसेनेला दिले.
गडकरी यांच्या आव्हानापाठोपाठच मुंडे यांनी युतीच्या एकोप्याबाबत विधाने केली आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनीही मुंडे यांच्या सूरात सूर मिसळला. त्यामुळे युतीमधील जागावाटपाची चर्चा आणि गडकरी आणि मुंडे यांची परस्परविरोधी विधाने यामुळे संघर्ष अधिक चिघळला असल्याचे बोलले जात असून संभ्रमावस्थाही वाढली आहे.
दरम्यान, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन-राव यांनी, आपल्या उमेदवारीवरून युतीमध्ये अडचणी निर्माण झाल्याच्या वृत्ताचे जोरदार खंडन केले आहे. युतीची सुरुवात आणि वाढ पाहातच आपण लहानाची मोठी झालो आहोत, तेच संस्कार आपल्यावर आहेत. त्यामुळे युतीमध्ये अडथळा तर सोडाच ती भक्कम करण्याच्या दृष्टीने आपला विचार आणि कृती राहील, असे पूनम राव यांनी म्हटले आहे. लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान करण्यासारखे विशाल लक्ष्य आपल्यापुढे आहे आणि त्यासाठी युती सज्ज होत आहे, असेही त्यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.